। राजापूर । वृत्तसंस्था ।
गेले महिनाभर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवाला अवघे चार दिवस असताना सोमवारी शहर आणि तालुका परिसरात जोरदार पुनरागमन केले आहे. संततधार पडणार्या पावसामुळे सोमवारी शहर बाजारपेठेत गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. पुराच्या पाण्याने सात ते आठ दिवस मुक्काम केल्याने भातशेतीसह रस्ते, पायवाटा, पूल, साकव यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. दिवसभरात एक दोन सरीवर पाऊस सुरू होता. मात्र रविवार सायंकाळपासून पावसाने पुन्हा एकदा संततधार धरली आहे. सोमवारी सकाळ पासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.