। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मे महिन्यात सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, हा आदेश लागू झाल्यानंतर 15 दिवसांतच बहुतांश लोकांनी नोटा बदलून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांची नोट असेल तर आजच बँकेत जाऊन बदलून घ्या. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली मुदत आज शनिवारी संपत आहे.
रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याच्या अंतिम मुदतीवर स्पष्टीकरण दिले आहे. सेंट्रल बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, लोकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाही. आजपर्यंत नोटा बदलल्या नाहीत तर उद्यापासून त्यांची किंमत कागदाच्या तुकड्यासारखी होईल. मिंटच्या अहवालात असे म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने हे स्पष्ट केले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे.
केवायसी नियम आणि इतर कायदेशीर प्रक्रियांद्वारे लोक बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलू शकतात. दिवसाला फक्त 20 हजार रुपये जमा करू शकतात. 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया 23 मेपासून बँकांकडून सुरू झाली होती. यामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. अशा परिस्थितीत आता 2000 रुपयांच्या काही नोटाच चलनात असतील असा अंदाज सेंट्रल बँकेने व्यक्त केला आहे.
तुमच्याकडे अजूनही 2000च्या नोटा आहेत? आजच बदलून घ्या, नाहीतर…
