। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील ममदापूर गावात लंडनस्थित व्यक्तीची जमीन आहे. त्या जमिनीत बेकायदा घुसून जेसीबी मशीनच्या सहाय्याने संरक्षण भिंतीची मोडतोड करणार्यांना दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांचा अन्य गुन्ह्यांच्या समावेशाबद्दल पोलिसांकडून तपास सुरू होता.
जयेंद्र कराळे यांचा सुमनाई सिक्युरीटी सर्व्हिस या नावाने सिक्युरीटीचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे मूळचे मुंबई, परंतु सध्या परदेशात वास्तव्यास असलेले सिराज गुलामअली पोरबंदरवाला यांनी मार्च 2020 मध्ये त्यांच्या ममदापूर येथील जमिनीची सुरक्षा करण्याचे काम दिले होते. त्यामुळे एजन्सीच्या चार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती त्याठिकाणी केली आहे. पोरबंदरवाला यांच्या या जागेवर डोंबिवली येथील जितु निषाद यांनी अनधिकृत खोल्या व वाणिज्य गाळे बांधले असल्याने सिराज यांनी मला जून 2020 मध्ये सदर जागेवर कंपाऊंड घालण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी डबर व विटांची भिंत बांधकाम सुरू केले. 4 जून रोजी रात्रौ आठ वाजताच्या सुमारास जितु निषाद याने काही इसमांना सोबत घेऊन जेसीबीच्या सहाय्याने जमीन मालक नामे सिराज पोरबंदरवाला यांच्या या जमिनीच्या भोवती बांधलेली संरक्षक भिंत तोडली आहे. त्यामुळे मी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता संरक्षक भिंत तोडलेली दिसून आली.
हे बांधकाम कोणी पाडले याची खात्री करण्यासाठी या ठिकाणी असलेले हावरे बिल्डर्स यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज पाहिले. त्यावेळी त्यामध्ये जितू निषाद व त्याच्यासोबत असलेल्या चार साथीदार यांनी तेथे हजर राहून जेसीबीच्या सहाय्याने भिंत व गेट तोडत असल्याचे दिसून आले. तसेच त्यातील एका साथीदाराकडे लांब नळ्याची बंदूक असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मी जमीन मालक सिराज यांचे वकील प्रसाद वेळके यांना दिली असता त्यांनी जमीन मालकाशी संपर्क साधून दि. 18 जून रोजी नेरळ पोलीस ठाण्यास अर्ज दिला. त्यानंतर आज दि. 19 जून रोजी दुपारी 2.45 वा. च्या सुमारास मला माहिती मिळाली की, जितु निषाद याने सदर जागेमध्ये जाऊन जेसीबीच्या सहाय्याने राहिलेली भिंत व गेट तोडून टाकले आहे. त्यावेळी जितु निषाद हा त्याच्याकडे बंदूक व इतर शस्त्रे जवळ ठेवत असल्याचे आढळून आले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक हवा असलेल्या आरोपीच्या शोधात कर्जत तालुक्यात असताना, जितू निषाद यांचे मोटार कार क्र. यू.पी. 62 बी.व्ही. 2252 ची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यामध्ये एक इसम चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला मिळून आला. तसेच कारमध्ये एक एअर गन, एक लोखंडी धारदार सत्तोर, एक बांबू मिळून आला. याबाबत नेरळ पोलिसांनी जितू निषाद आणि त्याचा साथीदार हरेंद्र यादव, रा. गोरखनगर या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे.