प्रशांत किशोर ! रणनितीकार की पोकळ वासा?

जयंत माईणकर

‘चाय पे चर्चा’ या नरेंद्र मोदींच्या गाजलेल्या कार्यक्रमाचा जनक म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं ते म्हणजे प्रशांत किशोर! बिहारच्या बक्सर या मागासलेल्या गावातील एका डॉक्टरचा मुलगा असलेल्या या 44 वर्षीय तरुणाने गेल्या दहा वर्षात भारतीय राजकारणात poll strategist (मतदान रणनितीकार) म्हणून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. आता त्यांना िेश्रश्र ीीींरींशसळीीं म्हणायचं की भाडोत्री निवडणूक सल्लागार हाही एक प्रश्‍नच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहूल गांधी यांच्यापासून आप ते तृणमूल काँग्रेस अशा सुमारे आठ प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांनी निवडणूक रणनिती आखून देण्याचं काम केलं आहे. केवळ त्यांच्या रणनीतीमुळेच एखादा पक्ष जिंकला असं म्हणण्याचं धारिष्ट्य मी करणार नाही. कारण तस जर असत तर 2017 ला उत्तरप्रदेशात त्यांचे आडाखे का चुकले? त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आणि आपल्या कामाकडे ते केवळ एक व्यवसाय म्हणून पाहतात हेही म्हणणं अयोग्य! कारण 2018 ला त्यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) मध्ये प्रवेश केला आणि पक्षाचे उपाध्यक्ष बनले आणि पुढे तिथे मतभेद झाल्यानंतर त्यांना काढून टाकलं. याचा अर्थ त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. सध्या ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी ते उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते. पण केवळ त्यांच्या भेटीमुळेच ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला, असा जावईशोध मी तरी लावणार नाही. 2011 साली मोदींच्या संपर्कात येण्यापूर्वी आठ वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रकल्पात ते आफ्रिकेत काम करत होते. त्या काळात त्यांचा मोदींशी पत्रव्यवहार होता. गेल्या दशकाच्या सुरुवातीला मोदींनी त्यांना सरळ आपल्याबरोबर काम करण्याची ‘ऑफर’ दिली आणि त्यांनी ती स्वीकारली. मोदींना कुठेही फारशी प्रसिद्धी नसलेल्या नवख्या व्यक्तीला जबाबदारी देणं आवडत.कारण ही व्यक्ती मोदींच्या विरोधात फारशी जात नाही. नोटबंदीचा ‘तथाकथित’ सल्ला देणारे अनिल बोकील हेही त्याच पठडीतील. आपल्याला अभिप्रेत असणार्‍या गोष्टी करण्यासाठी एखाद्या नव्या संघटनेची छत्री उघडायची ही संघ परिवाराची जुनी स्ट्रॅटेजी! त्यानुसार प्रशांत किशोर यांनी प्रथम citizens for accountable governance, आणि नंतर Indian political Action Committee ( I P C ) या संघटनांची स्थापना केली. 2012 ची गुजरात विधानसभा निवडणुक मोदींच्या दृष्टीने यासाठी महत्त्वाची होती कारण ती त्यांची हॅटट्रिक ठरणार होती. आणि ती त्यांनी साधली असती तर त्यांचा 2014 साली पंतप्रधान पदावरचा दावा पक्का होणार होता. नेमकं याच वेळी भाजपचे माजी मुख्यमंत्री स्व केशुभाई पटेल यांनी गुजरात परिवर्तन पक्ष नावाचा पक्ष काढून मोदींसमोर आव्हान उभे केले होते. गोध्रा दंगलीमुळे मोदींची गुजरातमधील हिंदू जनतेवर पकड होतीच. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे 2012 ची निवडणूक जिंकली हे म्हणणं अतिरेकी वक्तव्य ठरेल. पण ही निवडणूक प्रशांत किशोर यांची पहिली कामगिरी. प्रशांत किशोर यांचा स्वतःचा मोठा कर्मचारी वर्ग निवडणूक कामात गुंतलेला असतो. एका विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी ते दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची नियुक्ती करतात. मतदारसंघातल्या प्रश्‍नांंवर आधारित एक प्रश्‍नावली तयार करून त्यावरील जनतेच्या अपेक्षा यावर एक रिपोर्ट तयार करतात. यामागे सुमारे दोन हजार व्यक्तींची टीम एखाद्या मोठ्या राज्याकरता असते. पण यात नवल ते काय? ही तर सर्वच