पर्यटकांच्या दिमतीला लालपरी

अलिबाग-पनवेल फेऱ्यांत वाढ

| अलिबाग | प्रतिनिधी |

सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यानुसार अलिबाग एसटी बस आगारातून अलिबाग-पनवेल विना थांबा सहा फेऱ्यांमध्ये, तर प्रत्येक स्थानकात थांबा घेणाऱ्या अलिबाग-पनवेल फेऱ्यांमध्ये सहा अशा एकूण 12 फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अलिबाग आगारातून करण्यात आले आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. स्थानिक अन्य बाहेरच्या ठिकाणी जातात. स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी व पतेतीनिमित्त 16 ऑगस्ट रोजी दोन दिवस सलग शासकीय सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दाखल होऊ लागले आहेत. अलिबाग स्थानकातून अलिबाग-पनवेल विना थांबा फेऱ्या 36 असून, प्रत्येक स्थानकात थांबा घेणाऱ्या अलिबाग-पनवेलच्या 30 फेऱ्या आहेत. प्रवाशांसह स्थानिकांच्या गर्दीचा विचार करीत पर्यटकांसह स्थानिकांना त्यांच्या निश्चितस्थळी वेळेवर पोहचता यावे यासाठी अलिबाग एसटी बस आगारामार्फत अलिबाग-पनवेलपर्यंतच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. एकूण 12 फेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगारातून देण्यात आली आहे.

अलिबाग-शिर्डी बस सुरु
ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अलिबाग आगारातून अलिबाग-शिर्डी बससेवा सुरु करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून ही सेवा सुरु केली आहे. अलिबाग आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता ही बस सुटणार आहे. प्रत्येक थांबे घेत ही एसटी शिर्डीला पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिर्डीमधून ही बस परतीच्या प्रवासाला निघणार असल्याची माहिती अलिबाग आगारातून देण्यात आली आहे.

Exit mobile version