कंगनाची भाषा संघाच्या मनातली!

जयंत माईणकर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनी एका मुलाखतीत आपल्या अकलेचे जे तारे तोडले आहेत ते दुसरं तिसरी काहीही नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा शाखांवर बोलली जाणारी भाषा आहे.
नुकतीच टाईम्स नाऊ समिटमध्ये या ‘लंडन ठुमकदा फेम अभिनेत्रीने हजेरी लावली, तीथे तिने 1947 साली स्वातंत्र्य भिकेत मिळालं हे वादग्रस्त वक्तव्य केलं.
दरम्यान, कंगनाने यावेळी अनेक वक्तव्ये देखील केली. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मुलाखती दरम्यान कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे. देशाला स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं आहे, हे तीच पुढचं वक्तव्य होत. आपल्या अफेअर्समुळे आणि बॉलिवूडमधील वंशपरंपरेच्या विषयी वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत राहणार्‍या या 34 वर्षीय अभिनेत्रीचे आजोबा सरजूसिंग राणावत हे हिमाचल प्रदेशमधील गोपालपुरचे दोन वेळा काँग्रेसचे आमदार होते. आत्तापर्यंत विवाहित आदित्य पांचोली, अजय देवगण, घटस्फोटित ऋतिक रोशन, तिच्याच वयाचा अध्ययन सुमन आणि ब्रिटिश डॉक्टर निकोलस लाफर्टी याच्याशी नाव जोडल्या गेलेल्या कंगनाची राजकीय जवळीक ही भारतीय जनता पक्षाशी आहे हे उघड सत्य आहे. सुशांतसिंगच्या आत्महत्येपासून तर तीच मुंबईतील ऑफिस तोडलं जाईपर्यंत तिच्या वादग्रस्त वाक्यांची खैरात सुरू होती. महाराष्ट्र सरकार विरोधी कोणत्याही व्यक्तीला भेटायला सदैव तयार असणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही ती भेटून आली.
कंगनाने ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर ही मुलाखत दिली आहे. यावेळी कंगना म्हणाली की, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.
रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947 मध्ये जी मिळाली ती भीक होती, ‘यावर मुलाखतकार कंगनाला म्हणाली की, ‘म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात’. यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला.
या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.
2014 साली नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपची पुन्हा सत्ता आली आणि पंतप्रधानपदी मोदींची दुसर्‍यांदा वर्णी लागली. तर आता 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान बनणार. असं अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलं होतं. 2014 पासून म्हणजे अर्थात मोदी पंतप्रधान झाल्यापासून स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे आणि मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक हे म्हणून त्यांनी आपली राजकीय बाजू स्पष्ट केली आहे.
याआधीही विश्‍व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष स्व. अशोक सिंघल यांनी दिल्लीला 800 वर्षांनी हिंदू राजा मिळाला हे वाक्य नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणाले होते. अशा प्रकारची हिंदुत्वाचा जयघोष करणारी पण भारतीय राज्यघटनेच्या निधर्मी (सेक्युलर) इमेजला धक्का देणारी अनेक वादग्रस्त विधाने गेल्या सात वर्षात संघ परिवाराच्या तथाकथित दिग्गजांनी केली आहेत. भारतातील हिंदू, मुस्लिम यांचा डी एन ए एकच आहे ही सर्वविदित असलेली वास्तविकता सरसंघचालक मोहन भागवत यांनी जणू काही आपण फार मोठा शोध लावत आहे या स्टाईलनी सांगितली. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत 1976 च्या घटनादुरुस्तीनुसार सेक्युलर किंवा निधर्मी हा शब्द घालण्यात आला. आणि हिंदुत्ववाद्यांना सर्वात सलणारा शब्द हाच आहे. मात्र हा शब्द बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम काय असतील याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. हे हिंदुत्ववादी म्हणतात अमेरिका, इंग्लंड जर ख्रिश्‍चन राष्ट्र आहेत तर भारत हिंदू राष्ट्र का असू नये. पण ते हे विसरतात की इंग्लंड, अमेरिकेतील राज्ये धर्माधिष्ठित नाही किंवा पोपच्या सल्ल्याने चालत नाही मात्र तालिबान हे निश्‍चितच धर्माधिष्ठित आहे. आणि संघ परिवाराची वाटचाल सुधारणावादी ख्रिश्‍चनांच्या प्रमाणे नसून तालिबानी वृत्तीप्रमाणे मनुस्मृतीच पुनरुज्जीवन करणारी आहे. आणि नेमकं तेच अयोग्य आहे. महंमद बिन कासीमने सातव्या शतकात भारतावर आक्रमण केलं. तर बहादुरशहा जफर हा दिल्लीचा शेवटचा बादशहा. त्यानंतर ब्रिटिशांची सत्ता. त्यातून मुक्ती 1947 ला. पण आता महान विदुषी पद्मश्री कंगना राणावतला शोध लागला की ते स्वातंत्र्य भिकेत मिळालेलं. आणि खरं स्वातंत्र्य तर 2014 मिळालं. त्याआधी भाजपची प्रवक्ता रुची पाठक हिने असा शोध लावला की आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नसून काँग्रेसच्या चुकीमुळे 99 वर्षांच्या लीजवर मिळालेले आहे. भारत पूर्ण स्वतंत्र नाही, भारत अर्धाच स्वतंत्र असून केवळ 99 वर्षांच्या करारावर इंग्रजांनी स्वतंत्र केला. भारत भाडेतत्वावर आहे. गांधी-नेहरुंनी पूर्ण स्वातंत्र्य घेतलं नाही असा जावईशोध लावलाय तो म्हणजे भाजप युवा मोर्चाच्या अधिकृत प्रवक्त्या रुची पाठक यांनी.
