पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव; वाहनचालकांचा गोंधळ

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

| माणगाव | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाची भक्तिमय सांगता झाल्यानंतर आता कोकणातून मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हजारो गणेशभक्त कुटुंबासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत असताना माणगाव परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहतूक कोंडी झाली की, वाहने पर्यायी मार्गाने वळवली जातात. परंतु, या पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः वाहनचालकांना रात्रीच्या वेळी मोठी डोकेदुखी ठरत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या आठवणी ताज्या असतानाच, आगामी काळात परतीच्या वाढत्या वाहतुकीमुळे माणगावमध्ये पुन्हा कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, वाहतूक कोंडी झाली की, वाहने पर्यायी मार्गाने वळविणे हा प्रशासनाचा तात्पुरता उपाय ठरतो. मात्र, ज्या पर्यायी मार्गावर वाहनचालकांना सुरक्षितपणे आणि योग्य दिशेने पोहोचविण्याची जबाबदारी असते, त्याच मार्गावर पुरेसे दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः माणगाव परिसराची माहिती नसलेल्या बाहेरील जिल्ह्यांतील वाहनचालकांना नेमका कोणता रस्ता मुंबई-पुण्याकडे आणि कोणता पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो, हे समजणे अनेकदा कठीण जाते. तसेच, महाडकडून मुंबईच्या दिशेने येताना पूर्वेकडील नवीन आनंद भुवनजवळून बायपासची एक लेन निजामपूर रस्त्यापर्यंत येते. याठिकाणी आल्यावर वाहनचालकांसमोर पुढील प्रवासासाठी विविध पर्याय उपलब्ध होतात. निजामपूरमार्गे पुण्याकडे जाता येते. तसेच, विळे एमआयडीसीमार्गे पाली, खोपोली आणि पुढे पुणे-मुंबई महामार्गाकडे जाता येते. दुसरा मार्ग निजामपूर रस्त्याने माणगावच्या दिशेने येऊन पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. मात्र, या महत्त्वाच्या मार्गांवर मोठ्या आकाराचे, स्पष्ट आणि रात्रीच्या वेळी सहज दिसणारे दिशादर्शक फलक पुरेशा प्रमाणात नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ वाढतो. वाहतूक कोंडीच्या वेळी अचानक वाहतूक पर्यायी मार्गावर वळविल्यानंतर हा गोंधळ आणखी तीव्र होतो.

गणेशोत्सवादरम्यान अनेक कुटुंबे रात्रीच्या वेळी मुंबईकडे परतीचा प्रवास करतात. पर्यायी मार्गावरील काही भाग तुलनेने निर्मनुष्य असल्याने, त्यातच रस्त्याच्या दिशांची स्पष्ट माहिती नसल्यास वाहनचालकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. चुकीच्या मार्गावर वाहन गेल्यास पुन्हा योग्य रस्ता शोधण्यासाठी वेळ, इंधन आणि कुटुंबीयांची सुरक्षितता यांचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी अशा परिस्थितीत स्पष्ट दिशादर्शन आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे. गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने पुढील काही दिवस माणगाव परिसरासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने आतापासूनच संभाव्य कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून पर्यायी मार्गांची तयारी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, गणेशोत्सवानंतर आपल्या घरी परतणाऱ्या हजारो कुटुंबांचा प्रवास गोंधळाचा नव्हे, तर सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, हीच अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी परतीच्या वाहतुकीचा विचार करून प्रशासनाने माणगाव परिसरातील पर्यायी मार्गांवर तातडीने दिशादर्शक फलक, प्रकाशव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

पोलीस कर्मचारी तैनात करणेही गरजेचे
निजामपूर रोड, विळे एमआयडीसी, पाली व माणगावकडे येणारे जोडरस्ते तसेच महामार्गाला मिळणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टरयुक्त सूचना फलक आणि आवश्यक त्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था उभारणे आवश्यक आहे. तसेच, कोंडीच्या काळात वाहनचालकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाच्या चौकांवर पोलीस कर्मचारी तैनात करणेही गरजेचे आहे.
बायपासचे काम रखडल्यामुळे कोंडी
माणगाव बायपासचे काम रखडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला अपेक्षित पर्यायी मार्ग पूर्ण क्षमतेने उपलब्ध झालेला नाही. परिणामी, कोंडी निर्माण झाल्यानंतर उपलब्ध रस्त्यांवर वाहतूक वळविण्याची वेळ प्रशासनावर येते. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीवर केवळ पर्यायी मार्ग हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. माणगाव बायपासचे रखडलेले काम गतीने पूर्ण झाल्यास भविष्यातील वाहतूक व्यवस्थेवरील मोठा ताण कमी होण्यास मदत होईल.
Exit mobile version