‘अमर रहे’च्या जयघोषात शहीद राहुलवर अंत्यसंस्कार

। महाड । प्रतिनिधी ।

महाड तालुक्यात असलेल्या कांबळे तर्फे महाड येथे राहणारे व मुळ गाव पिंपळदरी, (ता.औढा नागनाथ जि.हिंगोळी) येथील जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. या शहीद जवानावर बुधवारी (दि.5) सकाळी साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अमर रहेच्या जयघोषांनी सारा परिसर दणाणून गेला.

जम्मू जिल्हा-बारामुल्ला सीमेवर पहारा देत असताना जवान राहुल भगत यांना गोळी लागल्याने ते शहीद झाले. सात वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. राहुल भगत हे सन 2015 मध्ये भारतीय सैन्यदलात शिपाई म्हणून भरती झाले होते. बुधवारी सकाळी राहुल भगत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल भगत याचे पार्थिव कांबळे तर्फे महाड येथे आणण्यात आले. यावेळी या परिसरातील तरुणांनी राहुल भगत अमर रहेच्या घोषणा दिल्या.

बौद्ध पद्धतीने धार्मिक विधी केल्यानंतर शहीद राहुल याचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनावर ठेवून संपूर्ण गावातून गावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीत नेण्यात आले. तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी राहुल भगत अमर रहे अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. यावेळी स्थानिक प्रशासनातील उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, पोलीस अधिकारी, सरपंच राघोबा महाडिक, तसेच महाड तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, निवृत्त सैनिक आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत सलामी दिली. सैन्यदलातील आणि पोलीस प्रशासनाने यावेळी पुष्पहार अर्पण करत सलामी दिली.

दरम्यान मंगळवारी रात्री महाडचे आमदार भरत गोगावले यांनी राहुल भगत याच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. उपस्थित नागरिकांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना राहुल याने देशसेवा बजावताना आलेले वीरमरण कायम प्रेरणा देत राहील असे सांगितले.

कुटुंबियांचा हंबरडा
शहीद राहुल याचे पार्थिव घरात आणताच त्याच्या कुटुंबियांना आपले अश्रू अनावर झाले. आपल्या मुलाचे पार्थिव पाहून आई, पत्नी, भाऊ आणि वडिलांनी हंबरडा फोडला. घरासमोर केलेल्या चौथर्‍यावर शहीद राहुल याचे पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवण्यात आले. रात्री उशिरा आलेल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे अशक्य असल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी शहीद राहुल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हजारोंचा जनसमूदाय
दसरा सणाचा आनंद एकीकडे नागरिक घेत असतानाच दुसरीकडे मात्र शहीद जवानाच्या अंत्यविधीसाठी तालुक्यातील हजारो नागरिक दाखल झाले होते. राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी दसरा मेळाव्यांच्या सभा असल्याने अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.

Exit mobile version