विभागीय नियंत्रकांसमोर मोठे आव्हान
| तळा | वार्ताहर |
गेली 75 वर्षे अविरत सेवा करीत असून, शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना तत्पर सेवा देण्यासाठी प्रवाशांच्या अडीअडचणी समजून घेऊन सुधारणा करणे किंवा मागणीप्रमाणे बदल करणे, हे मोठे आव्हान असणार आहे. विभाग नियंत्रक परिवहन पेण रायगड विभागप्रमुखांनी चालक, वाहक, विभाग नियंत्रक, प्रवासी संघटना किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखून समस्यांचा चर्चेमधून योग्य मार्ग काढणे हे महामंडळाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवासी संघटना प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असून, सक्षमीकरण करणे क्रमप्राप्त आहे. खासगी प्रवासी गाड्या बसच्या वेळेत किंवा थोड्या कमी-अधिक वेळेत प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या मदतीने प्रयत्न करून कडक कारवाई होणे मोठे आव्हान ठरणार आहे.
रिक्षा चालक मालक संघटनेला बळी न पडता एसटी टिकवणे ही सर्वच विभागीय नियंत्रकांची मोठी जबाबदारी आहे. राजकीय मंडळी आपल्या फायद्यासाठी राज्य परिवहन मंडळावर दबाव तंत्राचा वापर करतात. या दबावाला न जुमानता प्रवाशांना उत्तम, आरामदायी गाड्यांची उत्तम कंडीशन, यांत्रिकी विभागातून गाडी वारंवार दुरुस्ती केली गेली पाहिजे. बसस्थानकात सुविधांचा अभाव, चालक, वाहक विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, महिला प्रसाधनगृह, स्वच्छतागृह, साफसफाई, चहापान सुविधा, बसस्थानकाची होत असलेली दुरवस्था, अशा एक ना अनेक समस्या व नियोजित मार्गावर चालणार्या गाड्या याबाबत लक्ष देणे अधिक मोलाचे ठरणार आहे.
चालक, वाहक, यांत्रिकी हे महामंडळाचे आधारस्तंभ आहेत, तर प्रवासी हे दैवत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ, सुरक्षित, सुखकर प्रवास, विनम्र सेवा, सौजन्य घेऊन आलेले ब्रीद वाक्य चालक वाहकांकडून दिली जात असल्याने 75 वर्ष सेवा सुरू आहे. मात्र, याकडे महामंडळाचे उदासीकरण निदर्शनास येत आहे. याकडे परिवहनमंत्री अथवा अध्यक्षांनी याकडे लक्ष केंद्रित करणे क्रमप्राप्त आहे.
विभागीय नियंत्रकांनी महिन्यातून प्रत्येक बसस्थानक, निवाराशेड येथे सहकारी अधिकार्यांसमवेत भेटी दिल्याने कर्मचार्यांवर प्रभाव पडून कर्तव्यात कसूर करणार नाही. जिल्ह्यातील आठ आगारांतील सर्व बाबींचा वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करून पाठपुरावा करणे हेदेखील महत्त्वाचे ठरू शकते. तरच आजादी की 100 वर्षे महोत्सव आपण साजरी करण्यास साथीदार होऊ शकतो. याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष घालणे काळाजी गरज ठरणार आहे.