बनावट आधार कार्ड बनवून जमीन लाटली

आरोपींना न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

| पनवेल | वार्ताहर |

वावंजे येथील मयत व्यक्तीच्या नावाचे बनावट आधार कार्ड बनवून त्या आधारे खरेदीखत तयार करून ते नावावर करून घेण्याच्या मोबदल्यात अभिजीत पांडुरंग पाटील यांच्याकडून रक्कम स्वीकारली. ही फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात रघुनाथ कदम, भरत पाटील, दिलीप पाटील, शाकीर सिद्दिकी व मोहम्मद हरून आजीम मुल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाचही आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी आणि एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

राघो हरी पाटील यांचे मयत आजोबा गणपत हरी पाटील यांच्या नावे असलेली वावंजे गट क्रमांक 138 या ठिकाणी जमीन आहे. यातील आरोपी रघुनाथ चंद्रराव कदम यांनी राघो हरी पाटील यांचे आजोबा गणपत हरी पाटील हे मयत असतानासुद्धा त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड काढले व ते स्वतः म्हणजे गणपत पाटील असल्याचे साक्षीदार अभिजीत पाटील यांना सांगून या जमिनीची त्यांना विक्री केली. विक्रीपोटी असलेली रक्कम रघुनाथ, भरत, दिलीप, शाकीर व मोहम्मद हरून अजीम मुल्ला यांनी आपापसात वाटून घेतली. तसेच भरत पाटील आणि दिलीप पाटील यांना माहिती असतानासुद्धा त्यांनी रघुनाथ कदम याला मदत करून आरोपींनी साक्षीदार म्हणून दस्तावर सह्या केल्या होत्या. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर या पाचही आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी अटक केली.

Exit mobile version