| पनवेल | वार्ताहर |
कामोठे परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल 23 लाख 88 हजार रुपये परस्पर लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरटीओ चलानच्या नावाखाली पाठवलेल्या एपीके फाइलद्वारे ही सायबर फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कामोठे येथे 45 वर्षीय शिक्षिका कुटुंबासह वास्तव्यास असून, त्या कळंबोली येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घराच्या नूतनीकरणासाठी त्यांनी बँकेतून 24 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही संपूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी शाळेत जात असताना त्यांच्या मोबाईल फोनचे नेटवर्क अचानक बंद पडले. कॉल, मेसेज तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली. घरी आल्यानंतर वायफायच्या माध्यमातून इंटरनेट सुरू झाले. त्यानंतर संशय आल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सिम कार्ड बदलून घेतले, मात्र आईला पैसे पाठवण्यासाठी खात्यातील शिल्लक तपासली असता केवळ 705 रुपये उरल्याचे दिसून आले.







