उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक अशी म्हण आहे. गौतम अदानी यांच्या उद्योगसमुहाचा पक्षी गेल्या काही वर्षांपासून उंचच उंच झेपावत होता. त्यांच्या कंपनीमध्ये भानगडी आहेत असा आरोप या आठवड्यात अमेरिकेतून झाला. त्यासरशी अदानींच्या शेअर्सचे भाव कोसळले. शुक्रवारीही बाजार पडला. अदानी हा बुडणारा बेडूक ठरणार असे अनेकांना वाटू लागले. तसे झाले तर नरेंद्र मोदी सरकारलाही फटका बसेल. मात्र हे खरेच घडेल काय हा प्रश्न आहे.
अदानी आणि मोदी
अदानी हे तीस-चाळीस वर्षांपासून धंद्यात आहेत. राजीव गांधींपासून मोदींपर्यंत सर्व सरकारांच्या धोरणांचा त्यांनी फायदा उठवला आहे. अलिकडे त्यांनीच एका मुलाखतीत हे सांगितलं. पण नरेंद्र मोदींच्या काळात अदानींची डोळ्यात भरेल (किंवा डोळ्यावर येईल) अशी भरभराट झाली हे वास्तव आहे. त्यातून मोदी सरकार आणि अदानी एकदुसर्याला मदत करतात असा संशय तयार झाला. 2014 च्या निवडणूक मोहिमेत मोदींनी अदानींचे विमान वापरले होते. मोदी सत्तेत आल्यापासून देशातील अनेक बंदरे, विमानतळ इत्यादी प्रकल्प अदानींकडे गेले. मुंबई विमानतळ चालवण्याचा ठेका ज्या कंपनीकडे होता तिच्यावर धाडी पडल्या. आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली. मग हा विमानतळ अदानींकडे आला. ऑस्ट्रेलियातील कोळशाच्या खाणींमध्ये अदानींना गुंतवणूक करायची होती. त्यांना नियमाबाहेर जाऊन मदत केल्याचे आरोप स्टेट बँकेवर झाले. मधल्या काळात अदानी जगातील दुसरे किंवा तिसरे श्रीमंत गृहस्थ झाले. यापूर्वी या देशात सर्वात श्रीमंत म्हटले की अंबांनींचे नाव पुढे येई. आता ते मागे पडले. जिकडेतिकडे अदानी चमकू लागले. अलिकडे एनडीटीव्ही ही प्रतिष्ठित वृत्तवाहिनी त्यांनी खरीदली. मुंबईचा नवीन विमानतळ तेच उभारत आहेत. कम्युनिस्टांच्या केरळमधील बंदर विकासापासून ते काँग्रेसच्या राजस्थानातील वीजनिर्मिती प्रकल्पांपर्यंत सर्वत्र अदानींचा झेंडा आहे. तरीही हिंडेनबर्गचा तुफानी आरोप असलेला अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाल्यावर विरोधाच्या तोफा मोदींकडेच वळल्या. अदानीने आपल्या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कृत्रिमरीत्या प्रचंड वाढवल्याचा ठपका या अहवालात आहे.
आरोपांच्या भोवर्यात
येथील शेअर बाजारातून आधी पैसे उभे करायचे, ते मॉरिशससारख्या देशात पाठवून तेथील कंपन्यांमार्फत पुन्हा या देशात आणायचे आणि त्यांच्यामार्फत आपल्याच कंपन्यांचे शेअर खरेदी करून बाजारात तेजी निर्माण करायची अशी अदानीची पध्दत आहे असा या अहवालातला सूर आहे. हेच चढ्या किमतीचे शेअर गहाण ठेवून अदानीने बँकांकडून प्रचंड प्रमाणात कर्जे उचलल्याचाही आरोप आहे. उद्या जर शेअरचे भाव कोसळले तर या बँकांची कर्जे बुडू शकतात असा त्याचा अर्थ आहे. अदानीवरचे हे आरोप नवीन नाहीत. यापूर्वीही वेळोवेळी ते झाले आहेत. अदानीच्या कंपन्या प्रचंड कर्जाखाली दबलेल्या आहेत असा आरोप करणारा एक अहवाल गेल्याच वर्षी प्रसिध्द झाला होता. या सर्वांबाबत अदानींनी वेळोवेळी खुलासा केला आहे. शिवाय त्यांनी हिंडेनबर्गविरुध्द न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ही आरोप करणारी हिंडेनबर्ग हीदेखील शेअर बाजारातली एक वादग्रस्त फर्म आहे. कंपन्यांचे शेअर प्रचंड प्रमाणात विकून भाव पाडायचे आणि नंतर तेच शेअर्स कमी भावात खरेदी करून मधला नफा घ्यायचा हा कंपनीचा अधिकृत व्यवसाय आहे. मात्र असे असले तरी तिने केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात अदानींची संपत्ती हजारो कोटींनी घटली. अर्थातच हा सर्व काल्पनिक तोटा आहे. अदानींना इतक्यात तरी त्याची प्रत्यक्ष झळ लागणारी नाही. याच दरम्यान त्यांनी सुरू केलेली शेअरविक्रीही सुरळीत पार पडते आहे. या विक्रीवर परिणाम व्हावा म्हणूनच हा अहवाल आता उघड करण्यात आला असावा असाही एक तर्क आहे. ते खरेही असू शकेल.
