48 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; रिकर्व्ह महिला टीम इव्हेंटमध्ये भारताला पहिले गोल्ड
| नागोया | वृत्तसंस्था |
भारतीय महिला तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा 2026 मधील रिकर्व्ह प्रकारात इतिहास रचला. भारताने अंतिम सामन्यात 10 वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाला 5-3 ने पराभूत करून महिलांच्या सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकले. कुमकुम मोहाड, अंकिता भाकत आणि कीर्ती या त्रिकुटाने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पहिले दोन सेट बरोबरीत सुटल्यानंतर, भारताने तिसऱ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाच्या महिला तिरंदाजी संघाला पराभूत करून सुवर्णपदकार नाव कोरले.
भारतीय महिला तिरंदाजी संघाने उपांत्य फेरीत चीनला 5-1 ने पराभूत करून पहिल्यांदाच रिकर्व्ह प्रकारातील सुवर्णपदकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या, 10 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाशी झाला. भारतासाठी हे आव्हान सोपे नव्हते, परंतु कुमकुम, कीर्ती आणि अंकिता यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या दोन सेटमध्ये कोरियन संघाला कडवी झुंज दिली. यामुळे पहिले दन सेट बरोबरीत सुटले.
पहिला सेट अत्यंत रोमांचक होता, ज्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 54 गुण मिळवले. त्यानंतर भारतीय त्रिकुटाने दुसऱ्या सेटमध्येही आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. दुसरा सेट देखील 56-56 असा बरोबरीत संपला, त्यामुळे दुसऱ्या सेटच्या शेवटी दोन्ही संघ बरोबरीत राहिले.भारतीय महिला रिकर्व्ह संघासाठी तिसरा सेट निर्णायक ठरला. कुमकुम, कीर्ती आणि अंकिता यांनी दक्षिण कोरियाच्या विश्वविजेत्या कांग चेयॉन्ग, ओह येजिन आणि ली युनजी यांच्या संघावर दबाव आणला. कीर्तीने भारतासाठी सुरुवातीलाच 8 गुण मिळवले. याचे तिने नंतर निर्णायक 9 गुणांमध्ये रूपांतर केले. भारताने तिसरा सेट 55-52 असा जिंकून सामन्यात 4-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये कोरियन संघाने या सेटमध्ये 54 गुण मिळवले होते. त्यामुळे सुवर्णपदक मिळवण्यासाठी भारताला हा सेट किमान बरोबरीत सोडवणे आवश्यक होते. भारतीय त्रिकुटाने दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी करत चौथा सेट बरोबरीत सोडवला आणि सामना 5-3 ने जिंकला.






