पर्यटनाचा शेवटचा हंगाम

रविवारपासून पर्यटक परतीच्या मार्गावर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी यंदादेखील रायगड जिल्ह्याला पसंती दर्शविली. महिनाभर सुट्टीचा आनंद घेतल्यावर आता पर्यटक परतीच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे पर्यटन हंगामाचा शेवटचा आठवडा असून, रविवारपासून पर्यटक परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. दरवर्षी पर्यटक उन्हाळी सुट्टीत रायगड जिल्ह्यामध्ये दाखल होतात. यंदादेखील मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले. लोकसभा निवडणुकीमुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, दुसर्‍या आठवड्यापासून पर्यटक जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढतच गेला. हॉटेल्स, कॉटेजेस पर्यटकांनी फुल्ल झाले. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले झाले. अलिबागसह वरसोली, नागाव, किहीम, काशीद, मुरूड समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरून गेले. उन्हाचे चटके लागत असल्याने बहुतांशी पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा आनंद लुटला. काही पर्यटकांनी समुद्रसफरीचा आनंदही मनमुरादपणे घेतला. आता पर्यटक परतीच्या मार्गावर जाण्याच्या तयारीला लागले आहेत. शाळा जूनच्या पहिल्या अथवा दुसर्‍या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे शालेय खरेदीची लगबग सुरु होणार असल्याने पर्यटक रविवारपासून त्यांच्या निश्‍चितस्थळी निघणार आहेत. काही पर्यटक एसटी बसने, तर काही खासगी वाहनाने निघणार आहेत.

स्थानिक महिलांना मिळाला रोजगार
उन्हाळी सुट्टीत रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले. नागाव, किहीम आक्षीसह समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली. पर्यटकांनी यंदा कॉटेजला अधिक पसंती दिली. खाण्यापिण्यापासून सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने पर्यटकांनी कॉटेजमध्ये राहण्यावर भर दिला. त्यामुळे घरगुती भोजन करण्यासाठी स्थानिक महिलांना रोजगाराचे साधन खुले झाले.
Exit mobile version