2020मध्ये पहिल्या लाटेनंतर मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाला भारताने कसे हरवले असा उत्सव भाजपवाल्यांनी साजरा केला होता. त्यानंतर लगोलग दुसरी लाट आली होती व त्यात ऑक्सिजनअभावी लोक रस्त्यावर मेले होते. त्यात भाजपवर टीका झाली होती. तेव्हापासून केंद्र सरकार जरा काही खुट्ट झाले की नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना देऊन आपले कर्तव्य पार पाडीत असते. चीनमध्ये सध्या कोरोनाची लाट येण्याची चर्चा चालू आहे. पण चीनने कोरोनाचे शंभर टक्के निर्मूलन करण्याचे अवास्तव ध्येय ठेवल्याने ते घडत आहे. कोरोना हा विषाणूने होणारा आजार आहे. सर्दी किंवा तापासारखा मधूनमधून त्याचा फैलाव होत राहणे हे अपरिहार्य आहे. पण चीनला तो पूर्ण हद्दपार करायचा आहे. त्यामुळे त्या देशात कोरोनाविरुध्द अतिरेकी बंधने टाकण्यात आली आहेत. अनेक शहरांमध्ये आजही कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र असल्याखेरीज घराबाहेरही पडता येत नाही. मध्यंतरी तेथील एका शहरातील बहुमजली इमारतीला आग लागली व या निर्बंधांमुळे अनेक जण घरातच जळून मेले. यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन झाले. पण चिनी सरकारने ते दडपून टाकले. भित्यापाठी ब्रह्मराक्षस या न्यायाने आता कोरोनाचा नवा विषाणू तयार होऊन त्याची पीडा चीनच्या मागे लागण्याची शक्यता आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र हा विषाणू पूर्वीइतका मारक नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही खबरदारी म्हणून चीनमध्ये अतिरेकी उपाय योजण्यास सुरुवात झाली आहे आणि जगातील इतर देशही थोडेफार सावध झाले आहेत. भारतानेह सावधगिरी बाळगायला हवी यात शंका नाही. त्यासाठी रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या विषाणूंची जिनोम तपासणी करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा अशीही सूचना केली गेली आहे. मात्र हे करताना राईचा पर्वत होता कामा नये. कोरोनाचे मुंबईत केवळ 36 तर देशभरात सुमारे चार हजार रुग्ण आहेत. आपल्या लोकसंख्येच्या मानाने हा आकडा नगण्य आहे. शिवाय बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे वा त्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे काळजी घेणे ठीक असले तरी त्याचा बाऊ होता कामा नये. राजकारण तर अजिबात होता नये. पण चोवीस तास केवळ राजकारणाचा विचार करणारे भाजपवाले सध्या नेमके तेच करीत आहेत. राहुल गांधी यांची भारत-जोडो यात्रा येत्या शनिवारी म्हणजे 24 डिसेंबरला नवी दिल्लीत दाखल होत आहे. या यात्रेत दिल्लीमध्ये सुमारे 25 हजार कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होतील असा काँग्रेसचा दावा आहे. यात्रेला आजवर जी काही थोडीबहुत प्रसिध्दी मिळाली आहे तिच्यामुळे ती पाहायला येणार्यांचीही त्यात भर पडलेच. त्यामुळे एरवी चोवीस तास भाजपचे ढोल पिटणार्या वृत्तवाहिन्यांना राहुल यांच्या यात्रेसाठी थोडी तरी जागा करून द्यावी लागेल. भाजपला अर्थातच हे सहन होणार नाही. विरोधकांना सुईच्या अग्रावर राहील इतकीही जमीन मिळू नये अशीच जणू त्यांची सदैव इच्छा असते. त्यामुळे कोरोनाचे निमित्त करून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी, कोरोनासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या नाहीतर यात्रा स्थगित करा असा इशारा दिला आहे. एकूण या यात्रेमुळेच कोरोना पसरला असा ठपका ठेवण्याच्या दिशेने भाजपचा विचार चालू दिसतो. आता सर्व माध्यमांमधून काँग्रेसच्या यात्रेतील गर्दीमुळेच कसा कोरोनाचा धोका आहे अशा संदेशांचा मारा सुरू होईल. यात्रेवर बंदी घालावी अशा मागण्या होतील. तशा बातम्या व चर्चा होतील. महाराष्ट्रातले जिल्हा पातळीवरचे भाजपचे नेतेसुध्दा तेच बोलतील. ही भाजपची शिकारीसाठी रान उठवण्याची खास पद्धत आहे. कोरोनाच्या ऐन लाटेदरम्यान सर्व निर्बंध झुगारून पंतप्रधानांनी पश्चिम बंगालात हजारोंच्या सभा घेतल्या होत्या. आताही भाजपचे असे कार्यक्रम होणार नाहीत याची हमी मांडविया देऊ शकतात काय? राहुल यांच्या यात्रेचा शेवट काश्मीरमध्ये होणार आहे. तेथे निवडणुका झालेल्या नाहीत हा प्रश्न उपस्थित होणार आहे. हे सर्व टाळण्यासाठीही हे कदाचित चालू असेल. हे निव्वळ खुनशीपणाचे राजकारण आहे.