| पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील कोपर गावचा रहिवासी अजय म्हात्रे याने पेण ते लद्दाख असा अडीच हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन 12 मे रोजी सुरू केला असून मनाली ते लद्दाख हा शेवटच्या टप्प्याचा 433.3 किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी 2 जून रोजी सकाळी 7 वाजता मनालीहून प्रवास सुरू केला आहे. शेवटच्या टप्प्यांतील रस्ता हा घाटाचा असल्याने हा प्रवास करताना त्याला खूप सारी शारीरिक मेहनत होणार आहे. गेल्या 20 दिवसात केलेल्या प्रवासापेक्षा ही, हा प्रवास कठीण असल्याचे भ्रमणध्वनीवरून कृषीवलशी बोलताना त्यांने सांगितले. त्यांने असेही सांगितले की, रस्त्यामध्ये अनेक जण माझ्या या साहशी प्रवासाचे कौतुक करून मदतीचा हात पुढे करत आहेत. तसेच रविवार पर्यंत लद्दाखला पोहोचणार असल्याचे त्यानी सांगितले. कृषीवल बरोबर बोलताना असताना तो रोहतांग पर्यंत पोहोचला होता. त्याच्या या पुढच्या प्रवासासाठी पेण तालुक्यातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचा प्रवास सुखरुप व्हावा म्हणून कुटुंबा समवेत पेण तालुक्यातील तरूण मंडळी देवाकडे प्रार्थना देखील करत आहेत.







