कुटुंबाला आधार ठरणार ’लेक लाडकी’

शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये; मुलींच्या शिक्षणासाठी होणार मदत

। रायगड । प्रतिनिधी ।

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी, याकरिता शासनाने माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात ( दि.1) एप्रिल 2023 वा त्यानंतर जन्माला येणार्‍या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. कुटुंबाला एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाची हि योजना कुटुंबाला आधार ठरणार आहे असे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग नगर परिषद हद्दीतील अंगणवाडी क्रमांक 31 ते 39 मधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेबाबत पालकांच्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन रामनाथ येथील गावदेवी मंदिरात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन करताना सुहिता ओव्हाळ बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका सुशीला चोगले, सुप्रिया लहाने, आदिती मुद्राळे, वनिता करंबत, सुवर्णा पारकर, मीनलघोसाळकर, मानसी पवार, गीतांजली वारसोलकर, मयुरी सावंत, तृप्ती केणी, दीप्ती तबीब, वाटी घोसाळकर, अविष्का वरसोलकर, ज्योत्स्ना जाधव, दीपाली महाले, ललिता पाटील, दर्शना शिवलकर, कीर्ती वाघमारे, प्रमोदिनी शिवलकर, मनीषा नांदगावकर, लता वरसोलकर आदी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या. समुपदेशन कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या समूहगीताने झाली. या कर्मचार्‍यांनी लेक लाडकी योजनेवर रचलेले गाणे होऊन पालकांना उद्बोधित केले.

अशी आहे योजना
लेक लाडकी योजनेत महाराष्ट्रात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या कुटुंबाला 5 हजार रुपये दिले जातात. एवढेच नाही तर मुलगी पहिल्या वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला 6 हजार रुपये दिले जातील. यानंतर ती सहाव्या वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला 7 हजार रुपये मिळतील. यानंतर मुलगी 11 वीत पोहोचल्यावर तिला 8000 रुपये मिळतील. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये कुटुंबाला दिले जातील. अशा प्रकारे, मुलीच्या जन्मापासून ती प्रौढ होईपर्यंत कुटुंबाला 1,01,000 रुपये दिले जातील. राज्यातील माझी कन्या भाग्यश्री योजना रद्द करून लेक लाडकी योजना सुरू करण्यात येणार आहे.
या लोकांना फायदा होईल
राज्यात राहणार्‍या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त नाही आणि 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल. कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना होतो. कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.
Exit mobile version