जंतरमंतरच्या आखाड्यातील कुस्ती

मधुरा कुलकर्णी

आधीच्या तक्रारीला अडीच महिने उलटूनही ब्रीजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. दुसरीकडे, त्याची संपूर्ण कारकीर्दच पणाला लागली आहे. कुस्तीपटूंच्या मते ब्रीजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे खेळाडूंचे संपूर्ण करिअर, कुटुंब आणि भविष्य धोक्यात आले आहे. तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही किंवा तक्रारही नोंदवून घेतलेली नाही. क्रीडा मंत्रालयही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. या संपूर्ण वादाबद्दल विचारले असता ब्रीजभूषण प्रश्‍न ऐकून पळून जाऊ लागले.

राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा देणारे आणि राजकीय परिस्थिती बदलताच राज यांना अयोध्याभेटीसाठी पायघड्या घालण्याची तयारी दाखवणारे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांची वृत्ती केव्हाच लक्षात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून वाद आणि ब्रीजभूषण हे जणू समीकरण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप होत होते. सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. समितीकडून फारसे काही हाती आले नाही, म्हणून देशातील नामवंत कुस्तीपट्टूंनी तसेच अन्य खेळांडूनी रस्त्यावरची लढाई पुन्हा सुरू केली. या विषयावर आता न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. ब्रीजभूषण यांच्या विरोधात देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी पुन्हा आघाडी उघडली आहे. तीन महिन्यांनंतर ते अलिकडेच पुन्हा न्यायासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर धरण्यावर बसले. ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध आघाडी उघडणार्‍यांमध्ये ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांचा समावेश आहे. जंतरमंतरवर झालेल्या निदर्शनांदरम्यान आठ कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ब्रीजभूषण सिंह यांच्याविरोधात फिर्याद नोंदवण्याची मागणी केली. या आरोपांची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना काही सवाल केले आणि तक्रारीची दखल घ्यायला भाग पाडले. या दुर्दैवी प्रकाराने भारतीय क्रीडाक्षेत्रातली अनागोंदी पुढे आणलीच पण खुद्द ऑलिम्पिक पदकविजेत्यांना या देशात कोणत्या मुद्द्यांवर झगडावे लागते हे दुर्दैवी पध्दतीने दाखवून दिले.
या वादामुळे भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. या निवडणुका सात मे रोजी होणार होत्या. अशा परिस्थितीत ब्रीजभूषण यांच्याविरुद्धची पहिली लढत दबंग मुलींनी जिंकली का, असा मुद्दा उपस्थित होतो. आता दिल्ली पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समित्यांचे अहवाल मागवले असून खासदार ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशीही सुरू केली गेली आहे. भारतीय कुस्ती महासंघ प्रमुखाची कोंडी करण्यासाठी कुस्तीपटूंनी सर्व बाजूंनी दबाव निर्माण केला आणि त्याचे परिणामही दिसून येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात या वर्षी 18 जानेवारी रोजी झाली. त्या दिवशी देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू बंजरंगी पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचले आणि ब्रीजभूषण यांच्यावर हुकूमशाही आणि भेदभावाचा आरोप केला. त्यावेळी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणार्‍या विनेश फोगटला सार्‍या देशाने रडल्याचे पाहिले. ब्रीजभूषण आणि प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप तिने केला. त्या विरोधात आवाज उठवल्यावर आपल्याला धमक्या दिल्या जातात, असेही तिने म्हटले. याशिवाय महिला कुस्तीपटूंना पुरेशा सुविधाही दिल्या जात नाहीत, असे सांगितले.
भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रीजभूषण यांची गणना उत्तर प्रदेशच्या धाडसी नेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते आणि हे आरोप सिद्ध झाल्यास आपण फाशी देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. 23 जानेवारी रोजी जंतरमंतर येथे कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी कुस्तीपटूंसोबत बैठक घेतल्यानंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय तपासणी समिती स्थापन केली. माजी ऑलिंपियन एमसी मेरी कोमला या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. या समितीला चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तीन महिने झाले असून अद्याप तपास अहवालातील निष्कर्ष सांगण्यात आले नसल्याचे पैलवानांचे म्हणणे आहे. याशिवाय, तपास अहवालाशी संबंधित माहिती प्रसार माध्यमांमधून येत आहे. त्यामुळे ब्रीजभूषण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या घडामोडीनंतर त्यांच्यावर अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आहे. पुढील वर्षी 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यांची प्रतिमा लक्षात घेऊन भाजप त्यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार करू शकते. या प्रकरणाच्या निमित्ताने विरोधक भाजप आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडूंवरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. कुस्तीपटूंनी पुन्हा दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले.
आधीच्या तक्रारीला अडीच महिने उलटूनही ब्रीजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. दुसरीकडे, त्याची संपूर्ण कारकीर्दच पणाला लागली आहे. कुस्तीपटूंच्या मते ब्रीजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे खेळाडूंचे संपूर्ण करिअर, कुटुंब आणि भविष्य धोक्यात आले आहे. तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही किंवा तक्रारही नोंदवून घेतलेली नाही. क्रीडा मंत्रालयही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. या संपूर्ण वादाबद्दल विचारले असता ब्रीजभूषण प्रश्‍न ऐकून पळून जाऊ लागले. ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता कुस्तीपटूंबाबतचे प्रश्‍न ऐकून प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. वास्तविक पाहता, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असल्यामुळे ब्रीजभूषण यांनी जबाबदारीने प्रश्‍नांची उत्तरे द्यायला हवी होती. त्यांनी महिला खेळाडूंनी केलेल्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण द्यायला हवे होते. तसे न झाल्याने आता ब्रीजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार्‍या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला वेग आला आहे. कुस्तीपटूंनी तीन महिन्यांपूर्वी ब्रीजभूषण यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने चौकशीसाठी समिती स्थापन केली तेव्हा ते धरणे संपले होते; मात्र तपास अहवाल पाहण्यासाठी आणि कारवाईच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पैलवानांनी धरणे धरले. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने फूटपाथवर झोपलेला एक फोटो ट्विट करत लिहिले, ‘मंचापासून फूटपाथपर्यंत. मध्यरात्री मोकळ्या आकाशाखाली, न्यायाच्या आशेने…’
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या क्रीडा मंत्रालयाच्या चौकशी समितीकडून अहवाल मागवला आहे. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांचा तपास सुरू असून, ठोस पुरावे समोर आल्यानंतर फिर्याद नोंदवली जाईल, असे सांगितले जात आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन केली होती. बॉक्सर मेरी कोमला या चौकशी समितीचे प्रमुख बनवण्यात आले होते. मात्र या घटनेला सुमारे तीन महिने लोटल्यानंतरही ब्रीजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवला. विनेश फोगट या विषयावर तुटून पडली. न्याय मिळेपर्यंत कुस्तीशी संबंधित लोक या प्रकरणात मागे हटणार नाहीत, असा ठाम निर्धार कुस्तीपटूंनी केला. हा आमच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणार्‍या महिला कुस्तीपटू सुरक्षित नसतील तर कोण सुरक्षित असेल, असा सवाल त्यांनी केला. आम्ही कुस्तीपटूंच्या कुटुंबातून आलो आहोत आणि शेवटच्या श्‍वासापर्यंत या खेळासाठी लढणार आहोत, असे सांगून विनेश फोगटने खाप पंचायतींकडेही पाठिंबा मागितला. ब्रीजभूषण सिंह यांच्या विरोधात चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीबाबत ती म्हणते, ‘काय चालले आहे ते आम्हाला माहीत नाही. तीन महिने वाट पाहिली; मात्र आजतागायत कोणतीही प्रक्रिया पुढे आलेली नाही. दरम्यान, दिल्ली महिला आयोगानेही कुस्तीपटूंची बाजू घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, कुस्तीपटूंचा अपमान केला जात आहे. अशा या गंभीर प्रकरणाने क्रीडाक्षेत्राला काळिमा फासला आहेच पण, अनेक महत्वाचे प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

Exit mobile version