सीताफळात किडीचे साम्राज्य

| रसायनी | वार्ताहर |

सध्या बाजारात आलेल्या सीताफळात किडी असल्याचे दिसत असल्याने ती खाताना नीट तपासून घेणे गरजेचे आहे.

सध्या सीताफळांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे त्यांची बाजारात आवक वाढली आहे. बाजारपेठ, राष्ट्रीय महामार्ग, अन्य मार्गावर सीताफळ जास्त प्रमाणात दिसत असून, भरघोस पीक आल्याने त्याची विक्री कमी दराने होत असल्याने त्याला गिर्‍हाईकदेखील जास्त प्रमाणात दिसत आहे. जवळपासच्या सर्व बाजारपेठेत आवक जास्त असली तरी राष्ट्रीय महामार्ग, पलस्पे फाटा व अन्य मोक्याच्या ठिकाणी, त्याचप्रमाणे हात गाडीवरदेखील सीताफळाची विक्री होताना दिसत आहे. शंभर रुपयाला सव्वा ते दीड किलो सीताफळ मिळत असल्याने गाडीवाले रस्त्यावर गाडी लावून ती खरेदी करताना दिसत आहेत. ज्या मोसमात जे फळ येते तेच जास्त प्रमाणात खावे असे सांगितले जाते, आणि ते खरेही आहे, पण सद्या उपलब्ध असलेली सीताफळे यात किडी असल्याचे दिसत आहे. ग्रुप ग्रामपंचायत लोधिवलीचे ग्राम पंचायत सदस्य सुभाष शिंदे यांनीही स्वस्त आणि मोठे फळ दिसल्याने सिताफळांची खरेदी केली, घरी आल्यावर त्यांनी तयार झालेली सीताफळे फोडली असता त्यांना त्यात किडी दिसल्या, म्हणून त्यांनी दुसरे सीताफळ फोडले असता, त्यातही किडी असल्याचे त्यांनी सांगितले, बघता बघता सर्वच फळांत किडीच आढळल्या. त्यामुळे सीताफळ विकत घेताना व ती खाताना नीट लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सीताफळ हे गोड असते, ते जास्त प्रमाणात पिकले असेल तरीही त्यात कीड तयार होते, अथवा हवामान बदल झाल्यासदेखील किडी तयार होतात, असे तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Exit mobile version