जयंत माईणकर
सरहदों पर बहुत तनाव है क्या,
कुछ पता तो करो चुनाव है क्या,
और खौफ बिखरा है दोनों समतो में,
तीसरी समत का दबाव है क्या’
शायर राहत इंदोरीनी लिहिलेला हा शेर अगदी तंतोतंत लागू पडेल अशी घटना पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत घडवून आणल्या गेली आहे असं म्हणावं लागेल. निवडणुकीच्या आधीच सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरणार्या या घटना का घडतात. हाच प्रश्न पुलवामा घटनेच्या बाबतीत अनेकांनी विचारला होता. आणि आज तोच प्रश्न विचारला जात आहे. कारण मार्च महिन्यात भारतीय राजकारणात अतिशय महत्त्वाच्या अशा उत्तरप्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आणि भाजप आपल्याकडे राखण्यासाठी आणि काँग्रेसचे बंडखोर नेते माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या साथीने काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कदाचित त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एका छोट्या घटनेचं भांडवल केलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौर्यावर असताना फिरोजपूरला त्यांची राजकीय सभा होती. पण त्या सभेला जात असतानाच त्यांचा काफीला काही आंदोलकांनी हुसैनीवाला या गावाजवळ अडवला असा आरोप केला गेला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याचा कांगावा केला गेला. जिथे ही घटना घडली ती जागा भारत पाकिस्तान सिमारेषेपासून केवळ दहा किमी अंतरावर होता. पण यातील गंमतीची गोष्ट ही की सिमारेषेपासून 50 किमी पर्यंतचा परिसर सीमा सुरक्षा दलाच्या अखत्यारीत येतो. याआधी 15 किमीपर्यंत सीमा सुरक्षा दलाचा अधिकार असायचा. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने ही मर्यादा 50 किमी पर्यंत वाढवली. त्यावेळी या निर्णयाला काँग्रेसने विरोधही केला होता. पण ही घटना जर सिमारेषेपासून 10 किमी परिसरात घडली तर याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे, पर्यायाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे असते. देशाचे गृहमंत्री मोदींचे विश्वासूू अमित शहा आहेत. अर्थात फिरोजपुर घटना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्या भूभागावर घडली आहे. मग मोदी आणि शाह यांच्यातील सत्यपाल मलिक कथित बेबनाव तर या घटनेला कारणीभूत नाही अशीही शंका येते.
मात्र ही वस्तुस्थिती विसरून जणू काही या घटनेला केवळ काँग्रेस शासित पंजाब राज्य सरकार जबाबदार आहे असा सूर मोदींनी आळवला.
भटिंडा एअरपोर्ट वर अधिकार्यांशी बोलताना मोदी म्हणाले, आपल्या मुख्यमंत्र्यांना तुमच्या मुख्यमंत्र्यांना थँक्यू सांगा. मी भठिंडा विमानतळावर जिवंत परतू शकलो.
मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी आपल्या विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी या भाषेत बोलणं अयोग्य आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मोदींवर टीका करताना त्यांच्या ताफ्याचा रस्ता कसा वेळेवर बदलला हे सांगितले आणि कुठलीही हिंसक घटना घडली नाही याचीही आठवण करुन दिली. फिरोजपुरला होणार्या पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेला अपेक्षित गर्दी नसल्याने मोदींनी रॅली टाळल्याचही बोललं जातं. फिरोजपुरजवळ हुसेनीवला या गावी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं स्मारक आहे.
पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबला. पंतप्रधानांना सुरक्षा देणारे एसपीजीचे कमांडो बंदुका सरसावत मोदींच्या ताफ्यांभोवती कोंडाळं केलं तर पंजाब पोलिसांची धावपळ एक मोर्चा बाजूला करण्याची धावपळ सुरू झाली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी हे पंजाबमधल्या हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी 5 जानेवारीला भटिंडा इथे पोहचले. तेथून ते प्रत्यक्ष स्मारकाच्या इथे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याचा पर्याय टाळण्यात आला.
भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक ती सर्व पूर्तता करण्यात आल्याची खात्री केल्यानंतर ताफा हुसैनीवालाच्या दिशेने रवाना झाला.
मात्र हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. एरव्ही मोदींच्या ताफ्यात चिटपाखरूही शिरत नाही किंवा त्यांचा ताफा 2 मिनिटही माहितीशिवाय थांबत नाही. त्यामुळे हे लोक नेमके कोण होते की तथाकथित भाजप समर्थकच होते याविषयीही वादविवाद आहेत. पण या आंदोलकांमुळे मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावरच अडकला.
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची अधिक समस्या वाढू नये म्हणून मोदींच्या गाड्या मागे वळवुन भठिंडा विमानतळाकडे रवाना झाल्या. मोदींचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी पूर्ण काळजी घेण्यात आली होती असं पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलंय.