रिलायन्सच्या वाटेने
उद्योगपतींवरची टीका नवीन नाही. नेहरूंच्या काळापासून हे चालू आहे. तेव्हा टाटा, बिर्ला, दालमिया इत्यादी सरकारचे लाडके आहेत असे म्हटले गेले. इंदिरा गांधींच्या काळात धीरुभाई अंबांनींवर मेहेरनजर आहे अशी टीका झाली. त्यांची रिलायन्स कंपनी पॉलिएस्टर उत्पादनाच्या धंद्यात उतरली होती. ओर्के, बाँबे डाईंग हे तिचे प्रतिस्पर्धी होते. पण धीरुभाईंनी इंदिरा गांधी आणि तेव्हाचे मंत्री प्रणव मुखर्जी यांना वश केले असे म्हटले गेले. रिलायन्सला फायदा होईल अशा रीतीने सरकारी धोरणात आणि अर्थसंकल्पात तरतुदी केल्या गेल्या, असे आरोप तेव्हा केले गेले. हे आरोप करणारे होते एस. गुरुमुर्ती आणि त्यांना साथ होती इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राची. हे गुरुमूर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि मोदींनी त्यांना रिझर्व्ह बँकेवरही नेमले होते. असो. पण तेव्हा रिलायन्सच्या रोखे विक्रीत प्रचंड घोटाळा आहे असाही दावा झाला. कालपर्यंत कापडाची आणि पॉलिएस्टर गिरणी चालवणारा उद्योग जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प कसा उभारू शकतो याबाबत संशय व्यक्त केला गेला. एकविसाव्या शतकात रिलायन्सच्या जिओ टेलिकॉमला फायद्याचे होईल असे धोरण आखले गेले, असे अनेकांचे म्हणणे होते. जिओच्या समोर टाटा, बिर्ला इत्यादी देखील टिकू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण काळाच्या ओघात अंबानींवरचे आरोप मागे पडले. काही प्रकरणे कोर्टात गेली. पण ती टिकू शकली नाहीत. कृष्णा-गोदावरी खोर्यातील सरकारी कंपन्यांच्या वाट्याचा नैसर्गिक वायू चोरल्याचा आरोप रिलायन्सवर झाला. त्याच्या खटल्यात पुढे काही झाले नाही. आज वृत्तवाहिन्यांपैकी निम्म्याअधिकांमध्ये रिलायन्सची मालकी आहे. वृत्तपत्रांमध्येही त्या कंपनीच्या विरोधात जाऊ शकेल असे कोणी नाही. अदानींची वाटचालही रिलायन्सच्या मार्गानेच चालू आहे. धीरुभाईंवर 1980 च्या दशकात झाली तशी टीका सध्या अदानींवर होत असते. राहुल गांधींसारख्या नेत्यांपासून पत्रकारांपर्यत अनेक जण त्यांच्या विरोधात बोलत असतात. पण त्याचा ढिम्म परिणाम झालेला नाही. अदानींचा प्राण शेअर बाजारात गुंतलेला आहे. त्याच्यावर हल्ला होताच फडफड झाली. पण ती तात्पुरतीच ठरण्याची शक्यता अधिक.