शिक्षणाचा बोजवारा

‘प्रथम’ या संस्थेचा ‘असर’ हा अहवाल यंदाही निराशाजनक आहे. देशभरातील शालेय शिक्षणाच्या स्थितीची पाहणी करून दरवर्षी ही संस्था हा अहवाल तयार करीत असते. भाषा आणि गणितातील विद्यार्थ्यांची प्रगती कशा प्रकारे चालू आहे त्याचा एक अंदाज या अहवालावरून येत असतो. त्यानुसार, आठव्या इयत्तेतील सुमारे 25 टक्के मुलांना दुसरी इयत्तेतील मराठीची पुस्तकेही धड वाचता येत नाहीत असे आढळले आहे. मात्र त्याहूनही वाईट म्हणजे पाचवीतील ऐशी टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी वजाबाकी आणि 65 टक्के मुलांना भागाकाराचे गणित येत नाही असे दिसून आले. महाराष्ट्रात दुसरीचे धड तिसरीत वाचू शकणार्‍या मुलांची टक्केवारी 2018 मध्ये 42 होती ती यंदा 26 वर घसरली आहे. देशाच्या पातळीवरही अशीच घसरण झाली आहे. कोरोनाच्या काळात मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण चालू राहिल्याबद्दल सरकारे अभिमानाने दावे करत असतात. प्रत्यक्षात या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे दिसते. अन्यथा एकाच वर्षात अभ्यास समजण्यामध्ये इतकी घसरगुंडी संभवत नाही. कोरोनाचाच परिणाम म्हणून बहुदा बहुसंख्य पालकांना आता खासगी शाळा परवडेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये दाखल होणार्‍या मुलांची टक्केवारी पाच ते दहा टक्क्यांनी वाढली आहे. अजूनही तीस टक्के शाळांमध्ये शौचालये नसल्याचेही या पाहणीत दिसून आले आहे. मुलींच्या शिक्षणावर याचा नक्कीच परिणाम होत असला पाहिजे. एकीकडे विद्यार्थ्यांची उपस्थितीते. वाढावी म्हणून सरकार माध्यान्ह भोजनासारख्या योजना राबवत असते. त्याचा अनुकूल परिणाम गेल्या काही वर्षात दिसला आहे. मात्र शिकवण्याचा दर्जा आणि मुलांची समज वाढवण्यासाठीही आता जोरदार मोहिम हाती घेण्याची गरज आहे. भारत यंदा चीनलाही मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होणार आहे. या लोकसंख्येत तरुणांची म्हणजेच नोकर्‍या वा उद्योगधंदे करून अर्थव्यवस्थेत भर टाकणारांची संख्या सध्याच्या दशकात सर्वाधिक राहणार आहे. याला डेमॉग्राफिक डिव्हिडंड असे म्हणतात. मात्र हे तरुण उत्तम शिकलेले असले तरच ते नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये भराभर आत्मसात करू शकतात. तसे नसेल तर त्यांची उत्पादकता अगदीच कमी राहील. जे चित्र आपल्या आजूबाजूला दिसते आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत हवालदार वा तत्सम जागांसाठी दोन दोन पदव्या घेतलेले किंवा एमबीए वगैरे झालेले तरूण रांगेत उभे दिसले. नोकर्‍या नाहीत हा एक भाग आहेच. पण त्याचसोबत या तरुणांना जे शिक्षण मिळाले आहे त्याचा दर्जाही इतका नाही की ते त्या आधारे अधिक चांगले वा उत्पादक काम करू शकतील. आज वरच्या थरातील मूठभरांना भरपूर पैसे टाकून उत्तम शिक्षण मिळू शकते. ते परदेशीदेखील जाऊ शकतात. पण तळाचे बहुसंख्य तरुण या वाईट दर्जाच्या व्यवस्थेत शिक्षण घेत राहतात. हे चित्र बदलायला हवे. अन्यथा दरवर्षी येणार्‍या निराशाजनक अहवालांवर पोकळ चर्चा आपण करीत राहू.

Exit mobile version