लहानपणापासूनच तिला असलेली आकाशातील विमानाची ओढ, पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केलेली धडपड, नशिबात आलेल्या अपयशालाही धूडकावून लावण्याची तिची जिद्द आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतरही तिने टिकवून ठेवलेला साधेपणा, जिच्या कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतील, असे व्यक्तीमत्व म्हणजे कॅप्टन कृतज्ञा जनार्दन हाले. म्हणूनच ग्रामीण भागातील मुलगी पायलट कशी झाली?, जगभर आपली ओळख कशी निर्माण केली, हे जाणून घेण्यासाठी तसेच कोणासही माहित नसलेली अर्थात पडद्यामागची कथा, तिचा संघर्ष, तिने पेललेली आव्हाने हे सारे काही जाणून घेण्याचा प्रयत्न कृषीवल टिमने केला आहे. त्यानिमित्ताने कृतज्ञा हालेसमवेत खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहान मूल शाळेत असल्यापासून त्यांना प्रश्न विचारला जातो की, मोठे झाल्यावर तुम्ही काय होणार? यावर सर्वसामान्य उत्तर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर. या क्षेत्राशिवाय अन्य क्षेत्रांकडे जाण्याची आपली मानसिकताच नाही. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील, अलिबाग तालुक्यातील, रेवदंडा गावातील मुलीने पायलट होण्याचे स्वप्न पाहिले. हे सारे करीत असताना ध्येयाकडे झेपावण्यासाठी फडफडणार्या पंखांना प्रोत्साहनाचे बळ दिले ते तिच्या आई-वडिलांनीच. कारण तिच्या इतकाच त्यांचाही तिच्या भरारीवर विश्वास होता. आकाशाला गवसणी घालणारे त्याचे स्वप्न त्यांनी लहानपणीच तिच्या नजरेतून टिपले होते. आज तिच्या कृत्यातून तिने आई-वडिल, कुटुंबाचे आणि गावाचे नाव आकाशात पोचविले.
खडतर शैक्षणिक प्रवास
2009 साली साळाव येथील इंग्रजी माध्यम शाळेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर लहानपणापासून तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने थेट फिलिपिन्सला जाण्याचे ठरविले. अवघ्या पंधराव्या वर्षांत तिने कुटूंबापासून दूर, दुसर्या देशात एकटीने जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. तिथे तिला सर्व काही स्वतःहून करायचे होते. देवही तिच्या करिअरच्या जिद्दीची परीक्षा घेत होता. दुर्दैवाने, तिने प्रवेश घेतलेली संस्था बंद पडली. पुढे काय करायचे असा यज्ञप्रश्न तिच्यासमोर होता. तिच्याकडे तिच्या पालकांकडे परत जाण्याचा पर्याय होता. तसा विचारही तिच्या मनात आला. मात्र ही परिस्थिती खंबीरपणे पेलायची ताकद दिली ती आई-वडिलांनीच. सातासमुद्रापर मुलगी होती. डोळ्यासमोर नसतानाही तिला खंबीर बनविणार्या त्या आई-वडिलांचीही कमालच म्हणावी लागेल. कितीही अडथळे आले तरीही स्वप्न पूर्ण करण्याचा आग्रहच त्यांनी धरला. मग काय सर्व अडचणींवर मात करित तिने 2013 मध्ये तिचा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पण तिचा संघर्ष तिथे संपला नाही. कॉलेज बंद पडल्यामुळे झालेला मनस्ताप सहन करीत, आई-वडिलांना काळजी वाटू नये, यासाठी एकटीने लढण्याची ताकद उराशी बाळगून तिने खडतर प्रवास केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारताच्या नागरी उड्डयन उद्योगाला सरकारकडून परवाना मिळवणे हे पुढील आव्हान होते. तो परवाना मिळवण्यासाठी तिला अनेकदा दिल्लीला जावे लागले. पाच वर्षे दिल्लीला फेर्या मारल्यानंतर अखेर तिने विमान उड्डाण करण्याचा परवाना मिळवला. गो एअर या एअरलाइन्स कंपनीत तिने कॅप्टन पायलट म्हणून काम करायला सुरुवात केली. जिद्द, कर्तबगार, ध्येयवेड्या अशा तरुणीची आणि तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेल्या अख्ख्या कुटुंबाची 5 वर्षांची तपश्चर्या आता फळाला आल्याने हाले परिवारासह संपूर्ण रायगडकरांना आनंदाने आभाळ ठेंगणे झाले आहे.
