लाडघर किनाऱ्याची ब्लू फ्लॅगसाठी निवड

पर्यटनाला मिळणार चालना

| दापोली | प्रतिनिधी |

दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारा आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पर्यावरणीय गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि नैसर्गिक सौंदर्य यासाठी प्रसिद्ध असलेल्या या किनाऱ्याची ब्लू फ्लॅग मानांकनासाठी निवड झाली असून प्राथमिक सुरक्षा आणि पर्यावरणीय ऑडीट प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ब्लू फ्लॅग हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र जगातील निवडक, पर्यावरणपूरक व सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांना दिले जाते. या मानांकनासाठी लाडघर किनाऱ्यावर पाण्याची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन, बचाव व्यवस्था, पर्यटकांसाठी स्वच्छ शौचालये व प्राथमिक उपचार सुविधा, तसेच किनाऱ्याचे सौंदर्य राखण्यासाठी केलेले प्रयत्न यांची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे.

या तपासणीत लाडघर किनाऱ्याने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याची माहिती मिळाली आहे. ब्लू फ्लॅग मानांकन मिळाल्यास लाडघर किनाऱ्याचे नाव जागतिक दर्जाच्या समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत झळकणार आहे, ज्यामुळे दापोली पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक व्यवस्थापन यांच्या संयुक्त प्रयत्नातून लाडघर किनाऱ्याचे सर्वांगीण सुशोभिकरण आणि पर्यावरणीय संवर्धन सुरू आहे. यामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

Exit mobile version