मराठी मनांचा संताप 

गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश तर मिळाले नाहीच. उलट त्यांच्या जागा कमी झाल्या. शिवाय, सत्तेची गुर्मी दाखवल्यामुळे अनेक वर्षांपासून सोबत असलेली शिवसेना दुरावली. एकीकडे देशभरात भाजपच्या सत्तेचा घोडा सर्वत्र विनाअटकाव दौडत असताना महाराष्ट्राने तो अडवणे हे दिल्लीश्‍वरांच्या पचनी पडलेले नाही. तेव्हापासून महाराष्ट्र, मराठी जनता आणि मराठी संस्कृतीबाबत दिल्लीतील नेते डूख ठेवून आहेत. त्यातच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही गुजरातचे. मुंबई पळवण्याचा आपला डाव संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने 1960 मध्ये हाणून पाडला याचा राग तेव्हापासून काही गुजराती नेत्यांच्या मनात आहे. गुजरात आणि केंद्रात मोदींची सत्ता असूनही महाराष्ट्र आजतागायत औद्योगिक व इतर विकासाच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे वैषम्यही त्यांना वाटते. त्यामुळेच महाराष्ट्र आणि मराठी जनता यांची मानखंडना करण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू असावेत असा संशय घेण्याजोगे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने घडले आहेत. शिवसेनेचे भाजपच्या हिंदुत्वाला शह दिल्याने त्यांचे सरकार पाडण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्यात आली. याची सर्व सूत्रे दिल्लीतून हलली आणि भाजपनेच बंडखोरांची सुरत, गुवाहाटी व गोवा वारी प्रायोजित केली. नवीन सरकारच्या कायदेशीरपणाबाबतच संभ्रम असल्याने मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकण्यात आले. भाजप किती उदार असे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. प्रत्यक्षात भाजपच्या नेत्यांच्या लेखी शिंदे यांचा दर्जा एखाद्या आश्रितासारखा वा मांडलिकासारखाच आहे. शिंदेही ही भूमिका मनापासून पार पाडत आहेत. काँग्रेसी नेत्यांनीही केल्या नसतील अशा रीतीने शिंदे सध्या दिल्लीच्या वार्‍या करतात आणि दिल्लीतील नेते जे बोलतील त्याला मान डोलावतात. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि येथील राजकारण दिल्लीतील नेत्यांच्या दावणीला बांधण्याचा जो कार्यक्रम भाजपने चालवला आहे त्यातील शिंदे पूर्णपणे सहभागी झाले आहेत. मध्यंतरी महाराष्ट्रातील वेदान्त फॉक्सकॉनसारखे प्रकल्प गुजरातला हलवले गेले. हे सर्व दिल्लीच्या इशार्‍यावरून घडले. तरीही शिंदे यांनी त्याला विरोध केला नाहीच. उलट नरेंद्र मोदी यांनी आपल्याला इतर मोठे प्रकल्प देण्याचे आश्‍वासन दिले आहे असे अत्यंत बालिश उत्साहाने ते सर्वांना सांगत राहिले. महाराष्ट्रातील सुविधा आणि अनुकूल परिस्थिती यामुळे बडे उद्योगसमूह येथे प्रकल्प आणण्यास उत्सुक असतात. त्यात मोदींच्या मर्जीचा काही संबंध येता कामा नये. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. शिंदे हे मोदी यांच्या कृपाशिर्वादाने वाकून गेले असतील. पण शिंदे म्हणजे महाराष्ट्र नव्हे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांची जणू पद्धतशीर बदनामी करण्याचे कारस्थान रचले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या लहान वयात झालेल्या लग्नावरून अतिशय अश्‍लाघ्य अशी शेरेबाजी केली. नंतर शिवाजीमहाराज हे आता जुनेपुराणे आदर्श झाले असेही हे कोश्यारी महोदय म्हणाले. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा काढण्यासाठी भीक मागितली असा अवमानकारक उल्लेख केला. याखेरीज भाजपच्या किरकोळ नेत्यांनी वेळोवेळी अशीच काही वक्तव्ये केली. एक नकलाकार मोदींविरुध्द विनोद करण्याची शक्यता आहे असे म्हणून त्याच्या कार्यक्रमाच्या आधीच त्याला मध्य प्रदेशात अटक करण्यात आली होती. दुसर्‍या एका नकलाकाराचे बंगलोर इत्यादी ठिकाणचे कार्यक्रम बंद पाडण्यात आले होते. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र मराठी जनतेच्या मानबिंदूंविरोधात बिनदिक्कत अपमानकारक वक्तव्ये केली जातात व माफी मागतानाही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अशी जरतरी भाषा वापरली जाते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नासंदर्भातही हेच झाले. सांगली व सोलापुरातील काही गावे कर्नाटकाला जोडून घेण्याची आगलावी भाषा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द करण्यास भाग पाडण्यात आला. आणि इतके होऊनही, या प्रश्‍नाचे राजकारण करू नका असा उपदेश अमित शाह महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांना करीत आहेत. यामुळे, महाराष्ट्राचा खरा स्वाभिमान ज्यांच्या हृदयात आहे अशी सर्व जनता गेल्या काही काळापासून संतप्त आहे. हल्लाबोल मोर्चा हा त्या संतापाचाच उद्गार असेल.

Exit mobile version