शिक्षणक्षेत्र सावरण्यासाठी प्रयत्न हवेत…

वैशाली गेडाम

कोरोना काळातल्या ऑनलाईन  शिक्षणाच्या प्रयोगाने शिक्षणविश्‍वाचं मोठं नुकसान झालं. शाळा सुरु झाल्या असल्या तरी कोरोनाच्या लाटांमधल्या धड्यांची उजळणी करत आपल्याला पुढील पावलं टाकावी लागणार आहेत. शिक्षणक्षेत्राने ऑनलाईन शिक्षणाच्या तंत्राशी जवळीक साधली का, ऑनलाईन शिक्षणाच्या नादात शिक्षण हरवलं की विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालं आदी प्रश्‍नांना सामोरं जाणं यामुळे आवश्यक ठरतं.
कोरोना ही महामारी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं अन् सारं जग ठप्प झालं. आपल्या देशातही वेगळं चित्र नव्हतं. रेल्वे, विमान, रस्ता वाहतूक बंद झाली, सरकारी-खासगी कार्यालयं ओस पडली, सारा देश घरबंद झाला. कोरोनाने शाळांची दारं बंद ठेवण्याची वेळ आली तेव्हा प्रारंभी विद्यार्थी, पालक आणि काही प्रमाणात शिक्षकही शांत राहिले. नंतर परिस्थिती सुधारू लागली तेव्हा ऑनलाईन शिक्षणाच्या प्रयोगाला सुरूवात झाली. या प्रयोगाशी जुळवून घेण्यात, सरावण्यात काही काळ गेला. प्रारंभी तर गोंधळाचं वातावरण होतं. कोरोनानं झालेलं मुलांचं स्थलांतर, रोजगार गेल्याने निर्माण झालेले प्रश्‍न, कौटुंबिक समस्या आदींची कल्पना नसतानाही सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रयोगात शिक्षकांना अणि विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. त्यातून बाहेर येत ऑनलाईनच्या  प्रयोगाशी जुळवून घेतल्यावर त्यातले विविध प्रश्‍न समोर येऊ लागले.                        
ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग सुरू झाला तेव्हा आवश्यक साधनसामग्री आहे की नाही याचा शोध घेण्यासही आपल्याकडे वेळ नव्हता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अवचित हा प्रयोग करण्याची वेळ आपल्यावर आली होती. घरोघरी ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी इंटरनेट अत्यावश्यक ठरतं. याबाबत राज्यात एक पाहणी केली तेव्हा धक्कादायकस्थिती आढळली. राज्यातील साठ ते सत्तर टक्के मुलांकडे इंटरनेट  नसल्याचं या सर्वेक्षणात आढळलं. त्यातच ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहचत नव्हतं. पारंपरिक शिक्षणात प्रत्यक्ष संपर्कातून, संवादातून शिक्षण देण्याबरोबर व्यक्तिमत्त्व विकसित होण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकिया घडत असते. मात्र, ऑनलाईन शिक्षणपध्दतीमध्ये या प्रकियेचा अभाव असल्यानं व्यक्तिमत्व फुलण्याऐवजी खुरटण्याची शक्यता अधिक. मात्र, याचा परिणाम भविष्यात समाज विकसित होण्यावर घडू शकतो, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे.    ऑनलाईन शिक्षण सुरू झालं तरी शिक्षणाची आपली पद्धत मात्र तीच परंपरागत होती. राष्ट्रगीत, शाळेचा पोषाख, हजेरी, होमवर्क, तीच पाठ्यपुस्तकंआदी नेहमीच्या व्यवस्थेतून हे शिक्षण सुरू झालं. मुलं राष्ट्रगीत म्हणत आहेत, क्लासला शाळेच्या ड्रेसमध्ये हजेरी लावत आहेत, अशा स्थितीत घरातले सदस्य आपल्या नेहमीच्या नित्य कार्यक्रमात गुतंलेले असत. हे चित्र परिणामकारक शिक्षणासाठी काही पूरक नव्हतं. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी नवा मार्ग शोधण्यासाठी वेळ नव्हता, काही प्रयोग करण्यासाठी उसंत नव्हती. या सार्‍या गोष्टी खर्‍या असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाला सरावल्यानंतरही काही वेगळे मार्ग निवडल्याचं आढळले नाही. कोरोनाने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचा परिणाम शिक्षणविश्‍वावर होऊन या काळात शाळा सोडणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला स्मार्टफोन देणं शक्य नसलेल्या घरांमध्ये एकच फोन वापरला जात होता. घरात एकापेक्षा अधिक मुलं असल्यास आळीपाळीनं फोन वापरण्याचा पर्याय वापरल्याने काहीजणांच्या शिक्षणाचं नुकसान झाल्याची उदाहरणं आहेत. त्यातच  फोनअभावी काहीजणांची शाळा सुटली. प्रांरभी पालकांनी एकडून तिकडून जमवाजमवी करत मुलांना फोन, संगणक उपलब्ध करून दिले. मागणी वाढल्यावर त्याच्या किंमतीही वाढल्याचं पहायला मिळालं. याच्या बरोबरीने इंटरनेट, मोबाईल रेंजचा प्रश्‍न निर्माण होऊन अखंड शिक्षणात व्यत्यय येऊ लागला. ग्रामीण, दुर्गम भागात या प्रश्‍नानं अनेक मुलं शिक्षणांपासून वंचित झाली आहेत. बर्‍याच वेळा मुलं-मुली रेंजच्या शोधात घराबाहेर फिरताना दिसत होते. एकदा एक मुलगी तर रेंजसाठी गावाजवळच्या डोंगरावर अभ्यास करत असल्याचंही वृत्त आलं. