आरती देशपांडे
पायपीट टाळणारं सायकलरुपी साधं वाहन लोकांच्या हातात होतं तेव्हा पर्यावरणरक्षण, आरोग्यसंवर्धन, शारीरिक तंदुरुस्ती साधली जात होती. यथावकाश औद्योगिकीकरण वाढून देशातले रस्ते इंधनावर चालणार्या वाहनांनी भरुन वाहू लागले आणि सायकल मागे पडली. आता सायकलने पार्किंगमध्ये पुनरागमन केले असून नव्या, आकर्षक आणि स्टायलिश सायकलींच्या वापराकडे जाणिवांच्या नव्या कंगोर्यानिशी पाहिलं जात आहे.
‘जुनं ते सोनं’ ही म्हण आपण अनेकदा वापरतो आणि वेळोवेळी त्याचे प्रत्यंतरही घेतो. छोट्या-मोठ्या प्रवासासाठी सायकलींचा वाढता वापर बघून हल्ली याची नव्याने साक्ष पटते. दर काही काळानंतर इतिहासाची उजळणी होत असते आणि नव्या रुपाने इतिहास वर्तमान घडवत असतो. सध्या हा न्याय सायकलींना लागू होत असल्याचे बघायला मिळत आहे. पूर्वी वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित असताना पायपीट टाळणारं सायकलारुपी साधं वाहन लोकांच्या हातात आलं आणि पर्यावरणरक्षण, आरोग्यसंवर्धन, शारीरिक तंदुरुस्ती अशा शब्दांचा साधा परिचयही नसताना नकळत या सगळ्याला सहाय्यक होऊन राहिलं. पुरुषच नव्हे तर काही अंशी पुढारलेल्या स्त्रियांच्या हातातही या वाहनाने स्थान मिळवले आणि युगपरिवर्तनाची एक सोनेरी पहाट पाहिली. पण औद्योगिकीकरण, मुक्त व्यापार, देशोदेशींचे वधारलेले व्यापारसंबंध या सगळ्याचा परिपाक म्हणून देशातले शहरी तसेच ग्रामीण रस्ते इंधनावर चालणार्या वाहनांनी भरुन वाहू लागले आणि या भरधाव वेगाचा झंझावात सायकलच्या दोन चाकांना दूर लोटून गेला. आता मात्र विभिन्न देशी-विदेशी सुपरबाईक्स सुपरकार्स-मोपेड आणि विजेवर-गॅसवर चालणार्या वाहनांची प्रचंड बाजारपेठ उपलब्ध असताना याच सायकलने पार्किंगमध्ये पुनरागमन केले असून नव्या, आकर्षक आणि स्टायलिश बायसिकल्सच्या वापराकडे जाणिवांच्या नव्या कंगोर्यानिशी पाहिले जात आहे. अगदी साध्यासुध्या सायकलींपासून काही लाखांपर्यंतच्या गिअरच्या सायकल्स साध्या रस्त्यांबरोबरच चढउतारांच्या, कच्च्या-पक्क्या सडकेवरुनही सुसाट वेगाने धावत आहेत. लहानग्यांबरोबरच युवा, प्रौढ आणि वयस्क वर्गही वेगवेगळ्या हेतूने आवर्जून सायकलींचा वापर करु लागला आहे. म्हणूनच एक वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे आपण म्हणू शकतो.