मात्र, ऐनवेळी रस्त्याच्या मार्गाने जायचा निर्णय घेतला गेल्याने ही घटना घडल्याचं चन्नी यांनी म्हटलं.
या संपूर्ण घटनेचा नीट विचार केल्यास अनेक प्रश्न उभे राहतात. आणि त्या प्रश्नात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आगामी उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील निवडणुका. त्यातच पंजाबमधील शेतकर्यांनी एक वर्ष आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करण्यात यश मिळवलं. त्यामुळे या दोन्ही राज्यात सहानुभूती मिळविण्यासाठी तर हा प्रयत्न नव्हता अशी रास्त शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर, पंतप्रधान पदावरील व्यक्तींनी एवढ्या छोट्या घटनेचा एवढा मोठा बागुलबुवा उभा करणं योग्य आहे का हाही एक प्रश्नच आहे. याआधी अनेक पंतप्रधानांच्या बाबतीत अशा घटना घडल्या मात्र त्यांनी त्याचा बागुलबुवा उभा केला नाही.
उदाहरणार्थ, 12 मार्च 1955 ला महाराष्ट्रात नागपुरात नेहरूंना मारण्यासाठी बाबुराव लक्ष्मण कोचले नावाचा रिक्षाचालक सहा इंची सुरा घेऊन त्यांच्या गाडीच्या आडवा आला. 30 सप्टेंबर 1961 ला नेहरूंच्या ताफ्याच्या मार्गावर जुन्या दिल्लीत बॉम्बस्फोट झाला.
9 फेब्रुवारी 1967 ला ओरिसात भुवनेश्वर इथं झालेल्या एका मेळाव्यादरम्यान इंदिरा गांधींवर दगड भिरकवण्यात आला. त्यात त्यांचं नाक फ्रॅक्चर झालेलं होत.
तर 30 ऑक्टोबर 1977 ला त्यांच्या मद्रास दौर्यावर द्रुमकनं बहिष्कार टाकला. इंदिरा गो बॅकचे नारे दिले, दगड भिरकावले, दंगे-जाळपोळ झाली. पुढे दुर्दैवाने ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर शीख सैनिकांना त्यांच्या विशेष अंगरक्षक दलात ठेवू नये, त्यामुळं त्यांच्या जीवाला धोका आहे अशी सूचना त्यांना वारंवार देण्यात आली होती, मात्र माझा माझ्या देशाच्या नागरिकांवर आणि सैन्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणत त्यांनी ही सूचना फेटाळून लावलेली.
3 ऑक्टोबर 1986 ला राजघाटावर गांधीजींच्या समाधीला वंदन करत असतांना करमजीत सिंघ नावाच्या एका व्यक्तीनं राजीव गांधींवर गोळीबार केला. गोळी शेजारीच उभा असलेल्या एका पोलीस अधिकार्याच्या कानाला चाटून गेली. 30 जुलै 1987 ला श्रीलंका दौर्यावर असतांना जेव्हा राजीव गांधी तिथल्या सैन्याची मानवंदना स्वीकारत होते तेव्हा एका नौसेनिकाने त्यांच्यावर त्याच्या रायफलच्या दस्त्याने हल्ला केला. राजीव गांधींनी न घाबरता हा दौरा पूर्ण केला.
पुढं जेव्हा ते प्रधानमंत्री पदावर नव्हते तेव्हाही त्यांना ‘लिट्टे’कडून धोका आहे हे माहिती असतांनाही त्यांनी भिऊन जनतेत मिसळणं, लोकांना जवळ करणं थांबवलं नाही. नेहरू, इंदिराजी आणि राजीवजी यापैकी एकानीही यातल्या कुठल्याही घटनेचं भांडवल केलं नाही.भारताच्या प्रधानमंत्र्यांना नेहमीच जीवाचा धोका राहिला आहे. त्यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील झालेत. इंदिराजी आणि राजीवजी हे दोघे तर अशा हल्ल्यात मारले गेलेत. 26 एप्रिल 2009 साली, तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग अहमदाबाद येथे एका प्रचार दौर्यावर होते. तेव्हा युवकाने त्यांच्यावर बुट फेकून मारला.सुदैवाने तो बुट त्यांच्यापासून काही अंतरावर जाऊन पडला.
मनमोहनसिंग यांना या गोष्टीचा बाऊ न करता स्थानिक पोलिसांना कडक सूचना दिल्या की, संबंधित तरुणावर कोणतीही कारवाई न करण्याची सूचना दिली. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी! या पाश्वर्र्भूमीवर पंजाबमधील छोट्याशा घटनेचा मोदींनी निवडणुकीसाठी बागुलबुवा उभा केला आहे असं वाटत! तुर्तास इतकेच!