एसटी गाडी बंद, स्थानिक संतप्त
| नेरळ। वार्ताहर ।
नेरळ शहर आणि रेल्वे स्थानक येथे येणार्या माथेरान-नेरळ-कळंब या राजमार्ग रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर ते धामोते या भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. गेली पाच महिने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र अत्यंत संथगतीने रस्त्याचे काम केले जात असल्याने स्थानिकांनी रस्त्याच्या कामाबद्दल आणि रस्त्याच्या दर्जाबद्दल संशय व्यक्त केला आहे. दरम्यान,रस्त्याचे काम कासवगतीने सुरु असल्याने नेरळ-कळंब हि एसटी सेवा बंद ठेवावी लागली आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी,नोकरदार यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
रस्त्याचे काम संथगतीने सुरु असताना ज्या भागात 900मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जात होता. त्या भागात गेली सहा महीने कामे सुरूच आहेत.आता देखील त्या 900मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी जेमतेम 700 मीटर लांबीचा रस्ता इतका बाजूने तर दुसर्या बाजूने 200मीटर चा रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा 900 मीटर लांबीचा रस्ता कधी तयार होणार हा प्रश्न आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अशा कारभाराचा सर्वाधिक फटका स्थानिकांना बसत आहे. ठेकेदार संथगतीने रस्त्याचे काम करीत असल्याने या भागात चालविली जाणारी एसटी सेवा आज देखील बंद आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने एसटी कामगारांचा संप सुरु झाल्यापासून आणि संप संपल्यानंतर देखील नेरळ- कळंब मार्गावर एसटी गाडी सुरु झाली नाही. या मार्गावरकेवळ नेरळ -कळंब हि एसटी गाडी चालविली जात नाही तर नेरळ-ओलमन, नेरळ- बोरगाव,नेरळ कळंब-कर्जत, मुरबाड-नेरळ या गाड्या देखील चालविल्या जातात. एसटी गाड्या बंद असल्याने स्थानिक विद्यार्थी,तरुण वर्ग,कामगार वर्ग यांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडत असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात एसटी मधून प्रवास करता येत असतो तर बारावी पर्यंत शिकणार्या मुलींना एसटी मधून मोफत प्रवास करता येतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर सुरु असलेले काम हे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ठेकेदाराला दिल्या आहेत. मात्र त्या भागात रस्त्यावर असलेले प्रचंड वाहतूक यामुळे गतीने रस्त्याचे काम करता येत नाही. मात्र महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.
अक्षय चौधरी, शाखा अभियंता कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग
नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ जवळ रस्त्याचे काम सुरु आहे,त्यात रस्ता अगदी निमुळता असल्याने आम्ही गाडी बंद ठेवली आहे. त्या भागातून एसटी गाडी मधून प्रवास करणारे प्रवासी यांची संख्या मोठी आहे,पण रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने गाडी सुरु करता येत नाही.
देवानंद मोरे, सहाय्यक वाहतूक नियंत्रक कर्जत एसटी आगार