आता दिवस पूर्वीसारखे राहिले नाहीत असे प्रत्येकच पिढीला वाटते. कुटुंबांमध्ये प्रेम राहिले नाही, माणसे प्रामाणिक उरली नाहीत असे सर्वजण म्हणतात. या संदर्भात ते उच्चारले जाते. अलिकडे ते हवामानालाही लागू होऊ लागले आहे. जागतिक तापमानवाढ वगैरे विषय कालपरवापर्यंत निव्वळ प्राध्यापकांच्या चर्चेचे आहेत असे लोकांना वाटे. आता त्याचा फटका आणि चटका सर्वसामान्यांना रोज बसू लागला आहे. पूर्वी ठराविक चार महिन्यांच्या बाहेर क्वचितच पाऊस पडे. गेल्या काही वर्षांपासून बाराही महिन्यांमध्ये एकदा तरी कुठे ना कुठे पाऊस पडतोच असा अनुभव येऊ लागला आहे. यंदा थंडी आरंभी थोडाच काळ टिकली. नंतर हवामान ढगाळ राहिले. मग तिचा जोर वाढला. कोकणासारख्या समुद्रालगतच्या प्रदेशातही दीर्घ काळ गारठा राहिला. त्यानंतर एकाएकी तापमान वर गेले. फेब्रुवारीत उन्हाळ्याचा विक्रम नोंदवला गेला. मग पुन्हा काही काळ तापमान खाली गेले. मार्चमध्ये गारपीट आणि पाऊस सुरू झाला. एप्रिल हा वसंत आणि ग्रीष्माचा महिना. पण एरवी पडत नाहीत अशा कोकणासारख्या प्रदेशातही काही ठिकाणी गारा पडल्या. अवकाळी पाऊस हे संबोधन आता बदलायचीच वेळ येईल इतक्या वेळा पाऊस येऊ लागला आहे. एकाएकी तापमानात होणारी वाढ आणि त्यानंतर पडणारा पाऊस हे नित्याचे चक्र झाले आहे. सध्या सर्वत्र कडक उष्म्याच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी कोकणासह काही भागांमध्ये आठवडाअखेर पावसाची शक्यताही व्यक्त केली गेली आहे. राज्यातील शेतकर्यांना याचा जबर फटका बसला आहे. एकट्या रायगड जिल्ह्यात मार्च महिन्यात अकराशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात फळे व भाजीपाल्याचाही समावेश आहे. आंब्यावर अनेक कुटुंबांची भिस्त असते. त्यांचे गणित कोलमडले आहे. एका बातमीनुसार, आंब्याची प्रतिहेक्टर उत्पादकता तीन टनांऐवजी जेमतेम वीस टक्के म्हणजे सहाशे ते सातशे किलो इतकीच राहील असा अंदाज आहे. त्या प्रमाणात शेतकर्यांचे उत्पन्नही कमी होईल हे उघड आहे.