चीनमध्ये सध्या सायकली वापरण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे चीनमधील सायकलींचा खपही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय वेगाने निघालेल्या चीनने गेल्या दोन दशकांमध्ये केलेली प्रगती खचितच वाखाणण्याजोगी आहे. आर्थिक वृद्धी होत असल्याने तेथील सुबत्ताही वाढली असून वाढत्या मोटारींद्वारे ती रस्त्यांवर ठळकपणे दिसू लागली आहे. चीनही मोटारींची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तिथे एका वर्षात सव्वा कोटींहून अधिक मोटारी विकल्या जात असून एकट्या बीजिंगमध्ये 56 लाख मोटारींची विक्री झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने वाहने असल्याने तेथील प्रदूषणही वेगाने वाढत आहे. बीजिंगमध्ये वाहनांद्वारे वर्षाला सुमारे पाच लाख टन प्रदूषित घटक वातावरणात सोडले जातात. ते रोखण्यासाठी चीन पुन्हा सायकल संस्कृतीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी तीस वर्षांपूर्वीपर्यंत चीनला सायकलींचा देश म्हटले जात असे. ऐंशीच्या दशकात बीजिंगमध्ये सुमारे 63 टक्के लोक सायकलीने ये-जा करत असत. तो देश जसजसा विकसित होत गेला तसतसं सायकल वापरण्याचं प्रमाण कमी होत गेलं. 2000 मध्ये चीनमध्ये सायकलीनं प्रवास करणार्यांचं प्रमाण 38 टक्क्यांपर्यंत खाली आलं. 2014 मध्ये हे प्रमाण बारा टक्क्यांपर्यंत खाली आलं.
मोटारींमुळे होणारे प्रदूषण कमी करायचे असेल तर मुळात रस्त्यांवरील मोटारींच्या संख्येवर निर्बंध आणायला हवेत. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करायला हवी. त्याला मेट्रो आणि अन्य पर्याय आहेत. तरीही जवळचे अंतर कापण्यासाठी आणि अजिबात प्रदूषण होऊ न देण्यासाठी सायकल हे उपयुक्त वाहन आहे. त्यामुळे लोकांना सायकली विकत घेण्यास भाग न पाडता, भाड्याने उपलब्ध होतील, अशा प्रकारची योजना राबवण्यास चीन आणि अन्य काही देशांमध्ये सुरुवात झाली. तेथील काही स्टार्ट अप कंपन्यांनी ही योजना आणली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. वास्तविक, सायकली भाड्याने देण्याची बाब नवी नाही. आजही जगभर अनेक ठिकाणी सायकली भाड्याने मिळतात. आपल्याकडेही काही काळापूर्वी सायकल भाड्याने देणारी दुकाने होती. मात्र, टू व्हीलरचे प्रमाण वाढत गेले आणि हळूहळू ही दुकाने बंद पडली. चीनमधील ‘बाइक शेअरिंग’ योजनेत सायकली भाड्याने देण्याची संकल्पना असली तरी तंत्रज्ञानामुळे ती पूर्णपणे वेगळी ठरली. ओएफओ, मोबिक, ब्लूगोगो आदी कंपन्यांनी बीजिंग, शांघाय, शेंजेन, ग्वांगझू आदी शहरांमध्ये सायकल सेवा सुरू केली असून त्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि माहिती-तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या कंपन्यांकडे लाखोंच्या संख्येत सायकल्स आहेत. उदाहरण द्यायचे तर ओएफओ कंपनीकडे सुमारे अडीच लाख सायकल्स आहेत. बीजिंगमध्ये कंपनीच्या सुमारे पन्नास हजार सायकली असून त्या शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. अन्य कंपन्यांच्या सायकलीही या ठिकाणी उपलब्ध आहेत.
सायकल भाड्याने घेण्यासाठी ग्राहकांना त्या त्या कंपन्यांची अॅप आपल्या मोबाइल फोनवर डाउनलोड करून घ्यावी लागतात. त्याचबरोबर विशिष्ट रक्कम डिपॉझिट म्हणून जमा करावी लागते. सायकल हवी असल्यास आपल्यापासून अगदी जवळ सायकल कुठे उपलब्ध आहे, याचा तपशील जीपीएसद्वारे मोबाइलवर कळतो. सायकल शोधण्यासाठी फार वणवण करावी लागू नये, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे सायकल घेण्यासाठी जास्त चालावे लागत नाही. सायकलींच्या जागेवर पोहोचल्यानंतर त्यातील कोणतीही सायकल घेता येते. सायकलीच्या हँडलवर क्यूआर कोड असतो. तो मोबाईलवरून स्कॅन केल्यानंतर सायकल कंपनीकडून क्षणार्धात विशिष्ट क्रमांक मिळतो. त्याद्वारे सायकलीचे कुलूप उघडता येते. मग सायकल घेऊन इच्छित स्थळी जायचे आणि जवळच्या स्टँडवर सोडून द्यायची. सायकलसाठी तासानुसार भाडे आकारले जाते. सायकलींसाठी आता स्वतंत्र मार्गिकाही करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होत असल्याचा दावा तेथील प्रशासनाने केला आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी सायकली आवश्यक असल्यानं चीनच्या प्रशासनाने सायकली बनवणार्या कंपन्यांना अनुदान सुरू केले आहे. काही ठिकाणी सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा प्रयत्न आहे.
