शंभर कर्मचार्यांवर कपातीची टागंती तलवार
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ या शहरवजा खेडेगाव म्हणून नोंद असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनात शंभरहून अधिक कामगार काम करीत आहेत. शासनाचा आकृतिबंध लक्षात घेता ग्रामपंचायतीमध्ये असंख्य अतिरिक्तकामगार भरण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्तकामगारांना कमी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतला दिले आहेत.
नेरळ हे लोकसंख्येने मोठे असलेले गाव असून शहरीकरणाकडे झुकलेल्या या गावात ग्रामपंचायत प्रशासन गावातील नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र लोकसंख्या जास्त असल्याने आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि प्रशासनाचा कारभार हाकण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये शंभरहुन अधिक कामगार काम करीत आहेत. गावाचा पसारा वाढल्याने गावातील नवीन बांधकामाचे नियोजन व्यवस्थांची व्हावे, यासाठी पुणे येथील नगररचना विभागाने गावासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. गावात सध्या 25 हजाराच्या आसपास लोक राहत असून मोठ्या नागरी वस्त्या नव्याने निर्माण होत आहेत. त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामगार वर्ग लागत होता. त्यामुळे 1995 पासून नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कामगार भरती होऊ लागली.
ग्रामपंचायतीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्मचारी वर्ग असावेत, असे आकृतिबंध ठरले आहे. मात्र ग्रामपंचायतीमध्ये असंख्य कामगार हे आकृतिबंधाबाहेरील असल्याने त्या अतिरिक्त कामगारांना कमी करावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे आहेत. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतमधील आकृतिबंधापेक्षा जास्त कामगार असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज समितीने भेटी देऊन कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून ग्रामपचायतीमधील अतिरिक्त कामगार कपात करण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. त्यामुळे शंभरहुन अधिक कामगार असलेली ग्रामपंचायत म्हणून डंका पिटणार्या ग्रामपंचायतीला अतिरिक्त कामगार कमी करण्यासाठी शासनाकडून लागलेला तगादा अडचणींचा ठरत आहे. त्यामुळे विद्यमान सदस्य मंडळ हाताखाली असलेल्या कामगारांना कशा पद्धतीने कमी करते आणि शासनाचे निकष पाळते, याकडे लक्ष लागले आहे.