कुटूंबामुळेच पंखात बळ
कृतज्ञा ही एका सामान्य माणसाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आली आहे. जिचे वडील मासेमारीचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. अलिबागमध्ये शालेय शिक्षण घेत असताना तिने पायलट होण्याचे स्वप्न पाहिले आणि बारावीनंतर पालकांना तिच्या करिअरच्या ध्येयाबद्दल सांगितले. तिला पायलट व्हायचे आहे, हे सांगितल्यापासूनच तिला तिच्या पालकांचा पाठिंबा होता. तथापि, सुरुवातीला, फक्त आर्थिक चिंता होती. कारण विमान वाहतूक क्षेत्रात शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते. मात्र मुलीचे ध्येयभरारीवी विश्वास ठेवून पालकांनी तिला प्रत्येकक्षणी पाठिंबा दिला. तिच्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा त्यांनी कधीही कोंडमारा होऊ दिला नाही. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्यभराची पुंजी ओतली. तिच्या शिक्षणासाठी सर्व आर्थिक व्यवस्था केली. त्यावेळी रेवदंडा गावात ना इंटरनेट होते, ना गूगल! त्यामुळे कृतज्ञाला स्वतःची वाट स्वतःच शोधायची होती. इथून तिचा खरा प्रवास सुरू झाला.
तिच्या कतृत्वाने आकाशही ठेंगणे व्हावे
कृतज्ञाने पहिल्यांदा फ्लाईटमधून भरारी घेतल्यापासून कधीच मागे वळून पाहिले नाही. आजपर्यंत तिने अनेक देश आणि शहरांना भेटी दिल्या. नवीन लोक भेटले. नवीन गोष्टी शिकल्या. तिने विमान उडवायला सुरुवात केल्यानंतर तिचे अनुभव बदलले. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, आकाशात उंच उडणे खरोखरच छान वाटते. पण यात विमानातील सर्व प्रवाशांचीही खूप जबाबदारी असते. पायलट म्हणून आपण कशाचाही अंदाज लावू शकत नाही. कारण यात निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो. मी स्वतः एकदा अत्यावश्यक लँडिंग केले आहे आणि तो अनुभव वेगळाच असतो. आम्हाला हवामानाची परिस्थिती आणि बरीच तांत्रिकता तपासावी लागते, असे तिने सांगितले. आज तिने यश मिळविले आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणार्या प्रत्येकासोबत ती तिचे ज्ञान आणि अनुभव शेअर करत आहे. तिला वाटते की ज्या संकटांना तिलासामोरे जावे लागले, इतरांनाही त्याच गोष्टींचा सामना करावा लागू नये. तिचा आतापर्यंतचा जीवन प्रवास प्रेरणादायी आणि अनेकांसाठी मार्गदर्शक आहे. तिच्या कर्तृत्वाचा रायगडकरांना नेहमीच अभिमान राहील!
लोकं हसत होती, पण लक्ष दिले नाही!
कोरोना महामारीमुळे नोकरी गेली. आठ महिने घरातचे रहावे लागले. आई-वडिलांच्या अपेक्षा धुसर दिसत होत्या. लोक वेडे समजून हसत होते. मुलगी म्हणजे परक्याचं धन, असे सांगत होते. केलेला खर्च वाया गेला, असे म्हणणारेही होते. पण लक्ष दिले नाही. कारण आई-वडिलांचा विश्वास. उमेद खचू दिली नाही. सर्वजण एकमेकांच्या पाठीशी ठाम राहिलो. अपयशाने निराश न होता मोठ्या जिद्दीने सुरूच ठेवलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे कृतज्ञाने सांगितले.
आज अनेक संस्था, कॉलेज वैमानिक होण्याचे शिक्षण देतात. मात्र या क्षेत्रात बाजारीकरण तसेच फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्व माहिती तसेच योग्य सल्ल घेतल्याशिवाय कोणीही कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेऊ नये. तसेच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आर्थिक पाठबळाशिवाय अभ्यास करण्याची तयारीही हवी. पालकांवर कर्जाचा डोंगर तयार करु नका. पालक उज्वल भविष्यासाठी पाल्यांना शिकवित असतो. याचे भान प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवणे गरजेचे आहे.
– कॅप्टन कृतज्ञा हाले.