तिसर्‍या लाटेचे लसीकरण

गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण होताना दिसत आहे तर त्याचबरोबर तिसर्‍या लाटेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आकडेवारी कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत असले तरी ती घसरत आहे, असेच दिसते. रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाणा आता 97.58 टक्क्यांवर पोहोचले आहे तर गेल्या जवळपास तीन महिन्यांत रुग्ण बरे न होण्याचे प्रमाण तीन टक्क्यांच्या खालीच आहे. तशात देशातील कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या 75 कोटींवर पोहोचली असून देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे अभिनंदनही केले आहे. अशा परिस्थितीत तिसर्या लाटेबद्दल निश्‍चितपणे काहीतरी सांगता यायला हवे. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाखाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असतानाच तिसर्‍या लाटेचे संकेत देण्यात येत होते. ते अजूनही विविध प्रकारे दिले जात आहेत. त्याबद्दल विविध अभ्यासू मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने विश्‍लेषण करीत असून वेगवेगळी संभाव्य चित्र उभे करीत आहेत. त्यात ही लाट येण्याची शक्यता कमी आहे आणि ती आली तरी तिचा प्रभाव मर्यादित असेल, हे चित्र अधिक आशादायक आणि तार्किक वाटते. वेगात होत असलेले लसीकरण हे या आशादायक तर्काच्या मुळाशी आहे. गंभीर आजारपण टाळण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. दुसर्‍या लाटेचे कारण पहिल्या लाटेत लसीची उपलब्धता नव्हती. दुसर्‍या लाटेतही त्या लसीच्या पुरवठ्याबाबत मोठ्या अडचणी होत्या. गेल्या तीन महिन्यातील डेल्टा विषाणूच्या प्रादुर्भावाची माहिती घेतली असता, असे आढळून आले आहे की ज्यांचे लसीकरण झाले, त्यांच्या तुलनेत लसीकरण न करण्यात आलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण तब्बल सातपटींनी अधिक होते. म्हणजे आधीच्या विषाणूंच्या जातीवर ही लस जितकी परिणामकारक ठरली, तितकीच ती डेल्टा विषाणूतही परिणामकारक दिसून आली, हे या अभ्यासाचे फलित आहे. देशातील सुमारे नऊ राज्यांतील 32 हजार व्यक्तींच्या कोरोना संसर्गाचे विश्‍लेेषण करून हा अभ्यास करण्यात आला. तिसरी लाट डेल्टा प्रकारच्या विषाणूमुळे अधिक तीव्र व भीषण होईल, असे म्हटले जात आहे. त्या पाश्‍वर्र्भूमीवर हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे आणि तिसरी लाट भीषण नसेल, या तर्काशी जुळणारा हा अभ्यास आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील अभ्यासक प्राध्यापक ज्ञानेश्‍वर चौबे यांच्या मते, लसीकरण झालेल्या लोकांसाठी, विषाणूपासून बरे झालेल्या व्यक्ती आणि लहान मुले, यांच्यासाठी कोरोनाची तिसरी लाट कमी प्राणघातक असेल. कारण, लस घेतलेले आणि कोरोनातून बरे झालेले लोक तिसर्‍या लाटेत संरक्षित गटात असतील. त्यांच्या मते, ही तिसरी लाट लवकरात लवकर तीन महिन्यांनंतर धडकेल हे खरे असले तरी लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्याने या विषाणूचा प्रतिकार अधिक सक्षमपणे करता येईल. हा अंदाज जर खरा ठरला तर आतापर्यंत जे भीतीदायक चित्र दिसत होते, ते पुसले गेले आहे. अभ्यासकांच्या मते, लसीकरणामुळे शरीरात निर्माण होणार्‍या अँटीबॉडीजचे प्रमाण काही महिन्यांनी कमी झाल्यामुळे ही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. म्हणजे अँटीबॉडीज पुढील तीन महिन्यांत घसरले तरच तिसरी लाट येऊ शकते. तसेच, ज्यांची प्रतिकारशक्ती 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव फारसा दिसणार नाही. तिसरी लाट आली तरी त्यातील सकारात्मक बाब म्हणजे विषाणूचा प्रादुर्भाव थांबवता येत नसला तरी मृत्यूदर कमी केला जाऊ शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असे लक्षात आले तरी तो पुढे कमी होईल. लसीकरणातून संरक्षित झालेल्यांत मृत्यूचे प्रमाण खूप कमी असेल. मात्र लसीकरणात आपण 75 कोटींचा पल्ला गाठला आणि त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आपले अभिनंदन केलेले असले तरी आपण सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यापासून अजून लांब आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार याच वेगात लसीकरण सुरु राहिले तरी डिसेंबरपर्यंत देशातील केवळ 43 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होईल. तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षअखेरीस 60 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यावे लागतील. त्यामुळे सुरक्षेचे नियम पाळत राहण्याचा सल्ला दुर्लक्षित करू नये.

Exit mobile version