नेरळ-कळंब मार्गावर धावणार लालपरी

कर्जत आगाराकडून एसटीची ट्रायल घेत मार्गाची पाहणी
। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याचे 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद आहेत. त्याचा फटका विद्यार्थी वर्गाला बसत असून, एसटी गाड्या बंद असल्याने स्थानिक 50 हुन अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदार यांना खासगी गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. याबाबत स्थानिकांनी सोशल मीडियाचे माध्यमातून उठवलेला आवाज याचा सकारात्मक परिणाम दिसत असून, 23 जुलै रोजी कर्जत एसटी आगाराच्या अधिकारी वर्गाने या मार्गावर एसटी गाडीची ट्रायल घेऊन मार्गाची पाहणी केली.

दरम्यान, नेरळ एसटी स्थानकातील अनधिकृत वाहतूक करणार्‍या गाड्या यांचा बंदोबस्त करण्याचे पत्र एसटी आगाराच्या वतीने नेरळ पोलिसांना देण्यात येणार आहे, तर एसटी गाडी सुरु करण्यासाठी 20 मीटरच्या मार्गात खडी टाकून रस्ता तयार केल्यास एसटी गाड्या सुरु करण्यात येतील, असा सकारात्मक प्रतिसाद आगार प्रमुख शंकर यादव यांनी दिला आहे.

कर्जत एसटी आगाराने नेरळ-कळंब रस्त्याचे काम अर्धवट असल्याने एसटी गाड्या बंद ठेवल्या आहेत. नेरळ स्थानकातून कशेळे, शिंगढोल, नेरळ-गुडवण तसेच कर्जत याशिवाय नेरळ-कळंब रस्त्यावरून धावणार्‍या नेरळ-वारे, नेरळ-कळंब, नेरळ-बोरगाव, नेरळ-ओलमन, नेरळ-मुरबाड तसेच कळंब-वांगणी-कळंब तसेच नेरळ-देवपाडा आणि नेरळ-पोशीर या गाड्या चालविल्या जात असतात.

या भागातील विद्यार्थी हे पोशीर येथून श्रमजीवी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय, नेरळ विद्या मंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय, कळंब येथील प्रगती शाळा आणि वरिष्ठ महाविद्यालय साठी मातोश्री टिपणीस महाविद्यालय आणि बदलापूर-कर्जत येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असतात. ते सर्व विद्यार्थी यापूर्वी एसटी महामंडळाकडून सवलतीच्या दरातील पास काढून प्रवास करायचे. पण एसटी गाड्या बंद असल्याने हे सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून घरातून शाळा-कॉलेजला जावे लागते. त्याचा परिणाम वाईट झाला असून अनेक विद्यार्थी हे आर्थिक स्थितीमुळे घरातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे एसटी गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी असंख्य कार्यकर्त्यांनी कर्जत येथे जाऊन एसटी आगार प्रमुख यांना केली होती.

नेरळ एसटी स्थानकातून एसटी गाड्या सुरु केल्या जातील असे आश्‍वासन आगारप्रमुख शंकर यादव यांनी एसटी गाडी सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा करणारे तरुण प्रवीण मोर्गे, दिनेश भोईर, गोरख शेप, दिनेश कालेकर, कैलास विरले, कृष्णा हाबळे यासारखया अनेक तरुणांना ही माहिती दिली.

Exit mobile version