एकीकडे राज्यावर दुष्काळाचे सावट असताना राजकीय पक्षांच्या सभांना मात्र पूर आलेला आहे. एक जून ते 26 ऑगस्ट या काळात राज्यभरात आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. आकड्याच्या दृष्टीने ही तूट फार मोठी वाटत नसली तरी जमिनीवरचा तिचा परिणाम गंभीर आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरण क्षेत्रात पाऊस इतका कमी झाला आहे की कृष्णा नदी कोरडी पडली आहे. गेली काही वर्षे याच हंगामात जिथे कायम पुराची स्थिती असे तिथे आता दुष्काळाच्या गडद सावल्या आहेत. सांगलीत पन्नास टक्केदेखील पाऊस झालेला नाही. नगर जिल्ह्यात जेमतेम साठ टक्के पाऊस झाला आहे. तीच स्थिती मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांची आहे. आता पुढच्या सुमारे दीड महिन्यात परतीचा पाऊस चांगला होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याने पाण्याचा प्रश्न कदाचित सुटेल. पण खरिपाचे बरेचसे पीक गेल्यात जमा आहे. अनेक भागात सोयाबीनसारखी पिके या ऐन पावसाळ्यात शिंपणे करून जगवावी लागत आहेत. कोकणात तुलनेने बरी स्थिती असली तरी अनेक भागात आठ ते दहा आणेच पीक येईल अशी अवस्था आहे. रायगडात गेले दोन दिवस मधून मधून पाऊस होतो आहे. पण त्यातून भात पीक वाचणार का हे पाहावे लागेल. हे चालू असताना सत्तारुढ पक्षाचे लोक राजकीय मेळावे भरवण्यात मग्न आहेत. त्यामुळे विरोधकांनाही त्याला प्रत्युत्तर द्यावे लागते आहे. रविवारी मराठवाड्यात परभणीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आणि राज्याच्या कारभाऱ्यांची सभा झाली. नंतर बीडमध्ये अजित पवारांच्या गटाची जंगी सभा झाली. दुपारी हिंगोलीत उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यापूर्वी शनिवारी बारामतीत अजितदादांचा जंगी नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्यावर जेसीबीमधून फुले उधळण्यात आली. जनता ज्या दुःखामधून जाते आहे त्याच्याशी आपला जणू काही वास्ताच नाही अशा रीतीने हे सर्व चालले आहे.
दैवताचे वाभाडे
या सभांमध्ये सत्तारुढ नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीतरी बोलतात. भरमसाठ आश्वासने देतात. पण मुख्य उद्देश असतो तो राजकीय प्रचाराचा. आणि, सध्या प्रचार म्हणजे विरोधकांवर कोणत्याही थराला जाऊन आरोप करणे असे समीकरण झाले आहे. बीडच्या सभेत शरद पवारांवर हल्ला चढवण्यात आला. काही दिवस आधी बीडमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी धनंजय मुंडे इत्यादींवर काही आरोप केले होते. त्याची सव्याज परतफेड करण्यात आली. मुंडे किंवा छगन भुजबळ इत्यादी नेते एरवी शरद पवारांना दैवत, विठ्ठल असे म्हणत असतात. पण रविवारच्या सभेत या दोघांनीही या दैवताचेच वाभाडे काढले. बीड जिल्ह्यासाठी शरद पवारांनी केले काय असा सवाल मुंडे यांनी केला. तर भुजबळांनी आपल्यावर झालेल्या कथित अन्यायांचा पाढा वाचला. तेलगी प्रकरणात आपला संबंध नसतानाही पवारांनीच आपल्याला राजीनामा द्यायला भाग पाडले, भाजपशी चर्चा करायला पवारच आम्हाला पाठवत होते असे अनेक आरोप त्यांनी केले. या आरोपकर्त्यांची