तिचं नाव श्रद्धा होतं. पण तिला आलेलं मरण पाहून कोणाचीही माणूसपणावरची श्रद्धा डळमळीत व्हावी. श्रद्धा वालकर या वसईच्या 26 वर्षीय तरुणीची हत्येचा जो प्रकार समोर आला आहे तो भीषण क्रौर्याची परिसीमा गाठणारा आहे. प्रियकराच्या नात्यात असलेल्या आफताबनं हत्येनंतर तिचे 35 तुकडे करणं, ते फ्रीजमध्ये भरून ठेवणं आणि पुढचे अठरा दिवस रोज पहाटे जंगलात जाऊन एकेक करून ते नष्ट करणं हा सर्वच घटनाक्रम अंगावर काटा आणणारा आहे. या घटनेशी संबंधित व्यक्ती या अनेकांना ओळखीच्या वाटतील. टीव्हीवरच्या मालिका, सिनेमे, नेटफ्लिक्ससारखे मनोरंजनाचे रतीब घालणारे फलाट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईलवर सहजपणे उपलब्ध असणारे इंटरनेट यामुळे आता शहरे आणि गावे यांच्यातला फरक नष्ट होत चालला आहे. गरीब आणि श्रीमंत हे दोन वर्ग शिल्लक असले आणि त्यांच्यातली दरी भयंकरपणे वाढत असली तरी या दोन्ही वर्गातील लोकांच्या संस्कृतींची सरमिसळ झालेली आहे. गेली दोन-तीन वर्षे आफताब आणि श्रद्धा एकमेकांसोबत राहत होते. श्रद्धा ही आजच्या काळातली चटपटीत, सेल्स-मार्केटिंगमधल्या नोकर्या केल्यामुळे आत्मविश्वास आणि त्याचसोबत स्वतःविषयी अनेक गैरसमज तयार झालेली मुलगी असावी. आईवडिल वेगळे राहत असल्याने विभक्त कुटुंबातील तणावांचीही ती बळी असावी. कॉलेजात असताना ती आपल्याला वडील नसल्याचे व आपण घरात एकटीच कमावणारी व्यक्ती असल्याचे सांगे. तिच्या आफताबसोबत राहण्याला कुटुंबियांनी जेव्हा विरोध केला तेव्हा बहुदा त्यातील काळजी व प्रेम तिने लक्षात घेतले नाही. आपल्या स्वातंत्र्यावर हे कुटुंबिय गदा आणत आहेत असा तिचा समज झाला. त्यातून मी यापुढे तुमची मुलगी नाही असे सांगून ती बाहेर पडली. कुटुंबाशी संवाद इतका थांबला की, खून मे महिन्यात झाला तरी वडिलांना नोव्हेंबरात त्याविषयी कळलं. आफताब हा डिजिटल तंत्रज्ञान शिकलेला व स्वतःचा व्यवसाय करणारा अवघ्या 28 वर्षांचा तरुण आहे. थोड्या काळात भरपूर पैसे मिळवू शकणार्या आजच्या काळातील तरुण पिढीपैकी तो एक आहे हे स्पष्ट आहे. मुलींसोबत मजा करावी, खावं, प्यावं, फिरावं, मात्र कोणत्याच बंधनात अडकवून घेऊ नये असं या पिढीतल्या बर्याच तरुणांना वाटतं. त्यांच्या अवतीभवती रोजच्या आयुष्यात किंवा ते सदैव ज्याच्यात बुडालेले असतात त्या इंटरनेटवरच्या करमणुकीत स्थायी असं काहीही नसतं. यूट्यूबचे दहा पंधरा मिनिटांचे व्हिडिओसुध्दा त्यांना बोअर वाटतात. इन्स्टाग्राम किंवा टिकटॉकचे वीस-तीस सेकंदांचे व्हिडिओ हे जणू त्यांचं राष्ट्रगीत झालं आहे. त्यामुळे दीर्घ काळ टिकवण्यासारखं काही नातं असतं किंवा आयुष्यभर बांधील राहावं असं काही मूल्य वा विचार असतो हे त्यांना मान्य नसतं. ते भराभर नोकर्या बदलतात. एक नोकरी करताना मूनलायटिंग म्हणजे दुसरीकडेही काम करतात. गरज असेल त्याप्रमाणे मित्र जोडतात व गरज नसेल तेव्हा तोडतात. कौटुंबिक नात्यांचेमध्येही हेच झाले आहे. स्त्री आणि पुरुष यांचं पती-पत्नी असं नातं जुळणं आणि ते टिकून राहणं यावर शेकडो वर्षांपासून कथा-कादंबर्या-नाटकं लिहिली गेली. बहुतांश हिंदी व इंग्रजी सिनेमांची कथानकंही कित्येक वर्षे याच गोष्टींभोवती फिरत राहिली. या नात्यात महिलांचा प्रचंड छळ झाला हेही खरंच आहे. पण ते एक वैशिष्ट्यपूर्ण नातं असल्याचं मान्य करून ते सुधारण्यासाठी सर्व समाजाने आजवर प्रयत्न केले. दुर्दैवाने, वीस सेकंदाची रील आणि हे नातं यात फारसा फरक उरलेला नाही असं आफताब आणि श्रद्धा यांच्या पिढीतल्या अनेकांचं मत झालं आहे. त्यामुळे थोड्या थोड्या काळाने असे ब्रेकअप होत राहतात आणि तरीही कोणाचंच काहीच तुटत नाही. काही वेळेला ते हसतखेळत होतं. पण काही वेळेला पराकोटीच्या निर्विकार क्रूरपणे घडतं. श्रद्धाचा खून हे या दुसर्या टोकाचं उदाहरण आहे. मारिया सुसाईराज या मॉडेलने नीरज ग्रोव्हर या आपल्या मित्राला अशाच क्रूरपणे संपवून जाळलं होतं. एकविसाव्या शतकातील विकासामागे दिवसरात्र धावणारा आपला समाज या क्रौर्याकडे पाहून काही क्षण तरी थबकणार का हा खरा प्रश्न आहे.