हा कसला आक्रोश?

मुंबईत रविवारी हिंदू संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्यात आणि केंद्रात सध्या भाजपचेच राज्य आहे. असे असताना हा मोर्चा काढण्याची का गरज पडली असा प्रश्‍न आहे. तथाकथित लव्ह जिहादचा निषेध करणे आणि धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करणे हे या मोर्चाचे दोन प्रमुख उद्देश होते. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन आठ वर्षे झाली. असे असूनही धर्मांतर हा प्रश्‍न मोर्चा काढण्याइतका ज्वलंत कसा झाला याचे उत्तर मोदी-शाहांच्या भाजपने द्यायला हवे. मुळात मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी यांचा विवाह म्हणजे लव्ह जिहाद हा अत्यंत विषारी प्रचार आहे. त्याच्या विरोधात असे रान उठवणे म्हणजे खरे तर समाजात तेढ उत्पन्न करण्यासारखे आहे. तसे गुन्हे या मोर्चेकर्‍यांवर दाखल करायला हवेत. पण राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभाल लोढा हे या मोर्चाचे प्रचारक असल्यावर आणि भाजपचे अनेक आमदार आणि खासदार त्यात सहभागी असल्यावर पोलिसांना काही कारवाई करण्याची हिंमत कशी होणार? याच मोर्चात राजा सिंग नावाच्या हैदराबादच्या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराचे भाषण झाले. तेलंगणा भाजपने त्याच्या वक्तव्यांमुळे त्याला पक्षातून काढून टाकले आहे. पण या मोर्चासाठी मात्र त्याला आवर्जून बोलावण्यात आलेे. त्यानेही या निमंत्रणाचे सार्थक करून विषारी फूत्कार टाकले. मुसलमान दुकानदारांकडून वस्तू घेणे बंद करा, मुस्लिमांशी संबंध ठेवू नका असे आवाहन त्याने जमलेल्या लोकांना केले. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांनी जेव्हा मुंबईत मोर्चा काढला तेव्हा त्याला शेवटच्या क्षणापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. शिवाय, मोर्चावर अनेक बंधने घालण्यात आली होती. आता राजा सिंग यांच्यासारख्यांची वक्तव्ये आणि मोर्चातल्या भडकाऊ घोषणा कोणत्या कायद्यात बसतात हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे. धर्मांतर हा जणू देशापुढचा सर्वात ज्वलंत प्रश्‍न असल्याप्रमाणे हे सर्व चालले आहे. देशाचे सोडा, महाराष्ट्रात किती धर्मांतरे झाली आणि किती आंतरधर्मीय विवाह झाले याची आकडेवारी सरकारने जाहीर करायला हवी. यापूर्वी राज्यात तीस ठिकाणी असेच मोर्चे निघाले. त्यात मध्यमवर्गीय महिलांचा सहभाग मोठा होता. गेल्याच आठवड्यात नांदेडच्या शुभांगी जोगदंड या वैद्यकीय विद्यार्थिनीला जातीबाहेरील मुलाशी मैत्री केल्याबद्दल तिच्या बापाने ठार मारले. हिंदू समाजाअंतर्गत अशा घटना अक्षरशः रोज घडत असतात. पण त्याविरुध्द आक्रोश करावा असे या महिलांना कधी वाटत नाही. याखेरीज महागाई, बेकारी, शिक्षण न घेता येणे असे अनेक प्रश्‍न मुली व महिलांसमोर आहेत. पण त्याविरुध्द असे मोर्चे कधीही निघालेले नाहीत. समाजात फूट पाडणार्‍या या राजकारणासाठी महिलांचा हा होत असलेला वापर चीड आणणारा आहे.

Exit mobile version