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या स्मार्टफोनसाठी किमान दहा हजार मोजावे लागतात. प्रत्येकाला घरातल्या सर्व पाल्यांना स्मार्ट फोन देता येणं शक्य होईलच असं नाही. आर्थिक स्थितीमुळे पालकांनी शिक्षणाऐवजी पाल्यांना कामाला जुंपल्याची उदाहरणंही काही कमी नाहीत. अर्थार्जनाच्या मार्गावर गेलेल्या या मुलांना कोरोनोत्तर काळात शिक्षणव्यवस्थेत आणणं हे एक मोठं आव्हान आहे. ग्रामीण भागात अजूनही मुलींकडेएक जबाबदारी म्हणून पाहिलं जातं. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहरे पडलेल्या मुलींची लग्नंही या काळात उरकून घेण्यात आली. अनेक ठिकाणी तर बालविवाहाच्या घटना घडल्या. या काळात शालेय मुलींच्या विवाहाचं प्रमाणही लक्षणीय असल्याचं आढळून आलं. दहावीचा निकाल लागल्यानंतर गुणपत्रिका घेण्यासाठी मुलं शाळेत आली तेव्हा किमान पाच-सहा मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं धक्कादायक दृश्य दिसलं. विवाहबंधनात अडकलेल्या मुली, अर्थार्जनाला जुंपली गेलेली मुलं पुन्हा शिक्षणव्यवस्थेत येण्याची शक्यता कमीच आहे.  ऑनलाईन क्लासवेळी मुलं शाळेच्या पोषाखात हजर राहत असताना घरात इतरांची कामं, हालचाली नेहमीप्रमाणे सुरू असायच्या. घरात इतरांची कामं सुरू असताना ही मुलं ज्ञानार्जन कसं करणार हा एक प्रश्‍नच आहे. कितीही केलं तरी घरांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होणं अशक्य आहे. ऑनलाईन क्लाससाठी वेगळी खोली देता येणं अशक्य आहे. प्रशस्त घरं असली तर एक वेळ शिक्षणासाठी वेगळी खोली देता येईल. मात्र देशात छोट्या घरांची संख्या अधिक असल्यानं ऑनलाईन शिक्षणाच्या प्रयोगात घरोघरी शैक्षणिक वातावरणाची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे. त्यातच दुरस्थ ऑनलाईन क्लासमध्ये शिक्षकांना प्रत्येकावर लक्ष ठेवणं अशक्य असतं. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अपेक्षाप्रमाणे होत नसल्याचंही आढळलं. प्रत्यक्ष शिक्षणाच्या तुलनेत ऑनलाईन शिक्षण तेवढं प्रभावी, परिणामकारक ठरत नसल्याचं आढळलं.
आजकालची पिढी मोबाईलच्या अधिन होत असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. या तक्रारीला ऑनलाईन शिक्षणानं बळ मिळालं असं म्हणण्यासारखी स्थिती काही ठिकाणी होती. कोरोनापूर्व काळात शाळा-हायस्कूलमध्ये मोबाईलला बंदी असायची. मोबाईल आणला तर तो जप्त केला जायचा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागायचं. ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्तानं मोबाईल थेट मुलांच्या हाती आला. मोबाईलचा गैरवापर होऊ नये यासाठी पाल्यांवर लक्ष देण्याची अतिरिक्त जबाबदारी पालकांवर आली. शिक्षणाच्या नावाखाली मोबाईलवर मुलं काय करतात, या काळजीनं पालकांचा जीव कासाविस होऊ लागला. त्यातच मोबाईलवरील शिक्षणाची पाल्यांची ग्रहणक्षमता कमी असल्यानं ऑनलाईन शिक्षण विकसित होऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं कंटाळवाणं असल्याचं लवकरच आढळून आलं.  यातून शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान होत असल्यानं विद्यार्थी, शिक्षक, पालक सगळेजण शाळांची दारं उघडा, अशी मागणी करू लागले. सरकारनंही तारतम्य दाखवत सावध पावलं टाकत शाळांची दारं उघडण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शिक्षणाला ऑनलाईन हा तात्पुरता पर्याय होता, ती त्या वेळेची गरज होती. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. कोरोना अनाकलनीय असल्यान भविष्यात आपल्यापुढे कोणती स्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण कसं मनोरंजक करता येईल, शिक्षण अधिक प्रभावीपणे  कसं पोहचवता येईल यावर विचार करायला हवा. 

Exit mobile version