राजकारण स्थगित करा
जगभर हे सर्वत्र असेच घडत आहे. त्यावरच्या उपायांची चर्चा चालू आहे. आपल्या देशात मात्र माध्यमे आणि राजकारणी अखंडपणे फडसूस विषयांवर बोलत आहेत. महाराष्ट्रात तर गेल्या काही वर्षांपासून वृत्तवाहिन्यांनी नवीनच खेळ सुरू केला आहे. संजय राऊत किंवा तत्सम लोक रोज सकाळी एखादे विधान करतात. मग त्या विधानावर प्रत्येक पक्षाचा नेता काहीतरी शेरेबाजी करतो. कॅरमच्या सोंगट्यांसारखे एकाच्या विधानाला दुसर्याने टिचकी मारायची असे दिवसभर चालू राहते. हे म्हणजेच राजकारण असा सर्वांचा समज झाला आहे. हा बिनभांडवली धंदा राजकारणी आणि माध्यमे या दोहोंच्याही सोईचा झाला आहे. इतर काहीच करायला नसलेले लोक यामध्ये करमणूक मानून घेतात. मध्यंतरी राज्यातले उद्योग प्रकल्प इतरत्र गेले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली. ती आजतागायत निघालेली नाही. राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये इतका अवकाळी पाऊस झाला, त्यातून असंख्य प्रश्न निर्माण झाले. अजितदादा पवार यांनी त्यापैकी एकाचा काल उल्लेख केला. बारदानांअभावी हरभरा किंवा अन्य पिकांची सरकारी खरेदी काही ठिकाणी थांबली आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. पण ही बातमी दाखवण्यासाठी माध्यमांना फुरसत नाही. राजकीय नेत्यांनाही याबाबत आंदोलन करावे असे वाटत नाही. जनतादेखील, हे असेच चालू राहणार असे म्हणून ही स्थिती स्वीकारून पुढे चालत आहे. एक प्रकारचा गोठलेपणा वातावरणात आला आहे. मुद्दा असा की, वातावरण बदल ही अत्यंत गंभीर बाब आहे. येत्या काळात ते लक्षात घेऊन शेतकर्यांना आपल्या पिकांमध्ये आणि तंत्रांमध्ये बदल करावा लागणार आहे. पाऊस पडल्या पडल्या लगेच पेरणीची घाई करू नका असे जाणकार सांगत आहेत. कदाचित पेरणीचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागेल.
महाराष्ट्राने मार्ग दाखवावा
काही ठिकाणी पारंपरिक पिके घेणे थांबवावे लागेल. आंबा ही आजवर कोकणाची ओळख होती. पण आता त्याला सर्व बाजूंनी स्पर्धा सुरू झाली आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी प्रदेशातील केसर आंब्याने बाजारात शिरकाव केला आहे. खेरीज कर्नाटक व दक्षिणेकडून आधी तयार होणार्या आंब्याने हापूसला दणका दिला आहे. यंदा देवगड हापूसचे उत्पादन कमी होऊनही मुंबई बाजारावर त्याचा परिणाम झाला नाही तो त्याचमुळे. कोकणातील आंब्याला सर्वाधिक त्रास हा लहरी हवामानामुळेच झाला आहे. हीच स्थिती सोयाबीन, कापूस, संत्री, द्राक्षे इत्यादी पैसे मिळवून देणार्या इतर ठिकाणच्या पिकांची आहे. हे विषय केवळ शेतकर्यांपुरते मर्यादित नाहीत. त्यांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर व पर्यायाने सर्वांच्याच जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यांची चर्चा सर्व समाजाने करायला हवी. विधिमंडळातही व्हायला हवी. किंबहुना, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून केवळ याच मुद्दयांवर विचारविमर्श केला जायला हवा. त्यात नेहमीचे राजकारण पूर्णतः बाजूला ठेवायला हवे. आजवर आपण असे कधीही केलेले नाही. पण आजवर अशा प्रकारच्या उष्णतेच्या लाटा, गारपिटी आणि ढगफुटीचे वर्षावही आपण कधी पाहिलेले नव्हते. आता ते वारंवार घडत आहेत. हे बदल का होत आहेत याचा उलगडा शास्त्रज्ञांना पुरतेपणी झालेला नाही. मात्र याची सर्व कारणे उलगडतील व त्यावर अचूक उत्तर सांगता येईल असे नजीकच्या काळात घडणे असंभव आहे. हवामान हे पृथ्वीला व्यापून असणारे घटित आहे. लाखो बारीकसारीक घटकांमुळे त्यात सतत बदल होऊ शकतात. हे लक्षात घेता कोणत्याही एका क्षणी त्याच्यावर कायमचे उत्तर मिळाले असे होऊ शकणार नाही. सध्या जी स्थिती आहे त्यावर मार्ग काढतच पुढे जावे लागणार आहे. सध्या तरी आपापल्या भागापुरता विचार करून या बदलांमुळे नुकसान कमी कसे होईल याचा विचार करावा लागणार आहे. महाराष्ट्राने यात पुढाकार घेऊन देशाला मार्ग दाखवून द्यायला हवा.