जिल्ह्यामध्ये होणार लाखो गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना

| अलिबाग | प्रमोद जाधव |

गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता संपली असून बाप्पाचे स्वागत करण्याची तयारी जोमाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात 19 सप्टेंबर रोजी सकाळपासून 1 लाख 2 हजार 854 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पारंपारिक पध्दतीने विधीवत पुजा करून मुर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

गणरायाच्या स्वागतासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बाजारपेठा सजल्या आहेत. फळाफुलांसह वेगवेगळ्या सजावटीच्या साहित्यांनी दुकाने सजली आहेत. सोमवारी गणेशमुर्ती प्रतिष्ठापना होणार असल्याने आदल्या दिवशी सोमवारी सकाळपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी करण्यात आली. संपूर्ण बाजारपेठा फुलून गेल्या. गणरायाची आरस सजावटीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीसाठी बाजारात उपलब्ध झालेल्या आधुनिक साधनाचा वापरही करण्यावर भक्तांनी भर दिला. काहींनी साध्या पध्दतीने तर काहींनी सामाजिक, शैक्षणिक संदेश देऊन सजावट करण्यावर भर दिला आहे.

जिल्ह्यामध्ये रायगड पोलीस दलाच्या हद्दीत एकूण 1 लाख 2 हजार 854 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यात सार्वजनिक 273 व खासगी 1 लाख 2 हजार 581 गणेशमुर्तींचा समावेश आहे. काही ठिकाणी दीड दिवस, काही ठिकाणी पाच दिवस तर काही ठिकाणी दहा दिवसाच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यात पाच दिवसाचे 58 हजार 740 व अनंत चतुदर्शीपर्यंत 17 हजार 543 गणेशमुर्तींचा समावेश आहे.

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला स्वयंसेवक नेमण्याबाबत पोलीसांनी सुचना केली असून स्थानिक पोलीसांमार्फत पोलीस व होमगार्ड मार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची रायगड पोलीसांनी दिली.

Exit mobile version