म्हणजे अशोक सिंघल, कंगना राणावत, रुची पाठक या सर्वांच्या वाक्याचा विचार केला तर पंडित नेहरूंच्या पासून अगदी अटलबिहारी वाजपेयी,डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणीही हिंदू नव्हते आणि भाजपला लोकसभेत 282 जागा मिळाल्यानंतरच मोदींच्या रूपाने हिंदू राजा मिळाला किंवा खरं स्वातंत्र्य मिळालं हे मानायचं! अगदी तथाकथित सर्वसमावेशकतेचा आव आणणार्‍या वाजपेयींनी सुद्धा स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारकांच्या योगदानाला योग्य मान मिळाला नसल्याची खंत पंतप्रधान झाल्यानंतर एका कार्यक्रमात भाषण करताना व्यक्त केली होती. या सर्व वाक्यांचा विचार केला तर संघ परिवार केवळ जाणीवपूर्वक क्रांतिकारकांच्याच मुळे स्वातंत्र्य मिळालं आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आंदोलनामुळे ही संघ परिवाराची विचारधारा. गंमतीची गोष्ट ही की संघ स्वयंसेवकांचा स्वातंत्र्ययुद्धातील सहभाग नगण्य आहे. इतरांनी केलेल्या योगदानाचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा हा प्रकार. मंगल पांडेपासून अगदी सावरकर, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत कोणाचाही योगदान काँग्रेसने कधीही अमान्य केलं नाही. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या नावाने तिकीटही काढलं होतं. काँग्रेसने इतिहास बदलण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. पण संघ परिवाराचा हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे. क्रांतिकारकांमधील अनेक जण डाव्या विचारसरणीचे होते. भगतसिंग आणि त्यांचे सहकारी डाव्या विचासरणीचे. भाजपची धर्माधिष्ठित विचारसरणी त्यांना निश्‍चित पटली नसती. तरीही या सर्व क्रांतिकारकांचं नाव घेऊन आपणच केवळ राष्ट्रभक्त हे दाखवण्याचा जसा प्रयत्न केला जातो तसाच स्वातंत्र्ययुद्धातील काँग्रेसच्या योगदानाला जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा किंवा सरळ शब्दात नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न करताना ज्या वल्लभभाई पटेलांच नाव घेऊन आज भाजप जगत आहे त्या पटेलांनी सुद्धा स्वातंत्र्य युद्धात काहीच योगदान दिले नव्हतं असा याचा अर्थ होतो. भाजपच्या नेत्यांना हे मान्य आहे? अहिंसेची थट्टा उडवण्याचा प्रयत्न संघाने नेहमीच केला आहे. अहिंसेचे पाठ शिकवणार्‍या नेत्यांना त्याची कधीच झळ बसली नाही, हे संघ परिवारात नेहमीच सांगितलं जातं. हे सांगताना नेहरू गांधींना भोगावा लागलेला सहा सहा वर्षांचा तुरुंगवास विसरतात. कोणी त्याची आठवण केलीच तर ब्रिटिश सरकार या दोघांची बडदास्त सरकारी पाहुण्यांप्रमाणे ठेवत असत असा जावईशोध लावतात. नेहरूंचे मेहुणे आणि विजयालक्ष्मी पंडित यांचे पती यांना जेलमध्ये असतानाच न्युमोनियाने ग्रासले आणि जेलमधून सुटका झाल्यानंतर काही दिवसात त्यांचं निधन झालं. पण या घटनेचा संघ परिवार उल्लेखही करत नाही. अहिंसा, सत्याग्रह हे मार्ग केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र वापरले जातात.
ब्रिटिशांच्या वसाहतीतून सर्वात शेवटी मुक्त झालेलं राष्ट्र म्हणजे दक्षिण आफ्रिका. आणि या देशाच्या स्वातंत्र्याकरता 27 वर्षे तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेलासुद्धा महात्मा गांधी, नेहरूंच्याच विचारसरणीला मानत होते. म्हणजेच केवळ अफवांच्या पिकावर जगणार्‍या Rumour spreading source (RSS) या संघटनेचा काँग्रेसचे योगदान पुसून टाकण्यासाठी कंगनासारख्या प्याद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. तिच्याद्वारे संघ परिवाराच्या मनातले विचार बोलून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.

Exit mobile version