गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी उसंत घेतली की काय असे वाटत असतानाच तो अधिक सक्रीय झाला आहे. आठवडाभरापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती आणि त्यामुळे राज्यातील अनेक भागातील तापमान अचानक बदलून वातावरणात झपाट्याने बदल झाला होता. सरासरीच्या खाली आलेले तापमान केवळ पुढे गेले नाही तर अनेक ठिकाणी ते तब्बल चार ते पाच अंशांनी वाढले. त्यामुळे एका बाजूला उन्हाचे चटके, उकाड्यात अचानक झालेली वाढ यामुळे ऑगस्ट संपताना पाऊस पूर्ण विश्रांती घेणार की काय आणि थेट गणेशोत्सवातच त्याचे पुनरागमन होईल की काय, असे वाटत होते. या बदललेल्या वातावरणाने आजारपणेही वाढली होती. राज्यातील अनेक भागात ऑगस्टच्या प्रारंभी असलेले पावसाळी वातावरण शेवटच्या आठवड्यात अचानक बदलून गेले होते. परंतु, तेव्हाच हवामान खात्याने पुढचे चार दिवस पाऊस पडेल असा अंदाज वर्तवत 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला. मात्र त्यानंतर पावसाचा त्या नंतरच्या आठवड्यातही जोर राहिला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या परिणामामुळे महाराष्ट्रात चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदीसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र या सक्रीय पावसाने रायगडमधील मुरूड तालुक्याला सर्वाधिक झोडपले आणि धोकादायक परिस्थिती निर्माण केली. या तालुक्यातील येसदे, साळाव, सुरई परिसरात सोमवारी रात्री अचानकपणे झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजला. बोर्ली बाजारपेठेत या पावसाचे पाणी वेगात शिरल्याने पूर्ण बाजारपेठच जलमय होऊन गेली. त्यामुळे व्यापार्यांचे आर्थिक नुकसान झाले. ज्या दुकानात फ्रीज, इलेक्ट्रीक उपकरणे, झेरॉक्स सारखी विद्युत उपकरणे होती, त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच किराणा मालाच्या दुकानातील धान्य, कडधान्य, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचेही पुराच्या पाण्याने सगळे वाया गेल्याने नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे त्या रात्रीच दरड कोसळून येसदे ते शिरगाव या मुख्य रस्त्यावर चिखल झाला. रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झालेला हा पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता. या ढगफुटीसदृश्य पावसाने या परिसरात जणू थैमानच घातले. त्यामुळेच मुख्य रस्त्यालगतच्या डोंगरातून रात्रीपासूनच डोंगरातील माती वाहत रस्त्यावर आली आणि त्यामुळे साळाव चेकपोस्ट ते रोहा तसेच मुरूड रस्ताच बंद झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शिरगाव ते बोर्ली या वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर प्रचंड वेगाने पाणी डोंगरातून खाली आल्याने आणि ते मातीसह वाहून समुद्राकडे जात असल्याने सगळीकडे चिखलच चिखल निर्माण झाला. त्यात या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने तसेच त्याबरोबरच मोबाईलच्या टॉवरशी संपर्क तुटल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. पहाटे चार-पाच वाजता पाऊस थांबला खरा, परंतु या अतिपावसाने केलेल्या मार्यामुळे डोंगरातून खाली येत राहिलेला चिखल दुपारी बारा वाजेपर्यंत सुरूच होता. पाऊस थांबला तेव्हा पाण्याची पातळी सहा फुटापर्यंत गेलेली होती. मुरुडमध्ये मुसळधार पावसाने अचानक धारण केलेल्या उग्र स्वरूपामुळे गारंबी व खारअंबोली येथून प्रचंड पाण्याचे प्रवाह निर्माण झाले. त्यामुळे एकदरा येथील चार बोटी व मुरुड येथील एक अशा पाच बोटी वाहून गेल्या. त्यातील तीन बोटींना वाचवण्यात यश आले तर दोन बोटींना जलसमाधी मिळाली. मुरुड शहरातील भोसले वाडी, लक्ष्मी खार, शेगवाडा परिसरात अनेक घरातही पाणी शिरले. या अचानक वाढलेल्या पावसामुळे वित्तहानी आणि गैरसोय झाली तरी कोणतीही प्राणहानी झाली नाही, ही जमेची बाजू आहे. तसेच अनेक ठिकाणी या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे तसेच राज्यातील अनेक दुष्काळग्रस्त भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदा सुटणार आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पावसाचा हा वाढलेला जोर या शनिवारपर्यंत असणार आहे. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण, सातत्याने पावसाचा मारा तीव्र होत चालला असून ढगफुटीच्या अनेक घटना घडत आहेत. राजापूरमध्येही असाच पाऊस झाला. मात्र, धरणे, समुद्र, नद्या यांच्या आसपासच्या गावांत ही सतर्कता अधिक हवी. कारण, भरतीची वेळ, धरणाचे अतिरिक्त पाणी आणि पावसाचे आकस्मिक आक्रमक स्वरूप यामुळे संकटग्रस्त परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.
पाऊस पुन्हा सक्रीय

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025