गंमत अशी आहे की ते आपल्यावर जणू फक्त अन्यायच झाला असे भासवत आहेत. प्रत्यक्षात भुजबळ शिवसेनेतून आणि मुंडे भाजपमधून काँग्रेस व राष्ट्रवादीत आले. त्याचे बक्षिस म्हणून मूळ पक्षातील अनेकांना डावलून यांना उपमुख्यमंत्रिपद, प्रदेशाध्यक्ष किंवा विधानपरिषदेचे नेते अशी पदे दिली गेली. भुजबळांना अशी पदे मिळाल्याने एकेकाळी अजितदादाही नाराज होते. तर हे सर्व जण मिळून प्रफुल्ल पटेलांवर चिडून होते. आपण सत्तेसाठी हपापलेलो नाही असे अजितदादा कालपरवा म्हणाले. एकीकडे सत्ता नसेल तर विकास करता येत नाही असे म्हणायचे, त्यासाठी पहाटेचे शपथविधी करायलाही तयार असायचे आणि दुसरीकडे आपल्याकडे सत्तेची हाव नाही असे सांगायचे हा मोठा विनोद आहे. भाजपसोबत जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपद व नंतर सर्वांना डावलून अर्थमंत्रिपद कसे पदरात पाडून घेतले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.
भाजपच्या दट्ट्यामुळे
हेच दादा आता पुण्यात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना डावलून अधिकाऱ्यांच्या सभा घेत आहेत. सुपर पालकमंत्री असे म्हटलेले त्यांना आवडते आहे. भुजबळ, वळसे, मुंडे या सर्वांनाच महत्वाची खाती मिळालेली आहेत. त्यापायी एकनाथ शिंदे गटाला डावलण्यात आले. भरत गोगावले यांनी तर मंत्रिपदाचे नाव घेणेही सोडून दिले आहे. राष्ट्रवादीची ही सर्व मंडळी राजकारणात आजवर शरद पवार यांच्यामुळेच तरली होती. आता सत्तेसाठी त्यांना सोडून दिल्यावरही पवारांनी आपल्यावर टीका करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. पवारांच्या नाशिक, बीड, कोल्हापूर इथल्या सभांना मिळालेल्या प्रतिसादामुळे ते घाबरलेले आहेत. दुसरीकडे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीत होणारी वाढ हा भाजपच्या चिंतेचा विषय आहे. अलिकडेच इंडिया टुडे गटातर्फे लोकमताचे जे सर्वेक्षण करण्यात आले त्यात देशभरात भाजप व एनडीएला बहुमत मिळेल असा कल व्यक्त झाला आहे. महाराष्ट्रात मात्र भाजप-शिंदे गट व दादा गट हे मिळूनही लोकसभेला जेमतेम वीस ते तेवीस जागा मिळवतील असा अंदाज व्यक्त झाला आहे. राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा आम्हीच जिंकणार असे भाजपचे नेते मोठ्या तोंडाने सांगत आहेत. पण त्यात दम नसल्याचे या सर्वेक्षणाने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे याच वृत्तसमुहाच्या आधीच्या सर्वेक्षणांमध्ये आणि इतर वाहिन्यांच्या कलचाचण्यांमध्येही भाजपला महाराष्ट्रात फटका बसेल हाच अंदाज वारंवार व्यक्त झाला आहे. त्यामुळेच शरद पवारांवर अधिकाधिक
चिखलफेक करण्याचे दादा गटावरील दडपण वाढू लागले आहे. शरद पवारांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये मोदी सरकारवर कडाडून टीका केली. त्यांच्याविषयी संभ्रम कमी झाला. त्यामुळे मग आता दादा गटाकरवी त्यांची जुनी पापे उगाळली जात आहेत. पुढील निवडणुकीपर्यंत आरोपांचा आणि टीकेचा हा पाऊस असाच चालू राहणार आहे. खऱ्या पावसाने पाठ फिरवलेली असताना जनतेला खोट्या पावसाचा हा पूरही सहन करावा लागणार आहे.