नेदरलँडच्या राजाला भेटायला पंतप्रधान मार्क रुते चक्क सायकलवरून गेले होते. सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले. राजाच्या महालाबाहेर स्वतः रूते यांनी आपली सायकल लावली. नेदरलँडच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सायकल भेट दिली होती. नेदरलँडमध्ये एकाच वेळी 12500 सायकली ठेवण्याची व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे देशभर 22 हजार सायकल पार्किंग्ज उभारण्याची योजना तिथल्या सरकारने हाती घेतली आहे. जगात नेदरलँडमध्ये सर्वाधिक प्रमाणात सायकलचा वापर केला जातो. तेथील 70 टक्के जनता कार्यालयात जाण्यासाठी सायकलचा वापर करते. साधारण 10 किलोमीटर अंतर असेल तर सायकलचा वापर होतो. या देशामध्ये लोकसंख्येपेक्षा सायकली जास्त आहेत! यामुळे रस्ते अपघातातल्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीयरित्या घटले आहे. 1971 मध्ये इथे रस्ते अपघातात तीन हजार लोक मरण पावले. त्यात 450 लहान मुले होती. त्यातून धडा घेऊन येथे कार्सची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सायकलचा पर्याय स्वीकारला गेला. मुलांसाठी येथे विशेष सायकली डिझाईन करण्यात आल्या आहेत.
रोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, सायकल चालवणे यामुळे वजन उत्तम प्रकारे कमी करता येते. इस्ट एंडिलिया विद्यापीठातील सेंटर फॉर डाएट अँड अॅक्टीव्हिटी रीसर्च या केंद्रातील संशोधकांनी म्हटले आहे की, सायकलवरून कामावर जाणे नेहमी फायद्याचे ठरते. त्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते. दुचाकी किंवा चारचाकीने कामावर जाण्यापेक्षा सायकलवर जावे आणि कामाचे ठिकाण जवळ असेल तर चालत जावे. शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. यामुळे दोन वर्षांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी होतो. नागरिकांनी रोजच्या व्यवहारात शारीरिक हालचाल होणार्या व्यायामांचा समावेश केला, तर वजन कमी होऊ शकते, असे संशोधक अॅडम मार्टिन यांनी दाखवून दिले आहे. तीस मिनिटे सायकलने किंवा पायी प्रवास करणार्यांमध्ये बीएमआय 2.25 ने कमी होतो. म्हणजे वजन सुमारे सात किलोने कमी होते. जगभरात सायकलींचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश असा भारताचा लौकिक आहे. वाहतुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून अनेक देशांनी सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वाढती लोकसंख्या आणि आक्रसते रस्ते या समस्यांवर चोख पर्याय असल्याने सायकलला नवसंजीवनी मिळाली आहे.
ब्रिटनमध्ये सायकल हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून प्रभावीपणे वापरले जाते. तिथे पहिला अर्धा तास विनाशुल्क तर पुढच्या प्रत्येक अर्ध्या तासासाठी दोन पाउंड इतके शुल्क आहे. फ्रान्स (43 हजार), स्पेन (25 हजार) हे देशही लोकसंख्येच्या मानाने उपलब्ध असलेल्या सायकलींमध्ये आघाडीवर आहेत. पॅरिसमध्ये सार्वजनिक सायकलींना ‘वेल्ब’ म्हणतात. इथे पहिल्या अर्धा तासासाठी सायकल मोफत दिली जाते. नंतर दर अर्ध्या तासासाठी एक युरो आकारला जातो. इथे एक दिवसाचा पासदेखील मिळतो. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये सायकलींचा सर्वाधिक वापर होतो. ही एका नवीन पर्वाची सुरुवात आहे.