| पिंपरी | प्रतिनिधी |
कंपनीतील बांधकामाच्या ठिकाणी ब्रेकर मशीनच्या सहाय्याने समानतेचे काम सुरू असताना हादऱ्याने शेजारील कंपनीची भिंत अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू झाला. मारुती राघोजी भालेराव असे मजुराचे नाव आहे. भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमध्ये एक कंपनी आहे. कंपनीत सध्या काही बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी मजूर भालेराव आणि एक जेसीबी चालक यांच्याकडून बांधकामाच्या ठिकाणी ब्रेकर मशीनच्या सहाय्याने समानतेचे काम सुरू होते. काम सुरू असताना हादऱ्यामुळे अचानक शेजारी असणाऱ्या एका कंपनीची उंच सीमा भिंत आणि शेड मजूर भालेराव यांच्या अंगावर कोसळले. यात भिंतीच्या राडारोड्याखाली सापडल्याने भालेराव हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच जेसीबी चालकाने आरडाओरडा केला. या घटनेबाबत तातडीने महापालिका अग्निशामक दलाला कळविण्यात आले. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. गंभीर जखमी अवस्थेतील भालेराव यांना त्वरित महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भिंत कोसळून मजुराचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606