गोवे गावाचा संपर्क तुटला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
| कोलाड | प्रतिनिधी |
सतत तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी, (दि.19) सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एकदा कुंडलिका व महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे या गावाकडे येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असून, संपूर्ण भातशेती पाण्याखाली गेली आहे. प्रशासनातर्फे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तुफान पावसामुळे महिसदरा नदीचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यामुळे गोवे गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असून, सर्व भातशेती ही पाण्याखाली गेली आहे. तसेच तुफान पडलेल्या पुराचे पाणी गोवे येथील आदिवासीवाडी, बौद्धवाडी, तसेच रस्त्यावर असणाऱ्या दुकानात तसेच गावातील काही घरात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे भातशेतीत पाणी शिरल्यामुळे भातशेतीचे ही नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे कामावर जाणारे कामगार, तसेच इतर नागरिक यांची ही तारांबळ उडाली असून, काही जणांना घरी परतावे लागले. तर शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली असून, कुणीही घराबाहेर पडू नका, असा इशारा शासनाकडून देण्यात आला.









