श्रीवर्धन, नागाव किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलटचा मिळणार दर्जा
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, नागाव समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छता, पर्यावरणस्नेही व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यटनाच्या निकषांवर ब्लू फ्लॅग पायलट बीचचा बहुमान मिळाला आहे. भारतातील पाच किनाऱ्यांना हा दर्जा मिळाला असून, रायगडचे दोन किनारे असल्याने आंतरराष्ट्रीय नकाशावर कोकणातील सागरी पर्यटनाची नवी ओळख निर्माण झाली आहे.
श्रीवर्धन आणि नागाव किनाऱ्यांचे ब्लू फ्लॅग इंडिया व पर्यावरण आणि हवामान बदल विभाग तसेच पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात आले. राष्ट्रीय परीक्षक मंडळ व नॅशनल ऑपरेटर यांनी केलेल्या संयुक्त पाहणी, तांत्रिक तपासणीनंतर 2025-26 हंगामासाठी या किनाऱ्यांना पायलट स्टेटस मान्यता देण्यात आली आहे. श्रीवर्धन किनाऱ्याच्या विकासासाठी किनाऱ्यावरील वाळुक्षरण रोखण्यासाठी शास्त्रीय बौल्डर रचना आणि वृक्षसंवर्धनावर भर दिला जाणार आहे. तर नागाव किनाऱ्याच्या आराखड्यात प्रवेशद्वार, शौचालये, खाद्य विभाग, वाहनतळ, जलतरण सुरक्षित क्षेत्र अशी सुसज्ज सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. दोन्ही किनाऱ्यांवर सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा वर्गीकरण, सुरक्षितता उपाययोजना आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ब्लू फ्लॅग म्हणजे काय?
सागरीकिनाऱ्यांच्या पर्यावरणीय गुणवत्ता, पाण्याची स्वच्छता, सुरक्षा व स्वच्छता सुविधांवरील काटेकोर निकषांवर ब्लू फ्लॅग हा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जातो. जगभरातील 50 पेक्षा अधिक देशांत हा सन्मान मिळवलेले बीच पर्यावरणपूरक पर्यटनाचे आदर्श मानले जातात.
मान्यतेसाठी 2026 उजाडणार
ब्लू फ्लॅग समितीकडून डिसेंबरमध्ये मध्यमकालीन आढावा घेतला जाणार असून, मार्च-एप्रिल 2026 मध्ये अंतिम तपासणीनंतर किनाऱ्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यावरण व पर्यटन विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायतींच्या समन्वयातून महाराष्ट्रासाठी 'सस्टेनेबल कोस्टल टुरिझम'चे आदर्श ठरणार असल्याचे ब्लू फ्लॅग इंडियाचे नॅशनल ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरुप यांनी सांगितले.