पक्षांची स्ट्रॅटेजी आहे. मोदी पत्रकारांशी बोलत नाहीत. कारण पेचात पाडणार्‍या प्रश्‍नांना उत्तर देणं त्यांना आवडत नाही. म्हणून ते सोशल मीडियाचा वापर करतात. कारण इथे प्रश्‍न विचारण्याचा काही संबंधच नसतो. मोदी आपल्याला हवी ती कॉमेंट करतात आणि स्वतः दूर होतात. त्यानंतर मोदी समर्थक आणि विरोधक आपसात भांडत बसतात. अर्थात त्याची झळ मोदींना बसत नाही. याच पार्श्‍वभूमीवर 2014 च्या निवडणुकीत मोदींच ‘तथाकथित’ चहा विकण्याचं बॅकग्राउंड पाहून ‘चाय पे चर्चा’ ही एक संकल्पना प्रशांत किशोर यांच्या स्ट्रॅटेजीतून निघाली आणि ती हिट ठरली. या चर्चेत भाग घेणारे वेचक मोदी समर्थक असायचे . त्यामुळे मोदींना अडचणीत आणणारे प्रश्‍न विचारले जात नसत. देशाच्या विविध भागात होणारी ही चर्चा मोदींच्याही पथ्यावर पडत असे.चहावाला पंतप्रधान होणार या आपल्या प्रचारात ते यशस्वी ठरत होते. प्रशांत किशोर यांच्या दहा वर्षातील कामगिरीचा तो सर्वोच्च क्षण होता. पण याचा अर्थ या बिहारी तरुणाला कोणी संघाचा शिक्का लावणं सुद्धा योग्य नव्हतं.पुढे यांनी जगन रेड्डी (वाय एस आर काँग्रेस), अरविंद केजरीवाल (आप), एम के स्टालिन (डी एम के) नितीशकुमार न (जद यु) यांच्यासाठीच नव्हे तर काँग्रेससाठी पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड मध्येही काम केलं. आंध्रप्रदेश वेगळा झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत अर्थात जगन रेड्डी सरस ठरले ते त्यांनी दहा वर्षें केलेल्या कामामुळे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची पोकळी भरून काढायला फक्त एकच व्यक्ती समोर होती. ती म्हणजे एम के स्टालिन. अर्थात त्यांचा विजय सहज होता. बंगालमध्ये दीदींचा विजय हा कम्युनिस्ट आणि काँग्रेसनी आपली मते तृणमूल काँग्रेसकडे वळवली म्हणून झाला. तीच गोष्ट दिल्लीची. दहा वर्षे अकाली दल भाजपचं राज्य पाहिल्यानंतर काँग्रेस सत्तेवर येणं हे साहजिकच होत. त्यामुळे या सर्व ठिकाणी आलेले सरकार स्वतःच्या भरवशावर होते त्यात प्रशांत किशोर यांचा वाटा फार कमी होता. मात्र उत्तरप्रदेशात काँग्रेसच्या बाजूने ते काहीच करू शकले नाहीत. उत्तरप्रदेशात हिंदुत्वाच्या तगड्या आव्हानासमोर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदल (स्व अजित सिंग) या तिघांना एकत्र घेऊन काँग्रेसने आपली स्ट्रॅटेजी आखली असती तर 2017 ला तर कदाचित या सर्व पक्षांचे मिळून 150 आमदार निवडून येऊ शकले असते. रणनीतीकार प्रशांत किशोर यांना ही साधी गोष्ट समजू नये? पुढील वर्षी होणार्‍या पंजाब निवडणुकांची जबाबदारी काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावर टाकली आहे. बहूजन समाज पक्षाने अकाली दलाबरोबर समझौता करून राजकारणाला नवीन वळण दिलं आहे. स्व. कांशीराम पंजाबी. पंजाबमध्ये दलितांचा वरचष्मा आहे. 1996 साली या दोन पक्षांनी पंजाबमध्ये 13 पैकी 11 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. सध्या पंजाबमध्ये पाच पक्षांची चौरंगी लढत आहे. भाजप, आप आणि काँग्रेस स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे येणारी विधानसभा त्रिशंकू असेल आणि त्यात भाजप आणि अकाली दलाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही साधी राजकीय समीकरण असतात. हे सांगण्यासाठी पोल स्ट्रॅटेजीस्टची गरज काय? सध्या हे प्रशांत किशोर चक्क शरद पवारांना मदत करत आहेत. विरोधी पक्षांची मोट बांधताना काँग्रेस वगळता इतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न किती हास्यास्पद आहे हे कोणीही सांगू शकेल. आज भाजपनंतरचा देशातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे. पण रणनीतीकारांना इतक्या साध्या गोष्टी समजू नये? या सर्व गोष्टींकडे पाहता प्रशांत किशोर हे रणनीतीकार नसून केवळ एक पोकळ वासा आहे असं वाटतं! तूर्तास इतकेच!

Exit mobile version