मुरुड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

एक्स-रे मशीन असून खासगी रुग्णालयांकडे धाव; नागरिकांचा संताप

| रेवदंडा | प्रतिनिधी |

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि वेळेत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासनाकडून ग्रामीण रुग्णालयांची व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र, मुरुड ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती पाहता शासनाच्या या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयात एक्स-रे मशीन उपलब्ध असतानाही गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी एक्स-रे तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येऊनही खासगी तपासणीसाठी खिशातून पैसे मोजावे लागत असतील, तर सर्वसामान्यांनी सरकारी आरोग्य व्यवस्थेवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुरुड ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.14) एकूण 130 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 27 रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागले. खासगी रुग्णालयात एका एक्स-रेसाठी सुमारे 800 ते 1,000 रुपये खर्च करावे लागत असल्याने या 27 रुग्णांवर मिळून अंदाजे 21 हजार 600 ते 27 हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक भार पडू शकतो. सरकारी रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध असती, तर या रुग्णांना खासगी खर्चाचा फटका बसला नसता. त्यामुळे हा केवळ एका तपासणीचा प्रश्न नसून, सरकारी आरोग्यसेवेतील नियोजनाच्या अभावाचा गंभीर मुद्दा बनला आहे.

रुग्णालयात एक्स-रे मशीन उपलब्ध आहे. मात्र, ते हाताळण्यासाठी आवश्यक तज्ज्ञाची कायमस्वरूपी नियुक्ती नसल्याने या सुविधेचा रुग्णांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. मशीन असूनही तपासणीसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवावे लागत असेल, तर या यंत्रणेचा उपयोग नेमका कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाने आरोग्य सुविधांसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली, पण ती चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसेल, तर अशा सुविधांचा सर्वसामान्यांना काय उपयोग? केवळ मशीन उपलब्ध असल्याची नोंद दाखवून आरोग्यसेवेची जबाबदारी पूर्ण होत नाही. त्या मशीनचा प्रत्यक्ष वापर होतो का, रुग्णांना वेळेत तपासणी मिळते का आणि त्यासाठी त्यांना बाहेर पैसे खर्च करावे लागतात का, याची जबाबदारी निश्चित करणेही तितकेच आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या अनुपस्थितीचा रुग्णांना फटका
ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी एक्स-रे तज्ज्ञ नसल्याने प्रशासनाकडून रोहा येथील डॉ. सुवर्णा लोकरे यांची प्रभारी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्या विविध वैयक्तिक कारणांमुळे वारंवार अनुपस्थित राहत असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी तज्ज्ञाची व्यवस्था केली जात नसल्याने एक्स-रे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करा
रुग्णालयातील एक्स-रे सेवेचा प्रश्न हा केवळ एका पदाच्या रिक्ततेपुरता मर्यादित नाही. उपलब्ध यंत्रणेचा पूर्ण वापर होत आहे का, प्रभारी तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत पर्यायी व्यवस्था का केली जात नाही आणि रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ का येते, या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभागाने देणे आवश्यक आहे. सरकारी आरोग्य सुविधांचा नेमका लाभ कोणाला मिळतो? हा प्रश्न आता मुरुडमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Exit mobile version