। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली-शिळफाटानजीक खोकला आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटल्याची घटना बुधवारी (दि. 17) घडली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापुरातील वनवटे गावातून कलोते येथे जाण्यासाठी दत्तात्रेय पाटील, सुशीला ठोंबरे, रिया फाटे, कौस्तुभ पाटील हे आपल्या कार मधून सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून प्रवास करीत होते. दत्तात्रेय पाटील यांना कार चालवताना शेडवली फाट्याजवळ त्यांना खोकला आल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने तत्काळ खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.







