दिवाळी पर्यटनासाठी लालपरी सज्ज

11 मार्गावर जादा गाड्या; आरक्षण सुविधा सुरू
। अलिबाग । वर्षा मेहता ।
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्यासह जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यातच आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्याने चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, याकरीता सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणार्‍या प्रवाशांसाठी मलालपरीफ अर्थात एसटी सज्ज झाली आहे. प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने दिवाळीच्या कालावधीत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात. तर अनेक जण आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र यावर्षी तिकिटदरात झालेल्या वाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.
दिवाळीनिमित्त 1 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत. या जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अलिबाग एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अभिजीत मांढरे यांनी केले आहे.
रायगड विभागातून या कालावधीत 11 जादा बसेस सुरू करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या सणात नागरिकांना त्यांच्या गावी जाणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मांढरे यांनी सांगितले.


दिवाळीच्या कालावधीत भाऊबीजसारख्या सणात मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या कालावधीत गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये, याकरीता गरजेनूसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
अभिजीत मांढरे- वाहतूक नियंत्रक, अलिबाग

रायगड जिल्ह्यातील एसटी आगारातून थेट गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होणार आहे. अलिबाग-शेगाव, अलिबाग-लातूर अशा बर्‍याच गाड्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे निश्‍चितपणे लोकांचा प्रवास सोईस्कर होईल. या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे.
अनघा बारटक्के – विभाग नियंत्रक, रायगड

जादा गाड्या
अलिबाग-उमरगा ः सकाळी 8.30
अलिबाग-लातूरः सकाळी 7.00
अलिबाग-शेगाव ः दुपारी 3.00
रोहा-लातूर ः सकाळी 8.00
श्रीवर्धन-मिरज ः सकाळी 5.30
महाड-भांडूप ः दुपारी 2.30
श्रीवर्धन-पुणे ः सायंकाळी 6.00
श्रीवर्धन-नालासोपारा ः सकाळी 9.15
श्रीवर्धन-भांडूप ः सकाळी 5.30
रोहा-माणगाव-पुणे ः दुपारी 4.00
गोरेगाव-मुंबई ः सकाळी 9.45

Exit mobile version