| शिहू | वार्ताहर |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री धावेश्वर क्रीडा व मरीदेवी क्रीडा मंडळ सांबरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.10 नोव्हेंबर रोजी कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पी.एन.पी महादेव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल सांबरी येथे पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कुर्डुस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम अटीतटीच्या लढतीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल या संघामध्ये झालेल्या सामन्यात कर्नाळा स्पोर्ट्सने बाजी मारून विजयाची परंपरा कायम ठेवली. उपविजेते दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल, तृतीय क्रमांक राजमाता कळंबोळी, चतुर्थ क्रमांक ओमकार वेश्वी या संघांना आकर्षक पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक जे. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. यात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, सूर्यकांत ठाकूर, संजय मोकल, प्रफुल्ल पाटील, जनार्दन पाटील, लक्ष्मण गावंड, तर प्रमुख पंच म्हणून दिलदार थळे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. स्पर्धेचे संयोजक पुरुषोत्तम पिंगळे, सचिन हुजरे, प्रणय पाटील, तर आयोजक धावेश्वर क्रीडा मंडळ व मरीदेवी क्रीडा मंडळ सांबरी यांनी केले होते.