। तळा । वार्ताहर ।
तळा येथे शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात स्व. प्रभाकर भाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तालुका चिटणीस धनराज गायकवाड यांनी सांगितले की, तळागाळातील गोरगरीब आणि बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी सत्तेचा योग्य वापर कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व. प्रभाकर पाटील. कला, क्रीडा, प्रशासन, शिक्षण, राजकारण, कृषी, साहित्य तसेच इतर कोणत्याही क्षेत्राचा रायगड जिल्ह्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात भाऊंचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. भाऊंनी पेटवलेली ही समाजसेवेची आणि क्रांतीची मशाल कायम तेवत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आरडीसीसी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर, युवा नेते लहू चव्हाण, दीपक रसाळ, शशांक वेदक तसेच शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.







