जीन्स प्रेसिंगकडून लाखोंची वीजचोरी


| कल्याण | प्रतिनिधी |
उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापित विशेष पथकाने उल्हासनगरच्या गायकवाडपाड्यातील जीन्स प्रेसिंग कारखान्याची 1 लाख 91 हजारांची वीजचोरी उघडकीस आणली. महिला अधिकार्‍यांच्या अधिनस्त पथकाने ही कामगिरी केली असून, वीजचोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट जप्त करण्यात पथकाला यश आले. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी पथकप्रमुख उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांचा सन्मान करुन पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले. कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन यावेळी उपस्थित होते.|

संजू धनश्याम ललवाणी (बराक क्रमांक 1917 समोर, सेक्टर 40, गायकवाडपाडा, उल्हासनगर) असे या प्रकरणातील जीन्स प्रेसिंग कारखाना चालकाचे नाव आहे. रिमोटच्या साह्याने नियंत्रित जॅमर बसवून मीटरमधील वीजवापराची नोंद बंद अथवा सुरू करण्याची यंत्रणा बसवल्याचे आढळून आले. या यंत्रणेच्या माध्यमातून कारखाना चालकाने 1 लाख 91 हजार 240 रुपये किमंतीची 13 हजार 266 युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले.

मुख्य अभियंता औंढेकर व अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता चौधरी व सहायक अभियंता नेहा ढोणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जनमित्र रमेश शिंदे, सुरेश गायकवाड तसेच प्रशिक्षणार्थी प्रथम जाधव यांनी कारवाईत सहकार्य केले. या पथकाने मार्च महिन्यात 12 ठिकाणी सुरू असलेल्या 1 लाख 50 हजार युनिटच्या वीजचोर्‍या पकडल्या आहेत.

Exit mobile version