श्रमदानाने साजरा केला कामगार दिन

कुशल कामगार संघटनेचा पुढाकार

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमध्ये कार्यरत असलेल्या कुशल कामगार संघटनेच्यावतीने शहरातील कचरा संकलन आणि प्रेक्षणीय स्थळांवर असलेल्या लोखंडी रेलिंगची दुरुस्ती मोहीम राबवण्यात आली. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून स्वच्छ्ता कामगारांनी श्रमदान करून आगळावेगळा पायंडा पाडल्याचे बोलले जाते.

महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्यानिमित्ताने कुशल कामगार संघटनेने श्रमदान करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कुशल कामगार संघटनेच्या सदस्यांनी श्रमदान केले. शहरात स्वच्छता मोहीम राबविताना चार गट तयार करण्यात आले होते. त्या सर्व कामगारांनी आपल्याला ठरवून दिलेल्या भागात जावून कचरा उचलण्याचे काम केले. शहरात मध्यवर्ती असलेले माधवजी गार्डनमधील खेळणी तुटलेली अवस्थेत होती. त्यांची दुरुस्ती करून पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम केले. हुतात्मा भाई कोतवाल पालिका शाळेच्या गेटजवळील जाळी तुटलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे शाळेतील मुलांना खेळताना अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. तेथे कुशल कामगार संघटनेच्या माध्यमातून लोखंडी गेट दुरुस्त करून सुस्थितीत करण्यात आले आणि गेटच्या आजूबाजूला जाळी लावण्यात आली.

सकाळी नऊ वाजता पांडे प्ले ग्राउंड ते शारलोट लेक पॉईंट, सीलिया पॉईंटपासून एक्को पॉईंट, लुईझा पॉईंट, हनिमून पॉईंट गणपती विसर्जन तलाव (बालदी) परिसर अशा सुमारे सहा किलोमीटर परिसरात असलेल्या जंगलामध्ये घुसून प्लास्टिक कचरा, बॉटल, खाऊचे रॅपर आदी कचरा उचलण्यात आला. लुईझा पॉईंट खालच्या भागातील प्लास्टिक बॉटल उचलण्यात आल्या आणि शहरातील मुख्य रस्त्याच्या भागातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक रॅपर उचलण्यात आले. कचरा सुमारे 20 मोठया गोणीत जमा करण्यात आला. त्यावेळी कुशल कामगार संघटना यांच्याकडून पर्यटकांना प्लॅस्टिक बॉटल रॅपर जंगलात टाकू नये, असे आवाहन केले.

पांडे रोड ते मांधवजी गार्डन रोडलगत असलेल्या लहान झाडांना काट्यांचा सपोर्ट देऊन पाणी घालण्यात देण्यात आले. रोडलगत असलेल्या मोठ्या झाडांना घोड्यांनी चावा घेतला होता. त्यामुळे या पुढे झाडांचे नुकसान होऊ नये म्हणून मोठया झाडांना ग्रीन नेट बांधण्यात आली. स्वच्छ्ता अभियानावेळी माथेरान नगर परिषदेकडून जाळी तसेच तार उपलब्ध करून देण्यात आली. स्वच्छता मोहीम आणि श्रमदान माथेरानमधील कुशल कामगार संघटनेच्यावतीने अध्यक्ष चंद्रकांत काळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.

Exit mobile version