शिंद्यांना झेपेल?

राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाने सरकार चालले आहे खरे. पण प्रत्यक्षात इथलं सर्व राजकारण भाजपच्या तंत्रानंच चाललेलं दिसतं. ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’, असं म्हणत शिंदे पुढे पुढे निघाले आहेत. त्यांना आणि त्यांच्या गटाला हे सर्व झेपेल का असा प्रश्‍न पडल्याखेरीज राहत नाही. शिंदे गट आणि भाजपमध्ये कुरबुरी असल्याचं लपून राहिलेलं नाही. पण भाजपची प्रचारयंत्रणा काहीही होत्याचे नव्हते करू शकते. त्यातून या कुरबुरींना मिडियात फार मोठे केले जाणार नाही याची व्यवस्था केली गेली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. फडणवीसांच्या अखत्यारीतील पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. मग शिंदे गटानेही प्रति-गुन्हे दाखल केले. ठाण्यात भाजपला पक्षाचा विस्तार करायचा आहे. तसे त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सध्या कल्याणचे खासदार आहेत. त्या जागेवर भाजप हक्क सांगत आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून त्यांनाच अस्थिर करण्याची भाजपची ही खास राजकीय शैली आहे.

जागा दाखवण्याचा कार्यक्रम
शिंदे यांची आजवरची प्रगती शिवसेना संघटनेच्या जोरावर झाली. सध्या त्यांच्याकडे सत्ता असल्याने कार्यकर्ते त्यांच्याभोवती गोळा होत आहेत. बाकी त्यांच्याकडे कोणतीही स्वतंत्र विचारसरणी नाही. शिवसेनेत फूट पाडून तो पक्ष खिळखिळा केला हेच आजवरचे त्यांचे मोठे कर्तृत्व आहे. भाजप त्यापायीच त्यांना भाव देते आहे. पुढच्या महापालिका निवडणुकांपर्यंत तरी हा क्रम चालू राहील. भाजपला सेनेची मुंबईची सत्ता हिसकावून घ्यायची आहे. ते झाले की शिंदे यांची गरज संपेल किंवा कमी होईल. उर्वरित महाराष्ट्रात त्या मानाने भाजपला शिंदे यांच्या मदतीची फार आवश्यकता भासणार नाही. तशी ती भासू नये यासाठी इतर पक्षांमधून फोडाफोडी वा विरोधी नेत्यांवर कारवाया असे सत्र चालू आहे. शिंदे गटाला जमेल तिथं त्याची जागा दाखवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत. परवा मंत्रिमंडळ बैठकीत यावरून झकाझकी झाली अशा बातम्या आल्या. विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने परस्पर करून टाकली. त्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी फडणवीसांना जाब विचारला असे म्हणतात. देवेन भारती यांची विशेष पोलिस आयुक्त म्हणून मुंबईत नियुक्ती करताना शिंदे यांना कल्पना दिली गेली नव्हती अशीही बोलवा आहे. मुंबई सध्या तुलनेने शांत आहे. कोणतेही टोळीयुध्द किंवा खंडणीचे प्रकार चालू नाहीत. बाँबस्फोट किंवा दंगलीही झालेल्या नाहीत. तरीही शहरात मुद्दाम विशेष आयुक्त नेमण्याची नेमकी काय गरज आहे हे भाजपने किंवा फडणवीसांनी स्पष्ट केलेले नाही. शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असे म्हणतात. बातम्या शिंदे गटाच्या मंत्र्यांकडूनच मिडियापर्यंत पोचतील अशी व्यवस्था केली गेलेली आहे. त्यांचा निदान लगेचच इन्कार केला गेलेला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. नागपूर अधिवेशनातही अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाच्याच मंत्र्यांना बदनाम करणारी प्रकरणे ओळीने बाहेर आली होती. भाजपच्या एकाही मंत्र्याविरुध्द बोलले गेले नव्हते. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेला न घेताच भाजपने परस्पर सरकार स्थापले होते. नंतर सेना सरकारात सामील झाली तरी एकमेकांवर टीका करणे चालूच होते. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुका त्यांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. त्यावेळी प्रचारात त्यांनी एकमेकांच्या विरोधात जो शिमगा केला होता तो भयंकर होता. सोमय्या तर ठाकरे यांना तेव्हापासून माफिया म्हणत होते. सेनेला संपवून टाकणे हे भाजपचे धोरण तेव्हाच स्पष्ट झाले होते. आता शेवटचा घाव घालण्यासाठी त्यांनी शिंदे यांना हाताशी धरले आहे. मात्र ते करताना शिंदे फार बलिष्ठ होऊ नयेत वा त्यांचे नवीन सत्ताकेंद्र तयार होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. शिंदे यांचे सरकार भाजपच्याच कृपेने चालू आहे याची पुन्हापुन्हा जाणीव करून दिली जात आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून भाजप कार्यकर्ते नाराज झाले असे चंद्रकांत पाटील जाहीरपणे म्हणाले होते. नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांना लवकर मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे असे जाहीर केले. तर परवा शिंदे यांचे बंड भाजपनेच घडवून आणले हे गिरीश महाजनांनी स्पष्ट केले. आमचे मुख्यमंत्री फडणवीसच असे नवनीत राणाबाई काल म्हणाल्या. शिंदे गटाने आपल्या पायरीने वागावे अशी समजच जणू अशा वक्तव्यांमधून दिली जात असते.

केवळ मारेकरी आणि झिलकरी
दुसरीकडे विरोधी नेत्यांना संपवण्याचा अजेंडा स्वतंत्रपणे रेटणे चालूच आहे. त्यात राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांना लक्ष्य केले जाताना दिसते. नबाब मलिकांपाठोपाठ आता हसन मुश्रीफ यांच्यावर इडीचे छापे टाकण्यात आले आहेत. (शिंदे गटातील नेमक्या सत्तार या मुस्लिम नेत्याविरुध्दच आरोप व्हावेत हाही योगायोग नसावा.) यानंतर मुंबईतील काँग्रेसचे अस्लम शेख यांचा नंबर आहे असे म्हणतात. मुस्लिम नेते भ्रष्टाचारी किंवा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असलेले आहेत असे चित्र उभे करणे ही सरळसरळ 2024 च्या निवडणुकांची तयारी आहे. त्यातून हिंदुत्वाच्या प्रचाराला उठाव मिळणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात शिवाजीमहाराज, फुले इत्यादींविषयी बदनामीकारक वक्तव्यांमुळे भाजपविरोधात मत तयार झाले होते. शिवाय महाराष्ट्रात विरोधकांच्या प्रभावामुळे बहुजन मतदारांना पूर्णपणे आपल्या बाजूला खेचण्यात भाजपला यश आलेले नाही. गेल्या वेळी विधानसभेला त्याच मुळे भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या. हिंदुत्वाच्या प्रचाराच्या आधारे हा दोष दूर करता येईल अशी ही रणनीती आहे. पुढच्या विधानसभेत एकट्याच्या बळावर भाजपला निवडून यायचे आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे मारेकरी आणि भाजपचे झिलकरी इतकीच भूमिका बजावावी असे यातील नियोजन दिसते. पालिका व जिल्हा परिषद आगामी निवडणुकांच्या वेळी हे सर्व अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. 

Exit mobile version