सायडोंगरात जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू; ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक
| कर्जत | प्रतिनिधी |
टोरंट कंपनीकडून अजूनही कुरापत्या सुरूच असून, एवढे मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर देखील जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्याची हिंमत सरकार दाखवत आहे. धरण परिसरात जंगल तोडलेल्या ठिकाणी जमिनीचे सीमांकन करण्यासाठी काही सर्वेक्षण करणारे कर्मचारी पोहचले असता त्यांना पिटाळून लावण्याचे काम स्थानिक आणि शिवसैनिक यांनी केले. दरम्यान, सरकारकडून जमीन सर्वेक्षण करण्याचे निमित्ताने प्रोत्साहन देण्याचे काम सुरू असून, शिवसेना ठाकरे पक्षाने येथे आपण कोणालाही येऊ देणार नाही, असा सज्जड दम भरला आहे.
पाली सायडोंगर परिसरात वृक्षतोड सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सरकारवर चोहोबाजूंनी विरोध केला जात असून, पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत. राज्यातील सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आता सरकार नरमाईची भूमिका घेईल असे बोलले जात आहे; परंतु, टोरंट पॉवर कंपनीसाठी पायघड्या घालण्याचे काम सरकारने सुरूच ठेवले आहे. धरण परिसरातील जमीन आणि येथील वीज प्रकल्पात तयार होणारी वीज राज्यभर पोहचवण्यासाठी ट्रान्समिशन लाइन फिरवली जाणार आहे. या जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. कर्जत सर्वेक्षणासाठी आलेले कामगार जमीन मोजणीची कामे करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती स्थानिकांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांच्या कानावर घातली. दळवी यांनी तत्काळ सायडोंगर गाठून जमीन सर्वेक्षण साठी आलेल्या कामगारांना तेथून पिटाळून लावले. सायडोंगर परिसरात सर्वेक्षणाचा प्रयत्न करणारे संबंधित कामगाराने आपले नाव बबलू अहिरवार (मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले. दिल्लीतील एका कंपनीच्या माध्यमातून हायटेन्शन वीजवाहिनीच्या सर्वेक्षणासाठी आले होते. यावेळी बाजीराव दळवी यांच्यासह अन्य शिवसैनिक यांनी त्यांना सुनावले आणि तेथून पिटाळून लावले.
जंगलात वन कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमलेले आहेत. त्यांच्या निदर्शनास सर्व्हेसाठी आलेले असे कुणी आढळले नाहीत. कदाचित ते जंगलापर्यंत पोहोचले नसतील आणि त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसले नाहीत.
– समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कर्जत पूर्व विभाग
सायडोंगर परिसराची पाहणी करून परतत असताना दोन कर्मचारी सर्वेक्षणाचे साहित्य घेऊन जाताना दिसले. चौकशी केली असता या भागातून हायटेन्शन वीजवाहिनी जाणार असून, त्यासाठी सर्वेक्षण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या परिसरातील वृक्षतोड थांबवण्यात आली असून, प्रकल्पाबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्यांना सर्वेक्षण करण्यास मज्जाव केला.
– बाजीराव दळवी, तालुका प्रमुख, शिवसेना ठाकरे गट
