तापमानवाढीमुळे मोठी हानी

भास्कर खंडागळे

जागतिक तापमानवाढीचा फटका अनेक देशांना फटका बसला आहे. एका संशोधनानुसार भारतात उष्णतेमुळे मृत्युमुखी पडणार्‍या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मोठं आर्थिक नुकसानही होत आहे. 2000 ते 2021 दरम्यान अतिउष्णतेमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या 55 टक्क्यांनी वाढली आहे. संशोधनानुसार 2021 मध्ये भारतात उष्णतेमुळे कामाचे 167.2 अब्ज तास कमी झाले.

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळ्याची तीव्रता अधिक तीव्र आणि दीर्घकाळापर्यंत वाढत आहे. उष्णतेच्या लाटा हा नेहमीच भारतीय उन्हाळ्याचा एक भाग राहिला आहे; परंतु तज्ज्ञ म्हणतात की आता उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात 103 देशांची चर्चा आहे. संशोधकांना आढळून आलं की यावर्षी मार्च ते एप्रिलदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये हवामानबदलामुळे उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता 30 पट जास्त आहे. अहवालात संशोधक लिहितात, अतिउष्णतेचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे हृदय आणि श्‍वसनाच्या आजारांचा धोका वाढतो आणि उष्माघाताचा झटका येऊ शकतो. याशिवाय, गरोदरपणावर होणार्‍या विपरीत परिणामांमध्ये झोपेचा त्रास, खराब मानसिक आरोग्य आदींचा समावेश असतो. मृत्यूची प्रकरणंदेखील वाढतात. भारतात उन्हाळ्याची स्थिती अशी आहे की, पाण्याअभावी प्राणी-पक्षी मरायला लागले आहेत. हा प्रश्‍न दुर्लक्षित करण्याजोगा नाही. त्याची व्याप्ती वाढत आहे. अलिकडेच यासंदर्भात एक उदाहरण पहायला मिळालं.
अतिउष्णतेमुळे पक्ष्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. ते अस्वस्थ होतात, जखमी होतात आणि जमिनीवर विव्हळतानाही आढळतात. एखादीच संस्था त्यांच्यावर उपचार करत असते. गेल्या एप्रिल महिन्यात भारतात 122 वर्षातला सर्वात उष्ण एप्रिल महिना अनुभवायला मिळाला होता. मार्च हा इतिहासातला सर्वात उष्ण महिना होता. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये उष्णतेनं हैराण झालेल्या गरुडाला उपचारासाठी डॉक्टरांकडे आणण्यात आलं. तिथल्या जीवदया चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टरांनी आजारी पक्ष्याला प्रथम औषध दिलं. सिरींजच्या सहाय्यानं मीठाचं द्रावण दिल्यानंतर आणि अथक प्रयत्नांमधून त्याला जीवदान लाभलं. अशा अनेक पक्ष्यांवर त्या काळात आणि आजही उपचार सुरू आहेत. संबंधित गरुडाची प्रकृती इतकी बिकट झाली होती की,त्याला लसीकरणही करण्यात आलं; मात्र हा उपचार घेणारा एकमेव पक्षी नाही. देशातले अनेक प्राणी आजारी आहेत. भारतात उष्णतेमुळे माणसांचीच नव्हे, तर पशू-पक्ष्यांचीही अवस्था बिकट आहे. भारतातले अनेक भाग उष्णतेमुळे हैराण झाले आहेत आणि सुटकेसाठी विविध मार्ग शोधत आहेत. वाढत्या तापमानामुळे असुरक्षित लोकसंख्येपैकी 65 वर्षांपेक्षा जास्त वृद्ध लोक आणि एक वर्षापेक्षा कमी वयाची अनेक मुले 2021 मध्ये मृत्युमुखी पडली. ‘हेल्थ अ‍ॅट द मर्सी ऑफ फॉसिल फ्युएल’ नावाच्या एका शोधनिबंधात भारतात सूक्ष्म कणांमुळे होणार्‍या मृत्यूंचाही उल्लेख आहे. 2021 मध्ये या कणांमुळे भारतात अंदाजे तीन लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यासंदर्भात मतप्रदर्शन करताना म्हणतात, हवामानातल्या बदलामुळे आपला जीव जात आहे. विषारी वायू प्रदूषणामुळे अन्नसुरक्षा कार्यक्रम कमकुवत होणं, संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका वाढणं, विक्रमी उष्णता, दुष्काळ, पूर अशा इतर अनेक समस्या वाढण्याची शक्यता आहे. उष्णतावाढ केवळ आपल्या ग्रहाच्या आरोग्यालाच नव्हे, तर सर्वत्र लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचवत आहे. हवामानातल्या बदलांमुळे जगभरात हवामानातील तीव्र घटनांचा धोका आणखी वाढला आहे. अमेरिकेतल्या केंटकी राज्यात पुरामुळे स्थानिक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. डोंगराळ भाग असल्याने तिथे मदत आणि बचावकार्यात अडचणी येत होत्या. युरोपमध्ये उबदार वारे वाहत आहेत. कडक उन्हामुळे युरोपमधल्या अनेक देशांमध्ये जंगलांना आग लागली. स्पेन, इटली, क्रोएशिया, फ्रान्स आणि पोर्तुगाल या सर्वच देशांमध्ये वणवे पेटले. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, हवामानातल्या बदलामुळे उष्णतेच्या लाटा वारंवार येत असून तीव्रही होत आहेत.
पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर यांचा धोका गेल्या काही काळात बराच वाढल्याचं पहायला मिळालं. जूनच्या मध्यापासून पाकिस्तानात एकापाठोपाठ एक अनेक वादळं आली. त्यामध्ये अनेक लोक मारले गेले. वादळामुळं घरं, रस्ते, पूल आणि वीज केंद्रांचं नुकसान झालं. तिथला अलीकडचा पाऊस सरासरी पावसाच्या तुलनेत 87 टक्के जास्त होता.
या वर्षी जुलैच्या सुरूवातीस न्यू साउथ वेल्स या ऑस्ट्रेलियन राज्यामध्ये 18 महिन्यांमध्ये चौथा पूर आला. ग्रेटर सिडनी परिसर विशेषतः प्रभावित झाला. अवघ्या चार दिवसांमध्ये आठ महिन्यांमध्ये पडला नसेल इतका पाऊस पडला. रस्ते नद्यांमध्ये बदलले आणि हजारो लोकांना घरातून बाहेर काढण्यात आलं. अनेक महिन्यांचा दुष्काळ आणि हिवाळ्यात पाऊस न पडल्यानंतर इटालियन सरकारने यंदा पाच प्रदेशांमध्ये आणीबाणी जाहीर केली. अमेरिकेत वणव्याचा हंगाम अधिकृतपणे सुरू होण्याआधीच, देशातला काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. जुलैच्या सुरुवातीला उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली. ईशान्य भारतात या वर्षी अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस झाला. पूर्व उत्तरेमध्ये दोनशेहून अधिक लोक मरण पावले. आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला तसंच घरांचं नुकसान झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता हवामानबदलाच्या परिणामांचा अंकीय अंदाज लावणं शक्य झालं आहे. यामुळे संशोधक मोठ्या प्रमाणावर तुलनात्मक अभ्यास करू शकतात. 2021 आणि 2022 मध्ये आशिया खंडात प्रचंड उष्णतेनं कहर केला. त्यामुळे कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणि सामाजिक अडचणी अधिक तीव्र झाल्या आहेत;
परंतु उर्वरित जगही हवामानबदलाच्या परिणामांना सामोरं जात आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, पश्‍चिम युरोप, मलेशिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण सुदानमध्ये पुरामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक नुकसान झालं आहे. तसंच कॅनडा, अमेरिका, ग्रीस, अल्जेरिया, इटली, स्पेन आणि तुर्कस्तानमध्ये जंगलातल्या आगीमुळे मोठं नुकसान झालं आहे. हवामानातल्या बदलामुळे उष्णता कशी वाढत आहे हे यातून दिसून आलं. ‘द लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय जर्नलच्या अलीकडील नवीन अहवालाने अतिउष्णतेच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांवर नवीन प्रकाश टाकला आहे. या वर्षी हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधल्या मुख्य गहू उत्पादक प्रदेशातल्या गव्हाच्या पिकांना अकाली उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला. शेतीवर तीव्र उष्णतेच्या लाटेचा परिणाम होऊन अन्नधान्याच्या किंमती नियंत्रणाबाहेर वाढल्याचं दिसू लागलं.
या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये उष्णतेच्या लाटेचे अनेक अप्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत, जे सहसा कोणाच्याही लक्षात येत नाहीत. उदाहरणार्थ, वीजकपात; ज्याचा परिणाम सिंचनासाठी विजेवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांवरच नाही तर शहरी गरीब लोकांवरही झाला. शहरी गरीब भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. सामान्यत: जास्त वेळ घराबाहेर घालवतात. त्यांना उष्णतेचा सामना करावा लागतो आणि शरीराला होणारे त्रास सहन करावे लागतात. शहरीकरणाकडे झपाट्याने वाटचाल करणार्‍या भारतासारख्या देशात जादा बांधकामामुळे शहरं आसपासच्या ग्रामीण भागापेक्षा जास्त उष्ण आहेत. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारतात ‘उष्णता संवेदनशीलता निर्देशांक’ आवश्यक आहे. त्यामध्ये भौगोलिक, लोकसंख्याशास्त्रीय आणि सामाजिक-आर्थिक घटकांचा समावेश असायला हवा. बरेचजण वातानुकूलित घरं आणि कार्यालयांमध्ये राहून तीव्र उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात; परंतु लाखो लोकांकडे अशा सुखसोयी नाहीत. त्यामुळे उष्णतेचा सामना करण्यासाठी आवश्यक योजनांमध्ये असुरक्षित लोकसंख्येसाठी विशेष तरतुदी केल्या पाहिजेत. अहमदाबाद हे भारतातलं पहिलं असं शहर आहे, जिथे मे 2010 मध्ये अतिउष्णतेमुळे तेराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ विकसित केला होता. अहमदाबाद मॉडेलमध्ये चेतावणी प्रणाली, कलरकोडेड अलर्ट, कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम, शाळा आणि कारखान्याच्या तासांमध्ये कपात यासारख्या उपायांचा समावेश आहे. तीव्र उष्णतेचा सामना करताना शहरांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. त्यासाठी लॅन्सेट अहवाल हा खरोखरच एक इशारा आहे.

Exit mobile version