संकटाच्या काळात सर्वांचा पोशिंदा असलेला बळीराजा निसर्गाच्या लहरीपणापुढे पुन्हा एकदा हतबल होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे संकट अधिक काळ सुरू राहिल्यास त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागू शकतात. यंदा उत्तम पावसाच्या भाकिताची प्रचीती येऊन सुखावलेल्या शेतकर्यांपुढे पावसाच्या पहिल्या महिन्यातच संकट उभे राहिले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाने अंदाजाच्या एक दिवस आधीच राज्यात हजेरी लावली होती. ती दमदार होती आणि त्याला तेंव्हा वादळाचे सावट असले तरी पुढे निरंतर होत गेलेल्या पावसाने बळीराजा सुखावून गेला होता. मात्र दोन आठवडे संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्यावर पुढे संकटाची चाहूल लागली. हवामान तज्ज्ञांच्या वतीने शेतकर्यांना पेरण्या करताना सावध राहण्याचा इशारा दिला गेला. दुर्दैवाने हा इशारा खरा ठरला आणि मोसमी पावसाने गेला आठवडाभर रुसवा धरला. परिणामी पेरण्या खोळंबल्या आणि शेतीसमोर निसर्गाचे दुसरे आव्हान उभे राहिले आहे. लवकर पाऊस सुरळीत नाही झाला तर त्याचे परिणाम प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होऊन, पुरवठा घटून महागाई वाढण्याची भीती नाकारता येत नाही. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे आधीच सर्वजण अर्थचक्र बिघडल्याने चिंतेत आहेत. दुसर्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत खूप अधिक जणांना प्राण गमवावे लागले आणि अनेक जण त्यांच्या आप्तांना गमावून बसले. अशा चिंताजनक वातावरणात सगळे नैराश्याने घेतलेले असताना तिसर्या लाटेचा इशाराही दिला गेला असल्याने हे चिंतेचे वातावरण गंभीर बनले होते. त्यामुळे, या नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस वेळेत येण्याच्या भाकिताने शेतकरी सुखावला होता. त्यात सुरुवातीलाच पाऊस जोरदार बरसल्याने तो उत्साहात आला. कारण चांगला पाऊस म्हणजे उत्तम पीकपाणी. परंतु आता गेले आठ दहा दिवस पावसाने आपला प्रारंभीचा जोश पूर्णतः बाजूला ठेवून एकदम क्षीण रूप धारण केल्याने त्याच्या आकांक्षेवर पाणी फेरले जाण्याची चिंता त्याला ग्रासते आहे. त्यातल्या त्यात एकंदर राज्याचे चित्र पाहता कोकण मध्ये पाऊस ठीक आहे, मात्र उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग चिंतेत आहे. अद्याप किमान एक आठवडा तरी मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होण्याची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने ही चिंता अधिक गडद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रारंभीच्या अपेक्षेनुसार पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्या मध्यावर आल्या असताना पावसाने पाठ फिरवली. आठवडाभर पाऊस नाही आणि पुढची स्थिती अनिश्चित असल्याने त्या वाया गेल्यातच जमा आहेत. तीच बाब विदर्भाची. तूर, मूग, कापूस पिकांचे माहेरघर असलेल्या या प्रदेशात देखील सुमारे निम्म्याच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यात पेरणीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याच्या कारणाने आणि आता पावसाच्या सरींनी विश्रांती घेतल्याने तेथे शेतकरी वाट पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात कमी ते जेमतेम अशा प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे तोही प्रदेश शेतकर्यांसाठी संकट आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात समाधानकारक स्थिती कोकण व रायगड मध्ये आहे असे म्हणायला हवे. कारण या भागात अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. सगळीकडे सारखा नसला तरी भाताच्या पिकासाठी पुरेसे पाणी भरले जात आहे. त्यात लावलेल्या पेरण्या वाया जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. पेरण्यांची कामे सातत्याने सुरू आहेत. हा निम्म्या जगाला आपल्या कवेत घेऊन, आपल्या मर्जीनुसार वागायला लावणारा मान्सून कधी आपले संपूर्ण रूप माणसापुढे उघड करणार काय माहिती. गेली अनेक वर्षे मान्सून यंदा कसा वागेल याचे मॉडेल मांडले जाते पण दरवर्षी मान्सून आपल्याला चकवा देतो. देशातील एक ज्येष्ठ हवामान विषयक शास्त्रज्ञ डी. शंकर यांनी काही वर्षापूर्वी एका चर्चासत्रात सांगितले होते की आपल्याकडे गेल्या जवळपास दीडशेहून अधिक वर्षांचा डेटा आहे, त्याची माहिती नोंदलेली आहे परंतु आपण त्यात कोणतेही पॅटर्न पाहू शकलो नाही. अर्थात आपण त्याचे आगमन आणि त्याची पुढील देशभरातील वाटचाल याबाबत अधिक सातत्याने पाठपुरावा करू शकतो. गोवारीकर पॅटर्न सारखे निकष आपण काढले. तरी हा मान्सून आपल्याला हुलकावणी देतच असतो. आपला बळीराजा मान्सूनच्या लहरीपणापुढे हार मानत नाही हेच सर्वात मोठे यश आहे. लवकरच पाऊस सुरळीत होवो आणि सगळ्या महाराष्ट्रभर उत्तमपीक पाणी होवो, हीच प्रार्थना.